श्रीहरीने आपले नेत्रकमल उघडले आणि विश्वकल्याणासाठी त्याने सुरू केलेल्या तपोसाधनेची सांगता झाली. चराचरात ॐकार भरून राहिला होता. एक छोटेसे बोरीचे झाड श्रीहरीवर सावली धरून उभे होते. तेच तपोसाधनेच्या काळात ऊन, वारा, पाऊस, बर्फापासून श्रीहरीचे रक्षण करत होते. श्रीहरीने ओळखले, ‘आदिमाया महालक्ष्मीच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपले रक्षण करत होती.’ तो विश्वाचा पालनकर्ता मनोमन सुखावला. प्रसन्न होऊन त्याने आदिमायेला सांगितले, ‘आता या पवित्र ठिकाणी मी कायम वास्तव्य करीन. सर्वजण मला बद्रीनाथ म्हणून ओळखतील.’ श्रीहरीच्या दर्शनासाठी देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषीमुनींनी गर्दी केली व त्यांच्या सान्निध्यात त्या पवित्र स्थळी कायम वास्तव्य करण्याची मनोकामना त्यांनी व्यक्त केली. श्रीहरी संतोषला! त्याला सर्वांची काळजी! आपल्या शैलदंडाने त्याने जमिनीवर प्रहार केला. जमिनीतून अमृतधारा वाहू लागल्या. स्फटिकासारख्या जलाने भरलेले, आकाशाची निळाई ल्यालेले एक सुंदर सरोवर तयार झाले. ते जलामृत प्राशन करून सर्वजण तृप्त झाले. त्या सरोवराला ‘दंडपुष्करणी’ म्हणून ओळखू लागले.
आणि एके दिवशी एक महायोगी त्या सरोवराच्या काठी आला. सरोवराचे रूप पाहून तो देहभान विसरला. सरोवराचे पाणी त्या महायोग्याकडे पाहतच राहिले. त्याने ओळखले, ‘अरे! हा तर अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मण!’ सरोवराचे पाणी आनंदले. लक्ष्मणाचा चरणस्पर्श करण्यासाठी उचंबळू लागले. लक्ष्मणाचा पदस्पर्श करू लागले. एक धारा निर्माण झाली. प्रवाह वाहू लागला. सर्वजण या प्रवाहाला ‘लक्ष्मणगंगा’ म्हणून ओळखू लागले. अजूनही लक्ष्मणगंगा वाहतेच आहे. राम-रावण युद्धात झालेल्या हत्येपासून पापमुक्त होण्यासाठी लक्ष्मणाने सरोवराच्या काठी बसून तपोसाधना केली.
हा परिसर व सरोवर लोकपाल म्हणून सुद्धा ओळखले जाते. स्कंदपुराणात सुद्धा ह्या सरोवराचा उल्लेख मिळतो. तर वराह पुराणात लोकपाल संबंधी उल्लेख मिळतो तो असा-
लोकपालमिती ख्यातै. तस्मिन क्षेत्र परे मम ।
तत्र ते लोकपालास्तु, मया संस्थापितः पुराः ।।
तत्र पर्वतमध्ये तु, स्थले कुण्डे बृहन्मय ।
भित्वा पर्वतमुदगीर्ण, यत्र सोम समुदभवः ।।
स्कंदपुराणात सुद्धा या स्थानाचे उल्लेख आले आहेत. या सरोवराची हिमकुंड, हेमकुंड, लोकपालतीर्थ अशीही नावे पुराणात आढळतात.
हा परिसर म्हणजे, ‘आर्यावर्तातील पंडू या पराक्रमी राजाची तपोभूमी!’ जेव्हा आपले कार्य व कर्तव्य संपल्याचे पांडवांनी जाणले तेव्हा स्वर्गारोहणासाठी त्यांनी हिमालयाकडे प्रस्थान केले. या सरोवराच्या परिसरात त्यांनी काही काळ व्यतीत केला व पुढे मार्गक्रमण केले.
हिंदू धर्मावर यावनी आक्रमण झाले. धर्मरक्षणासाठी शीख धर्माची स्थापना झाली. शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंग आयुष्यभर धर्मरक्षणासाठी लढले.
त्यांना आपला पूर्वजन्म ज्ञात होता. त्यांनी आपल्या पूर्वजन्मी या सरोवराच्या काठी एका गुहेत तपोसाधना केली होती. तेव्हा त्यांना एक दिव्य ईश्वरी ज्योतीचे दर्शन झाले होते. त्यांनी लिहिलेल्या आपल्या ‘विचित्र नाटक’ या ग्रंथात गुरू गोविंदसिंग हेमकुंड-लोकपाल बद्दल लिहितात-
अब मैं अपनी कथा बखाऔ ।
तप साधन जेहि विधि मोहि आनो ।।
हेमकुंड पर्वत है जहाँ, सप्तशृंग सोहत है तहाँ ।।
सप्तशृंग तेहि नाम कहावा, पांडुराज जहँ जोग कमावा ।
तहँ हम अधिक तपस्या साधी, महाकाल कालिका आराधी ।।
याही विधि करत तपस्या भयो, द्वै ते एक रूप हौ गयो ।
तात मात मुर अलख अराधा, बहुत विधिजोग साधना साधा ।।
‘विचित्र नाटक’ ग्रंथातील दोह्यांच्या आधारे, गुरू गोविंदसिंगांच्या पूर्वजन्मीच्या या तपोभूमीचा शोध घेण्याचा खूपजणांनी प्रयत्न केला. पंडित तारासिंग नरोत्तमदास पांडुकेश्वरपर्यंत पोहोचले होते. आपल्या या मोहिमेसंबंधी त्यांनी खूप लेख प्रकाशित केले. त्याआधारे स्फूर्ती घेऊन पतियाळा राजघराण्यातील संत अंतरसिंह १९२० साली भर हिवाळ्यात जोशीमठला पोहोचले तेव्हा प्रचंड बर्फवृष्टी होत होती. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. तरीही ते एक वाटाड्या घेऊन पुढे गेले. ते हेमकुंडला पोहोचले. त्यांना तिथेच सोडून वाटाड्या परत आला. नंतर मात्र अंतरसिंहाचा काहीच पत्ता लागला नाही. कालांतराने बर्फ वितळल्यावर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या दोन पेट्या पोलिसांना मिळाल्या. पण अंतरसिंहाच्या जिवंत वा मृतदेहाचा आजपर्यंत कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. गुरू गोविंदसिंगांच्या तपोभूमीपाशी पोहोचणारे संत अंतरसिंह हे पहिले शीख होत.
पुढे १९३६ साली टिहरी राज्यातील शीख हवालदार संत सोहनसिंग हेमकुंडला पोहोचले. त्यांनी हेमकुंडला गुरूद्वारा स्थापन केले. तेव्हापासून शीख यात्रेकरूंची हेमकुंड यात्रा सुरू झाली. पुढे यात्रेकरूंच्या सोयीसाठी घांघरिया व गोविंदघाट या दोन ठिकाणी गुरूद्वारांची उभारणी झाली.
हेमकुंडला जाण्याचा योग्य काळ म्हणजे जुलै ते ऑक्टोबर! हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी होते. बर्फाच्या उंच राशी जमतात. सर्व परिसर बर्फात झाकला जातो. एप्रिलपासून बर्फ वितळू लागतो. मे अखेरपर्यंत रस्ता मोकळा होतो. मग सेनादलाचे जवान रस्ता व वाटेवरील पूल दुरुस्त करून मार्ग सुरक्षित बनवतात व मग हेमकुंड यात्रा सुरू होते.
जून-जुलैमधील हलकासा पाऊस, उबदार वातावरण! सर्व सृष्टी हिरवा शेला पांघरते. सर्वत्र नाजूक रंगीबेरंगी फुलांची उधळण! डोंगरकड्यावर शुभ्रधवल प्रपाताच्या रेघा उमटतात. आकाशात विहरणाऱ्या मेघमाला पर्वतशिखरे चुंबू लागतात. मध्येच कधीतरी सोनेरी सूर्यकिरणे आकाशात पसरतात, धरतीमातेच्या कुशीत शिरतात! हळूच आकाशात इंद्रधनुष्याची कमान उभी राहते, तर मध्येच सर्व परिसर धुक्यात स्वत:ला हरवून जातो. संध्याकाळी तर आकाशात रंगांची उधळण होते. डोंगरकपाऱ्यांच्या कुशीत रेंगाळणारे धुके हा निसर्गसोहळा पाहतच राहते.
हरिद्वार – बद्रिनाथ मार्गावर ‘जोशीमठ’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. हरिद्वारपासून साधारण २५० कि.मी. दूर! १०-११ तासांचा हा बस प्रवास म्हणजे हिमालयाची विविध रूपे न्याहाळण्याची एक सुवर्णसंधी! सर्व प्रवास दुर्गम पर्वतराजीतून! सोबत साथ असते पवित्र गंगेची व अलकनंदेची!
१८९० मीटर्स उंचीवरील जोशीमठ हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. इ.स. पूर्व २५०० ते इ.स. ७०० अशा प्रदीर्घ काळात हिमालयाच्या पर्वतराजीत कत्युरी साम्राज्य भरभराटीला आलेले होते. जोशीमठचे पुरातन नाव ‘कार्तिकेयपूर’ व हे कार्तिकेयपूर कत्युरी साम्राज्याची राजधानी होती. शालिवाहन नावाच्या एका शक्तिशाली महत्त्वाकांक्षी पुरुष हा कत्युरी साम्राज्याचा मूळ पुरुष समजला जातो. या साम्राज्याच्या काळात शिल्पकला, हस्तकला इ. अनेक कला भरभराटीला आल्या. अनेक वैशिष्ठ्यपूर्ण मंदिरे या काळात बांधली गेली.
आठव्या/ नवव्या शतकात बौद्ध, जैन धर्माच्या आक्रमणामुळे हिंदू धर्माचे अध:पतन होऊ लागले. हिंदू धर्माला उर्जित अवस्था आणण्याचे, हिंदुधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे महान कार्य आदिशंकराचार्यांनी केले. हिंदुस्थानात वैदिक मताचे व अद्वैत तत्त्वज्ञानाच्या प्रतिष्ठापनेचे कार्य करण्यासाठी त्यांनी भारताच्या चारी दिशांना मठ स्थापन केले व या मठांच्या माध्यमातून हिंदू धर्मात त्यांनी एकसूत्रता आणली. जेव्हा ते या स्थानी आले होते तेव्हा साधना करीत असताना त्यांना एका दिव्य ज्योतीचे दर्शन झाले म्हणून त्यांनी या स्थानाचे नाव ‘ज्योर्तिमठ’ असे ठेवले व आपल्या उत्तर दिशेकडील मठाची स्थापना या स्थानी करून आपले शिष्य तोटकाचार्य यांच्यावर या मठाची जबाबदारी दिली. मठाचा आम्नाय सांगितला. जोशीमठ हे नाव ज्योर्तिमठ या नावाचा अपभ्रंश आहे. याच ठिकाणी शंकराचार्यांनी ‘अंबास्तोत्र’ लिहिले.
जोशीमठचा ‘शंकराचार्यांचा मठ’ हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. ज्या ठिकाणी शंकराचार्यांना दिव्य ज्योतीचे दर्शन झाले ती गुहा आजही दाखवली जाते. या गुहेसमोर तुतीचा एक जीर्ण वृक्ष आहे. त्याचे वय एक हजार वर्षांपेक्षा जास्त आहे, असे सांगितले जाते. या वृक्षाला ‘कल्पवृक्ष’ असेही म्हणतात. जोशीमठ मधील आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे ‘नृसिंह मंदिर’. शंकराचार्यांच्या मठापासून साधारण १ कि.मी. अंतरावर हे स्थान आहे. प्रचंड हिमवृष्टीमुळे हिवाळ्यात बद्रीनाथचे मंदिर बंद केले जाते त्याकाळात बद्रीनाथची गादी या ठिकाणी असते व बद्रीनाथची पूजा नृसिंह मंदिरात होते. इ.स. १४५० च्या आसपास रामानन्द नावाचे महापुरुष बद्रीनाथला आले होते. हिवाळ्याच्या काळात बद्रीनाथची पूजा जोशीमठ याठिकाणी करण्याची त्यांनी सुरुवात केली, असे संशोधकांचे मत आहे. पण आजही ती परंपरा सुरू आहे.
उत्तराखंडात काही ठिकाणी नरसिंहाची पूजा विष्णुचा अवतार म्हणून केली जात नाही तर गोरखनाथाचा एक शिष्य म्हणून केली जाते. आधिव्याधी, संकटे दूर करणारी जोगी देवता म्हणून तिची आराधना करतात. या देवतेची दोन रूपे सांगितली आहेत. एक उग्र नरसिंह हे रूप. हे रूप ‘डौड्या नरसिंह’ म्हणून ओळखले जाते. हे रूप अत्यंत क्रोधायमान समजले जाते तर दुसरे रूप ‘दुधिया नरसिंह’ म्हणून ओळखले जाते. हे दुसरे रूप कोमल भावनांची देवता, शान्तीप्रिय व सर्वांवर दया करणारे, असे समजले जाते. काही लोकगीतात जागरामध्ये दुधिया नरसिंह हे बद्रीनाथाचें मामा असे वर्णले जाते. जोशीमठ हे दुधिया नरसिंहाचे मुख्य स्थान मानले जाते. या स्थानाबद्दल एक कथा सांगतात, सत्ययुगात बसन्ती राजा या ठिकाणी नरसिंहाची तपश्चर्या करत होता. त्याने चोवीस वर्षे तप केले पण त्याला नरसिंह देवता प्रसन्न झाली नाही. त्यामुळे राजा क्रोधाविष्ठ झाला व त्याने नरसिंहाच्या मूर्तीच्या हातावर प्रहार केला. त्यानंतर त्याला राज्यप्राप्ती झाली. तो द्वारहाटला गेला व राज्य करू लागला.
-प्रकाश लेले
Leave a Reply