२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे.
आज अचानक तू -नळीवर ” पडद्यामागील सुमित्रा भावे ” हे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विवेचन ऐकले. मराठी रसिकांना समृद्ध करून सुमित्रा भावे आत्ताच पल्याड परतल्या आहेत. त्यांचा अलीकडचा (आणि शेवटचा ) “दिठी “बघायचा राहिला आहे अन्यथा त्यांच्या चित्रकृती मी पाहिल्या आहेत.
या विवेचनात डॉ नाडकर्णी सुमित्रा भावेंच्या दोन लघुपटांबद्दल आस्वादक अनुभव कथन करताना कानी पडले- ” साखरेपेक्षा गोड ” ( मी पाहिला होता) आणि “फिर जिंदगी “. हा कसा कोण जाणे माझ्या नजरेतून सुटला होता. डिसेम्बर १५ पासून आजतागायत २० लाखांहून अधिक रसिकांनी हा लघुपट पाहिल्याची तू -नळीची नोंद आहे. माझ्या “हेल्मेट” कथेत आणि “फिर जिंदगी “च्या कथेत साम्य आहे. लगेच बघितला.
मृत्यूला उद्देशून “आनंद ” मध्ये अमिताभच्या खर्जभऱ्या आवाजात गुलज़ारची एक नज्म आहे-
” मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको”
“फिर जिंदगी “मध्ये नसीरच्या रुहानी आवाजात दस्तुरखुद्द सुमित्रा भावेंच्या ओळी आहेत मृत्यूला उद्देशून –
” ए मौत झुकाले अपना सर और छुपाले अपना चेहेरा
माना के तेरे कदमोंमें आकर रुक जाते हैं सारे रास्ते
तुझसे जीत सका ना कोई
एक ना एक दिन आनाही हैं तेरी पनाहोंमे
मगर देख खोलकर अपनी आँखे
खुले किये हैं हमने दिलके दरवाजे
पीकर घुंट गमके भी
और ढुंढ निकाले हैं नये तरीके
तुझे बेबस मुकर्रर करनेके
भले चली जाए जान
पर धडकता हैं दिल उस जिस्ममे
कई अंजान, मजबूर जिंदगीयोंकी खातिर
और जिस्म के दरवाजे खोलकर निकल आते हैं
टुकडे जिगर के, कलेजेके, कुदरत के कई करिश्मोंके
और इन्सानका हुनर दिखाकर
अपने करतब बक्षता हैं नई जिंदगी कई रुहोंको
वो तुम्हारी उखाड दिई हुई जान
अब फिरसे उमडने लगी हैं उन रुहोंमें
आनेवाली अनगिनत सदियों तक
फिरसे जिंदा रहनेके लिए
दोन्ही चित्रपटांचे शेवट कवितेने !
फरक इतकाच – डॉ आनंद नाडकर्णी म्हणतात तसा “फिर जिंदगी ” मध्ये जाणारा जीव “बाय “करतो,आणि त्याची किडनी मिळालेली रुकसाना स्वतःचे डॉक्टर होण्याचे स्वप्न बघत जीवनाला “हाय ” म्हणते. दोघांच्या मधला “फिर जिंदगी “- ५५ मिनिटे, २ सेकंदांचा ! एवढा वेळ पुरेसा आहे जीवन समृद्ध करण्यासाठी. आणि शक्य झाले तर नाडकर्णींचे आस्वादक भाष्यही ऐका- लघुपटाचे आकलन होण्यासाठी आणि सुमित्रा भावे समजण्यासाठी !
- फिर जिंदगी – https://www.youtube.com/watch?v=xHwHPlUZuOU
- पडद्यामागील सुमित्रा भावे- https://www.youtube.com/watch?v=8BYBjWsJ39k
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply