नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात कृश आहे व असे सांगतात की जेव्हा हा हात गळून पडेल तेव्हा नैसर्गिक उत्पात घडतील. नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळून पडतील व बद्रीविशालचे मंदिर कायमचे बंद होईल आणि मग ‘भविष्यबद्री’ बद्रीनाथ म्हणून पुजला जाईल. नरसिंह मंदिराजवळ दुर्गामंदिर आहे. या मंदिरात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुशमांडा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी व सिद्धी अशा नऊ मूर्तीची नवदुर्गा म्हणून पूजा केली जाते. या मंदिरात वासुदेवाची भव्य देखणी मूर्ती आहे. तसेच या मंदिरात ‘श्रीवासुदेव गिरिराज चक्रचुडामणी’ असे एका सम्राटाचे नाव खोदलेले आहे. इ.स. ८२० च्या आसपास ही मंदिरे बांधली असावीत, असा एक अंदाज आहे. नंतर या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असावा. नागरशैलीतील या मंदिरांच्या शिखरांचे संतुलन व आधार देण्याची पद्धत ही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहे.
जोशीमठचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘औली.’ जोशीमठ ते औली या रस्त्याचे अंतर साधारण १६ कि.मी. आहे. पण आता जोशीमठ ते औली असा लोहरज्जुमार्ग तयार झाला आहे. साधारण साडेचार कि.मी. अंतराच्या या प्रवासात आपण जवळजवळ ३३०० फूट उंच जातो. औली हे ‘बुग्याल’ आहे. बुग्याल म्हणजे उंचीवरील सपाट प्रदेश. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत हा सर्व भाग हिमाच्छादित असतो. त्यावेळी स्कीईंग हा साहसी खेळ या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विभागातर्फे शिकवला जातो. मार्च-एप्रिलमध्ये बर्फ वितळू लागते व मखमली हिरवळीत हा सर्व भूभाग हरवून जातो तर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात असंख्य नाजूक, सुंदर गोजिरवाण्या, विविध आकाराच्या रंगांच्या फुलात हा भाग दडून जातो. हिमाच्छादित पर्वत रांगांचे तसेच हाथी, कॉमेट, द्रोणागिरी नंदादेवी इ. नामांकित पर्वतशिखरांचे इथून फार सुंदर दर्शन होते.
जोशीमठला भारतीय सैन्यदलाची मोठी छावणी आहे.
जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. त्यामुळे या मार्गावर एकतर्फी वाहतूक चालते. यालाच ‘गेट सिस्टीम’ असे म्हणतात. जोशीमठपासून २० कि.मी. अंतरावर ‘गोविंदघाट’ आहे. गोविंदघाटला आपला बस प्रवास संपतो व पदभ्रमंती सुरू होते. ‘हेमकुंड’ व ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला जाण्यासाठी फक्त गोविंदघाटहून जाणारा हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे.
‘गोविंदघाट’ (उंची १८२९ मीटर्स), गुरू गोविंदसिंगांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले स्थळ! या ठिकाणी अलकनंदा व लक्ष्मणगंगेचा संगम होतो. म्हणून याला ‘लक्ष्मणप्रयाग’ असे सुद्धा म्हणतात. इथे गुरुद्वार असून गुरुद्वारात राहण्याची व खाण्याची सोय होते. जादा सामान ठेवण्यासाठी क्लॉकरूमची सुविधा इथे उपलब्ध आहे. पुढील प्रवासासाठी हमाल, घोडे, दंडी (डोली) सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतात. काही छोटेखानी विश्रामगृहे पण येथे उपलब्ध आहेत.
अलकनंदेचा पूल ओलांडला की चढाचा रस्ता सुरू होतो. २-३ कि.मी. चा हा रस्ता चांगलाच दम काढतो. वाटेवर फारसे जंगल-झाडे पण नाहीत. साधारण ३ कि.मी. अंतरावर ‘पुलना’ ही वस्ती येते. (पुलना उंची १९२० मीटर्स) मग मात्र चढउताराचा, जंगलातून जाणारा रस्ता सुरू होतो. सोबत असते लक्ष्मणगंगेची! इथून निसर्गाची विविध रूपे खुलायला लागतात. पुढे साधारण ५ कि.मी. अंतरावर ‘भ्युंदर’ ही वस्ती येते. ही संपूर्ण घाटी ‘भ्युंदरघाटी’ म्हणून ओळखली जाते.
‘भ्युंदर’ (उंची २२३९ मीटर्स) हे ४०-५० घरांचे गाव असून राजपूत व भोटिया जमातीचे लोक इथे राहतात. भ्युंदरहून ‘काकभृशुंडी’ या पर्वतशिखराचे रमणीय दर्शन होते. या पर्वत शृंखलेत भ्युंदरपासून साधारण २२ कि.मी. अंतरावर काकभृशुंडी नावाचे हिरवेगार पाणी असलेले एक सुंदर सरोवर आहे. हे सरोवर ५००० मीटर्स उंचीवर आहे. हाथी पर्वताशेजारी असलेल्या या सरोवराकडे विष्णुप्रयागहून सुद्धा जाता येते पण तुलनेने भ्युंदरकडून जाणारी वाट थोडी सोपी आहे. पण ही नेहमीची मळलेली वाट नाही. त्यामुळे या सरोवराकडे जाण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक घेणे आवश्यक आहे. मार्गात जंगल, चढ-उतार, प्रवाह, ग्लेसिअर्स ओलांडावे लागतात. वाटेत कुठेही मनुष्यवस्ती नाही. त्यामुळे मुक्कामाचे सर्व साहित्य बरोबर ठेवावे लागते. वन्यप्राण्यांचे या भागात अस्तित्व आहे.
या जलाशयाजवळील हत्तीपर्वतावर दोन प्रचंड मोठे पाषाणखंड आहेत. त्यापैकी एकाचा आकार कावळ्यासारखा तर दुसऱ्याचा गरुडासारखा. हा कावळा व गरूड यांच्यात विश्वामधील घडामोडी संबंधी संभाषण सुरू असते, अशी एक श्रद्धा आहे. या विषयी तुलसीदास रचित ‘रामचरितमानस’ या महाकाव्यात एक कथा सांगितली आहे –
लोमेश ऋषींच्या आश्रमात एक शिष्य विद्याभ्यासासाठी रहात असतो. हा शिष्य अत्यंत अहंकारी असतो. त्यामुळे त्याला गुरूबद्दल आदरभाव कधीच दाखवता येत नाही. या अहंकारी स्वभावामुळे तो लोमेश ऋषींना अपमानित करत असे. लोमेश ऋषींनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या स्वभावात बदल होत नव्हता. लोमेश ऋषी शिवभक्त होते.
एके दिवशी या शिष्याची आपल्या गुरूप्रती वर्तणूक पाहून भगवान शिवशंकर क्रुद्ध झाले व त्यांनी ‘तू नीच पशू कुळात एक हजार जन्म घेशील’ असा शिष्याला शाप दिला. आता मात्र शिष्याचे डोळे उघडले. तो शंभू महादेवाची करूणा भाकू लागला. लोमेश ऋषींना जेव्हा हे कळले, तेव्हा त्यांनासुद्धा खूप वाईट वाटले. त्यांनी श्रीशंकराची प्रार्थना करून उ:शाप देण्याची विनंती केली. लोमेश ऋषींची प्रार्थना ऐकून श्रीशंकराला दया आली व त्यांनी सांगितले याला कोणताही जन्म मिळू दे पण प्रत्येक जन्मात त्याला प्रभू रामचंद्राचे स्मरण राहील. मी हा त्याला वर देत आहे. आता शिष्याला कावळ्याचा जन्म प्राप्त झाला. तो जंगलात निघून गेला. त्याचे जीवन दुःखीकष्टी झाले. जंगलातील मृत जनावरांचे मांस खाऊन आपल्या नशिबाला दोष देत तो दिवस कंठू लागला. असाच फिरत फिरत तो एके दिवशी अयोध्येला पोहोचला. श्रीशंकराने दिलेल्या वराचे त्याला स्मरण झाले. तो रामनाम घेऊ लागला. प्रभू रामचंद्राचे माहात्म्य व थोरवी त्याला जाणवू लागली.
राम-रावण युद्धात मेघनादाने (रावणाचा पुत्र) नागास्त्राचा प्रयोग राम-लक्ष्मणावर केला. राम-लक्ष्मण नागपाशात बद्ध झाले. सर्वांनी आशा सोडली. नागपाशातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त गरूड जाणत होता. महाबली हनुमानाने गरूडापाशी जाऊन राम-लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त करण्याची प्रार्थना केली. हनुमंताच्या प्रार्थनेप्रमाणे गरूडाने राम-लक्ष्मणाला नागपाशातून मुक्त करून जीवदान दिले.
परंतु गरूडाच्या मनात एक शंका राहिलीच. आपल्या पत्नीसाठी शोक करणारा, सामान्य माणसाप्रमाणे वागणारा हा राम नक्की कोण आहे? श्रीरामाचे श्रेष्ठत्व गरूडाला अज्ञात होते. शेवटी हा प्रश्न त्याने नारदमुनींना विचारला. तेव्हा त्यांनी गरूडाला सांगितले हा प्रश्न तू ब्रह्मदेवाला विचार. तेव्हा गरूड ब्रह्मलोकी गेला व त्याने आपली शंका ब्रह्मदेवाला विचारली. तेव्हा ब्रह्मदेवांनी गरूडाला सांगितले की, हा प्रश्न तू श्रीशंकराला विचार गरूड कैलास पर्वतावर पोहोचला. श्रीशंकरानी त्याचे स्वागत केले. गरूडाने श्रीशंकराला प्रश्न विचारला. स्मितहास्य करीत शंकरांनी गरूडाला सांगितले, हा प्रश्न तू काकभृशुंडीला विचार.
गरूड अचंबित झाला. अखेर तो मानस सरोवराकाठी वास्तव्य करत असलेल्या कावळ्याचा जन्म घेतलेल्या शापभ्रष्ट शिष्यापाशी आला. या पक्षीराजाने काकभृशुंडीला आदराने वंदन केले व त्याला सांगितले, तू माझा गुरू आहेस व माझ्या शंकेचे तूच समाधान करू शकशील. तेव्हा काकभृशुंडीने मोठ्या आदराने रामाचे माहात्म्य गरूडाला सांगितले व सांगितले की प्रभू रामचंद्र हे कोणी सामान्य नाहीत तर जनकल्याणासाठी भगवान श्रीविष्णूंनी हा घेतलेला अवतार आहे. काकभृशुंडीने गरूडाला उपदेश केला, ज्ञान दिले.
काकभृशुंडी गरूडाला सांगतात, ‘हे गरूडा, अहंकारामुळेच माणसाला अनेक प्रकारची दु:खे व मनोरोग जडतात. जन्ममरणाचे मूळ कारणही अहंकारच आहे. भक्ताच्या मनातील अहंकार दूर करणे हे ईश्वर आपले कर्तव्य समजतो. भक्ताच्या मनातील अहंकार दूर करून तो भक्ताला दुःखमुक्त करतो हे भगवंताचे भक्तावरील प्रेमाचे प्रतीक आहे. अहंकाराचे शोकदायी गळू ईश्वर मातेच्या ममतेने कापून टाकतो.’
या परिसरातील लोक काकभृशुंडी सरोवर हे एक पवित्र सरोवर मानतात. मकरसंक्रांत व नंदाष्टमीच्या दिवशी पुलना, भ्युंदर गावातील लोक वाजतगाजत या स्थानी येतात. काकभृशुंडी सरोवराची मनोभावे पूजा करतात. मात्र या दुर्गम स्थळी फारच थोडे लोक जातात.
असे सांगतात की, कावळ्याला आपला मृत्यू समजतो. जेव्हा त्याला मृत्यू दिसू लागतो तेव्हा तो काकभृशुंडी घाटीत येतो व देहत्याग करतो. या भागात गेलेले लोक सरोवराच्या परिसरात कावळ्याची पिसे पाहिल्याचे सांगतात.
या काकभृशुंडी सरोवरातून भ्युदरगंगा नदी उगम पावते व भ्युंदर गावाजवळ लक्ष्मणगंगेत स्वत:ला ती हरवून जाते.
भ्युंदरहून परत २-३ कि.मी.चा चढउताराचा रस्ता व मग लक्ष्मणगंगेचा पूल ओलांडल्यावर शेवटचा ३ कि. मी. चा पूर्ण चढणीचा टप्पा! या शेवटच्या ३ कि.मी.मध्ये मात्र चांगलीच दमछाक होते व मग येते ‘घांगरिया.’
हा पूर्ण रस्ता गोविंदघाटपासून हेमकुंडपर्यंत चांगला बांधलेला आहे. जागोजागी राहण्याची व खाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. शीख यात्रेकरूंची सतत वर्दळ या रस्त्यावर सुरू असते. ‘वाहे गुरू’ व ‘सत् श्री अकाल’ असा घोष कानावर येत असतो. चाल व चढण सोडल्यास कोणताही धोका किंवा अडचणी या मार्गावर नाहीत.
‘घांघरिया’ (उंची ३०४८ मीटर्स) उंच पर्वतशिखरांनी वेढलेले, देवदार वृक्षराजीत दडलेले, हिरवळीने मढलेले आणि नाजूक सुंदर फुलांनी सजलेले छोटेखानी गाव! इथे गुरूद्वार असून ते सर्वांसाठी मुक्त आहे. गुरूद्वारात निवास व भोजनाची पण व्यवस्था होते. शिवाय गावाला साजेशी छोटी लॉजेसपण येथे उपलब्ध आहेत. घांघरियापासून १ कि.मी. चालल्यावर लक्ष्मणगंगा ओलांडली की डावीकडचा रस्ता ४ कि.मी. अंतरावरील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ कडे तर उजवीकडचा रस्ता ६ कि.मी. अंतरावरील ‘हेमकुंड’ कडे घेऊन जातो. हेमकुंडच्या रस्त्याकडे नजर टाकली असता एक सुंदर प्रपात नजर खिळवून टाकतो.
१९३१ साली फ्रँक स्मिथ हा ब्रिटिश गिर्यारोहक ‘कामेट’ हे शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होता. परत येत असताना त्याचा रस्ता चुकला व एका फुलाने बहरलेल्या दरीत त्याचे आगमन झाले. या दरीचे व फुलांचे सौंदर्य पाहून स्मिथ थक्क झाला. त्या दरीचे त्याने ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असे नामकरण केले. जुलै-ऑगस्ट महिन्यात ही दरी जंगली फुलांनी बहरून जाते. ७० वर्षांपूर्वी स्मिथने जवळजवळ २५०० प्रकारची फुले पाहिली होती. आज मात्र २५०-३०० प्रकारची फुले इथे पाहायला मिळतात. १९८२ साली ही दरी व आजूबाजूचा परिसर असे ८७.५ चौ.कि.मी. क्षेत्रफळ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. हेमकुंड हा या राष्ट्रीय उद्यानाचा एक उपविभाग आहे.
हेमकुंडची चढण सुरू होते ती फुलांच्या सोबतीने! भूर्जपत्र, होडोडेंड्रॉन, चीड, पाईन वृक्षांच्या साथीने! जिरनियम, लिली, अस्टर्स व अनेक सुंदर नाजूक, रंगीबेरंगी फुलांनी सर्व परिसर नटलेला! कड्याकपारीत उमललेली नाजूक फुले माना हलवून आपले स्वागत करीत असतात. मंद निळ्या रंगाची प्रिमुला, लिंडोफोलिया, लाल चेरी, हिमालयन यलो पॉपी, गुलाबी गोल्डन लिली, जांभळी जिरेनियम, लाल-पांढरे जंगली गुलाब, जांभळ्या रंगाची आयरिस इ. अनेक प्रकारची असंख्य फुलेच फुले! या फुलांचे सौंदर्य थक्क करून टाकणारे आहे. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पेक्षा जास्त प्रकारची व सुंदर फुले मला हेमकुंडच्या
वाटेवर पाहायला मिळाली. मध्येच पायात येणारे झरे तर कधी ग्लेसियर्स! या स्वप्नसृष्टीत चार-साडेचार कि.मी. ची वाट कधी संपते तेच समजत नाही आणि मग दर्शन झाले ते हिमालयातील दिव्य फुलांचे, ब्रह्मकमळाचे! हिरव्या पांढऱ्या रंगाचे मिश्रण असलेले क्रीम रंगाचे ‘ब्रह्मकमळ!’ त्याच्या पाकळ्या बटरपेपरसारख्या थोड्या पारदर्शी! मंद गोड सुगंध! याचा आकार डोळ्यासारखा असल्यामुळे या फुलांना नेत्रकमळ असेही म्हणतात. वनस्पतीशास्त्रात या फुलांना Saussurea Obvallata म्हणून ओळखले जाते. पुराणात या फुलांना ‘दिव्यपुष्पे’ म्हटले आहे. साधारण १३०००-१५००० फुटांवर ही फुले फुलतात. खरंच, ही फुले म्हणजे विधात्याची एक अद्वितीय निर्मिती आहे.
थोडे पुढे गेल्यावर एक पायऱ्यांची वाट हेमकुंडला जाते. हा रस्ता जवळचा असला तरी उभ्या चढणीचा आहे. थंडीचा कडाका वाढू लागतो. मध्येच सर्व परिसर धुक्यात गुरफटून जातो. ढग अंगाला स्पर्श लागतात. बघता बघता दृश्य अदृश्य होते. वातावरणात गूढरम्य शांतता पसरलेली असते. मधूनच गुरूद्वारातील भजनाचे स्वर कानी येऊ लागतात. वातावरणात ते सुरेल स्वर पावित्र्य पसरवतात. सर्व वातावरण स्वप्नमय होत असते व त्यात आपण स्वत:ला हरवत असतो.
१४,५०० फूट उंचीवरील हे छोटेसे सरोवर म्हणजे निसर्गाची एक अमोघ देणगी आहे. नाजूक फुलांनी वेढलेले, आकाशाची निळाई ल्यालेले हे सरोवर सूर्यप्रकाशाच्या किरणात चमकत असते. तर मध्येच कधीतरी धुक्याची दुलई अंगावर पांघरून घेते. पाण्यात छोटे छोटे हिमखंड तरंगत असतात, तर तळ्याकाठचे गुरुद्वार कमळासारखे शोभायमान दिसत असते. गुरूद्वाराच्या शेजारील लंगरमध्ये चहा, खीर, खिचडीचे वाटप मुक्तहस्ते व प्रेमाने सुरू असते. साधारण १/२ कि.मी. परीघ असलेल्या या सरोवराच्या दर्शनाने व तेथील वातावरणाने देहभान हरपते आणि मन एका वेगळ्याच विश्वात विहरू लागते.
