उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, बधीरपणा, सूज, थकवा, धूसर दिसणे, झोपेच्या तक्रारी अशी लक्षणे दिसू शकतात. त्वरित वैद्यकीय तपासणी करणे हे उत्तम ठरते. उच्च रक्तदाब कमी करून योग्य पातळीवर आणण्यासाठी योग्य आहार-विहार आणि औषधांची गरज असते. रक्तदाबाचा समतोल राखण्यासाठी हृदय, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, मेंदू, रक्तातील काही घटक हे सर्व एकमेकांशी पूरक असे काम करीत असतात. रक्तदाबावर परिणाम करणारी औषधे ही म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे (काही औषधे मेंदूवर, काही मूत्रपिंडावर, तर काही हृदयावर) काम करतात. त्याप्रमाणेच त्यांची वर्गवारी केलेली आहे. जरी ही औषधे वेगवेगळ्या कार्यप्रणालीने काम करीत असली, तरी अंतिम परिणाम हा रक्तदाब सामान्य होणे हाच असतो.
औषधयोजनेचे नीट पालन केले तर रक्तदाबाचा रुग्ण दीर्घकाळपर्यंत अगदी सामान्य जगू शकतो. रक्तदाबाच्या बाबतीत अनेक रुग्ण, विशेषतः महिला रुग्ण दुर्लक्ष करताना दिसतात. आजाराचे निदान झाल्यावर काही महिने औषधे नियमित घेतली जातात. मग डॉक्टरांकडच्या तपासणीत रक्तदाब सामान्य दिसू लागला, की हळूहळू औषधांबाबत शैथिल्य येते. कायमस्वरूपी औषधोपचार आणि नियमित रक्तदाब तपासणी (शक्य झाल्यास दर महिना/ १५ दिवसांनी) असे डॉक्टरांनी बजावले असतानाही गोळी स्वतःच्या मनाने बंद केली जाते किंवा अनियमितपणे घेतली जाते. गोळी घेण्याचे सोडल्यावर काही काळ रक्तदाब सामान्य राहीलही, पण कधीतरी धावपळ, ताण वा इतर काही शारीरिक, मानसिक कारणांमुळे तो अचानक प्रचंड वाढू शकतो. त्यातच हा वाढलेला रक्तदाब नियंत्रित करणारे औषध कधीच बंद केलेले असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्राव, मूत्रपिंड निकामी होणे, अशा समस्या उद्भवून रुग्णाला थेट आय. सी. यू.मध्ये दाखल व्हावे लागते.
-डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply