पूर्वी दंतमंजन म्हणून पावडर स्वरूपात वनौषधींचा वापर होत असे. आता नीम, मिसवाक, लवंग, बाभूळ, पुदिना, पिंपळी यांसारख्या वनौषधींचा समावेश असलेल्या अनेक हर्बल टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कापूर, तोमर बीज या पदार्थांचा समावेशही काही टूथपेस्टमध्ये केलेला असतो. या वनौषधींमध्ये कोणती रसायने असतात, जी दातांचे संरक्षण करतात?
दातदुखीसाठी लवंग तेलाचा वापर आजही केला जातो. लवंगेमध्ये ॲसिटाइल युजेनॉल, मिथाइल सॅलिसिलेट, गॅलेटोनिक ॲसिड ही रसायने असतात. मिथाइल सॅलिसिलेट संवेदनाहारक म्हणून कार्य करते. पुदिन्याचा उपयोग श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास होतो. पुदिन्याच्या अनेक जाती आढळतात, त्यातील पेपरमिंटच्या तेलाचा उपयोग स्वादाकरिता अधिक केला जातो. जपानी मिंटच्या तेलाचाही वापर केला जातो. या तेलात मेंथॉल, मिथाइल अॅसिटेट, मेंथोन आणि हायड्रोकार्बन असतात. तोमर बीज सूक्ष्म जीवाणूरोधक म्हणून टूथपेस्टमध्ये तोमर बीजामध्ये वापरतात. फ्युरोक्विनोलाइंस, निटिडीन, कार्बेझोल्स असे अनेक प्रकारचे अल्कलॉइड्स असतात.
बाभूळ झाडाच्या सालीचा वापर टूथपेस्टमध्ये करतात. बाभूळ झाडाच्या सालीत टॅनिन आणि गॅलिक अॅसिड असते, त्यामुळे साल तुरट-कडवट लागते. बाभूळ दात आणि हिरड्या मजबूत करते.
मिसवाक, मराठीत पिलू आणि ज्याला टूथब्रश ट्री असे म्हणतात, मिसवाकच्या काड्या कडुलिंबाच्या काड्यांसारख्या टूथब्रश म्हणून वापरत असत. मिसवाकमध्ये जीवाणूरोधक गुणधर्म आहे. मिसवाकमुळे दातांवरील किटण (प्लाक) कमी होते, हिरड्या आकसून येतात. मिसवाकमध्ये कार्बोहायड्रेट, ट्रायमिथाइल अमाइन, क्लोराइड्स, व्हिटॅमिन सी, ग्लाकोसाइड्स, फ्लोराइड, सिलिका आणि काही प्रमाणात टॅनिन फ्लेवॉनॉइड्स, स्टेरॉल्स ही रसायने असतात. सिलिका अपघर्षकाचे कार्य करते.
कापूर हा किटोन या कार्बनी संयुगाच्या वर्गातील रासायनिक पदार्थ आहे. पिपळी आणि कापूर जंतुनाशक आहे तसेच श्वासाची दुर्गंधी आणि दातदुखी दूर करण्यासाठी कापराचा उपयोग होतो. पिपळीमध्ये पिपरीन हे अल्कलॉइड असते. कोरांटीमध्ये (वज्रदंती) अल्कलॉइड आणि पोटॅशियम असते. कोरांटीमुळे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. या वनौषधींव्यतिरिक्त दालचिनी, जांभूळ साल, ज्येष्ठमध, आवळा यांचाही समावेश हर्बल टूथपेस्टमध्ये केला जातो.
Leave a Reply