गुरुद्वाराच्या शेजारीच लक्ष्मणाचे छोटेसे मंदिर आहे. लक्ष्मणाची मंदिरे फारशी कुठे आढळत नाहीत. मला तर लक्ष्मणाची मंदिरे फक्त ऋषीकेशला व हेमकुंडला पाहायला मिळाली. हेमकुंडचे हे मंदिर पुरातन असून नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार थोर योगी सतपालजी महाराज यांनी केला आहे. मंदिराशेजारी एक धर्मशाळासुद्धा आहे. पण प्रचंड थंडी, निसर्गाच्या बेभरवशी रौद्र स्वरूपाची शक्यता, यामुळे पर्यटक सहसा हेमकुंडला रात्री मुक्काम करीत नाहीत.
या सरोवराच्या परिसत ७ पर्वतशिखरे आहेत. प्राचीन काळात रक्तबीज नावाची दुष्ट शक्ती देवांना, ऋषींना छळू लागली. त्रस्त झालेले देवदेवता ब्रह्मदेवाला शरण गेले, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना सामुंध ऋषींना शरण जाण्यास सांगितले, तेव्हा सामुंध ऋषी हिमालयात तपोसाधनेत मग्न होते. देवदेवता सामुंध ऋषींच्या दर्शनाला आले. देवदेवतांचे आगमन व त्यांची इच्छा ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणली. त्यांच्या शरीरातून एक दिव्य तेज प्रगट झाले व त्या तेजाने दुष्टदमनाचा नाश केला. पुढे या दिव्य तेजाचे सात ऋषींत रूपांतर झाले व हे सात ऋषी सात पर्वत शिखरावर तपोसाधना करू लागले. म्हणून या पर्वतशिखरांना सप्तशृंग व पर्वताला सामुंध पर्वत असेही म्हणतात. ही बर्फाच्छादित पर्वतशिखरे हेमकुंड सरोवराचे जलस्रोत आहेत. देवदेवतांचे या परिसरात कायम वास्तव्य आहे, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. या परिसरातील दिव्यशक्तीचे वास्तव्य आद्य शंकराचार्य जाणून होते.
हेमकुंडच्या परिसरात पिवळ्या चोचीचे व लालभडक पायाचे कावळे (अल्पाइन चफ) पाहायला मिळतात. साधारण १०,००० फूटांवर हे कावळे दिसतात. हिमवादळाची पूर्वचाहूल त्यांना लागते व ते आवाज करीत खालच्या भागात स्थलांतर करतात. त्यांच्या हालचालीने मेंढपाळांना हिमवादळाची पूर्वसूचना मिळते. सुवर्ण गरूडही या भागात घिरट्या घालताना दिसतो. अंगोरा जातीच्या मेंढ्यांचे कळप या परिसरात चरण्यासाठी भटकत असतात. हिमचित्ते, अस्वले, कस्तुरीमृगांचा पण या परिसरात वावर असतो. शॉर्ट टेल्ड होल हे छोटे उंदरासारखे दिसणारे प्राणी या परिसरात आढळतात. त्यांची जमिनीत खोल बिळे असतात. बिळात ते गवताचा साठा करून ठेवतात. फुले, फळे, किडे व गवत हे त्यांचे खाद्य! हिमवृष्टी सुरू झाली की ते स्थलांतर न करता बिळात आश्रय घेतात व मग ५-६ महिने ते बिळातच वास्तव्य करतात.
हिमालयात अशी अनेक स्थळे आहेत, की ज्यांच्या दर्शनाने हृदय अपार शांतीने भरून जाते. शरीरात निसर्गातील ईश्वरी शक्ती प्रवाहित होते. ही ईश्वरी शक्ती विचारचक्रातील षड्रिपु पुसून टाकते व पुनीत झालेल्या मनाला निर्मळ आनंदाचा साक्षात्कार होतो, विचारांचा सुगंध मनात दरवळू लागतो व स्वर्गसुखाची अविस्मरणीय अनुभूती प्राप्त होते. हेमकुंड हे असेच स्थळ आहे.
-प्रकाश लेले
Leave a Reply