हेन्री रॉईस यांचा जन्म २७ मार्च १८६३ रोजी झाला.
मोटारीच्या जन्मापासून त्यात सुधारणा होत आहेत. मोटारींच्या इंजिनची क्षमता, प्रवासी संख्या आणि त्यातील सुविधा यानुसार त्यांचे वर्गीकरण होत गेले. मग त्यात प्रवासी वाहने आणि उद्योगांसाठी वापरली जाणारी वाहने हे गट पडले. मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस. हेन्री रॉयस यांना इलेक्ट्रिक इंजिनीरिंगमध्येमध्ये नैपुण्य प्राप्त होते. त्या बळावर एक यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपाला आले. त्यांनी १९०३ मध्ये एक सेकंड हॅण्ड गाडी विकत घेतली. त्या गाडीच्या नि:कृष्ट कामगिरीमुळे ते निराश झाले. यातूनच त्यांनी स्वत:हून दोन सिलिंडरची मोटार कार तयार करण्याचे ठरवले. १९०४ पर्यंत त्यांना ही मोटार पूर्ण करण्यात यश आले. या गाडीची कामगिरी चांगली होती. आणि म्हणूनच त्यांच्या या गाडीची ख्याती ब्रिटनमधील तत्कालीन सर्वश्रेष्ठ ड्राइव्हरपैकी एक असणाऱ्या चार्ल्स स्टुअर्ट रोल्स यांच्यापर्यंत पोहोचली. १९०४ मध्ये रोल्स आणि रॉयस यांची मँचेस्टर येथे भेट झाली. दोघांनी मिळून कार कंपनी सुरू करण्याचे ठरवले आणि रोल्स रॉयस कार कंपनी जन्माला आली. ‘रोल्स रॉईस कंपनीची सुरुवात १५ मार्च १९०६ रोजी झाली होती.
फ्रेडरिक हेन्री रॉईस आणि चार्ल्स स्टीवर्ट रोल्स यांनी १९०६ मध्येच पहिली सिल्व्हर घोस्ट तथा फँटम बनवली होती.
कंपनीच्या सुरुवातीच्या काही वर्षांतच त्यांच्या ‘सिल्व्हरघोस्ट’ या गाडीलाच जगातील सर्वोत्कृष्ट गाडी म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली. अवघ्या वर्षभरात या गाडीने वेगवान आणि भरवशाची म्हणून नावलौकीक मिळवत सुवर्ण पुरस्कारही मिळवला होता. मोटार उद्योगाची ही केवळ सुरुवातच होती आणि तरीही रोल्स रॉयसने या नावाने त्यांचे वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. क्वीन ऑफ द कार्स म्हणजे रोल्स रॉइस! रोल्स रॉईसची प्रत्येक कार आजसुद्धा पूर्णपणे हातानेच बनवली जाते. रोल्स रॉइसची खासियत म्हणजे ही एक कस्टमाइझ्ड कार आहे. कस्टमाइझ्ड गाडी म्हणजे ज्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे बनवून दिली जाते. विशेष म्हणजे ही हॅण्डमेड गाडी आहे. त्यामुळे प्रत्येक रोल्स रॉइस ही आतून एकसारखी असेलच असं नाही. किंबहूना प्रत्येक रोल्स रॉइस ही वेगळीच असते. ती खास ऑर्डर देऊन बनवून घ्यावी लागते. त्यातही ग्राहक मजामजा करतात. गाडीच्या आत एका छोट्या बारपासून वाचनालयापर्यंत आणि मिनी थिएटरपासून बेडरूमपर्यंत काहीही करता येतं. सीटच्या कव्हरपासून ते आतल्या डॅशबोर्ड आणि रंगापर्यंत रोल्स रॉइस ग्राहकाला हवं ते देते. आतलं इंटीरिअर ग्राहकाला पाहिजे त्या लाकडापासून बनवतात. या गाडीसाठी ४३ हजार शेड्समध्ये रंग उपलब्ध आहेत.
हेन्री रॉईस यांचे २२ एप्रिल १९३३ रोजी निधन झाले.
Leave a Reply