नवीन लेखन...

“उच्चस्थ शिखरम्” – कळसूबाई

निसर्गाने महाराष्ट्राला मुक्त हस्ताने भरभरुन दिलं आहे. पण सर्वाधिक खुणवणारी बाब जर इथली कोणती असेल तर ती म्हणजे अथांग समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. गेल्या काही वर्षांपासून “सह्याद्री” चं नाव, जगातल्या अॅडवेंचर्सच्या तोंडावर रुंजी घालतय, विशेष म्हणजे त्याच्या भेटीसाठी ट्रेकर्सचा ओघ वाढतोय. पण या सह्याद्रीनं त्याच्या चाहत्यांसाठी आणखीन एका आव्हानासाठी प्रेरीत केलं आहे. “कळसूबाई” च्या रुपानं, महाराष्ट्रातलं माऊंट एव्हरेस्ट म्हणून ख्याती असणारं हे शिखर निसर्ग प्रेमी, गिर्यारोहकांच्या दृष्टीनं “थ्रिलिंग अनुभवा” ची पर्वणी म्हणता येईल.

या गडाबाबत अख्यायिका प्रचलित आहे ती म्हणजे “एकेकाळी कळसू नावाची मुलगी, पाटलाच्या घरी कामास होती, त्याच्याकडे कामाला लागण्यापूर्वी तिनं पाटलाच्या घरच्यांना एक अट घातली की भांडी घासणं किंवा साफसफाई सारखी कोणतीच कामं करणार नाही, पण एके दिवशी पाटलाकडे अतिथी आले होते व त्याने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडलेली कळसू तिथून पुढे डोंगरावर राहू लागली. तोच डोंगर पुढे कळसूबाईच्या नावानं ओळखला जाऊ लागला; आजही या डोंगराच्या शिखरावर छोटं मंदीर स्थित आहे”.
कळसूबाई ला जाण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, हे जिल्हे नजिकचे ठरतात तसंच कल्याण पासुनही जवळ आहे. कळसूबाई इगतपुरीच्या अग्नेय दिशेस वसलं असून मुंबई-कल्याण मार्गे तुम्ही खासगी वाहनांनी कळसूबाईला येणार असाल तर कसारा घाटातून नागमोडी वळणांनी इंदोरे गावातून तुम्हाला कळसुबाईचागड चढता येऊ शकतो, जे वसलय अगदी डोंगराच्या पायथ्याशी, बारी या गावातून सुद्धा कळसूबाईचा किल्ला सर करु शकता. पण जर का तुम्ही ट्रेक साठी कळसूबाईला चालले असाल तर चढताना इंदोरे मार्गाहून व उतरताना बारी गावाच्या मार्गे आल्यास तुम्हाला खर्‍या अर्थाने ट्रेक केल्याचा आनंद मिळू शकतो, कारण दोन्ही मार्ग भिन्न असल्यामुळे “अॅडव्हेंचर” कशाला म्हणतात हे नवोदित ट्रेकर्सना सुद्धा कून येतं.
इंदोरे गावातून चोहीकडे आपल्याला आढळतात ते उंचच-उंच डोंगर माळा आणि त्यावर पसरलेली हिरवाई. पावसात तर हे रुप पाहण्या सरखच असतं, त्यातही हलक्याशा धुक्यांच्या व पावसाळी ढगांचे हलके मुलायम कापसासारखे गोळे, आणि रिमझिम शिडकावा ह्यामुळे परिसर आणखीनच मोहक वाटतो.
गडावर चढाई करण्याआधी काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्यात त्या म्हणजे, पाठीवर ओझं होईल इतकं सामान सोबत ठेवू नये, गावच्या एखाद्या घरात तुम्ही सुपूर्द करुन निश्चिंत मनानं आपल्या प्रवासासाठी मार्गस्थ होऊ शकतात. चढताना आपल्याला गावकर्‍याची किंवा वाटाड्याची हमखास मदत मिळू शकते, पण त्यांना तशी आगाऊ सूचना देणं गरजेचं ठरतं. दुसरं म्हणजे कळसूबाईची चढाई काहिशी कठीण स्वरुपाची व ५ ते ६ तासांच अंतर पार करायला लावणारी असल्यामुळे तुमच्या सोबत ड्रय फ्रुटस्, खाकरा, बिस्किट्स, केक, लिंबू पाणी, १ ते २ लिटर पाण्याची बाटली हे सर्व असू द्यावेत, तसंच आपल्या ग्रुप लिडरच्या सूचनांचं पालन करुन सतत घोळक्यानं राहणं ही महत्वपूर्ण आहे.
चढाई करण्याच्या वेळी, गावकर्‍यांनी केलेली भात, भाज्यांची शेती आपल्या नजरेस पडते, व त्यातुन वाट काढत लाल मातीच्या चिंचोळ्या रस्त्याहून पायवाट पुढे सरकत जाते, वाटेत चिखल, सरकते दगड किंवा खडतर रस्ता असल्यानं सावधपणे पाऊलं सरकवावी लागतात. साधारणत: एक-दीड तासाची चढाई केल्यावर “कळसूआई” चं नवीन मंदीर आपल्या नजरेस पडतं, ज्यांना उंचीचा टप्पा गाठता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे मंदीर बांधलं आहे, ४०-५० जण घोळका करुन बसतील इतकी जागा येथे आहे, त्यानंतरचा प्रवास थोडासा खडतर होत जातो तो नागमोडी कपार्‍यांमुळे, तर छोटाश्या ओढ्यामुळे गडाचा ३० टक्के भाग सर केल्यावर, मागे वळून पाहताना केवळ ओबड-धोबड पण हिरवाईनं व्यापून गेलेला डोंगराचा पायथा नजरेस पडतो, चढताना मधुनच सरपटणारे प्राणी, तर वार्‍याच्या झुळुकांवर डोलणारी फुलझाडे आपलं चित्त वेधून घेतात. गडावर अधून मधून येणारे कठीण खडक त्यातून तसंच मानव निर्मित पायर्‍यांमधून एक एक पाऊल पुढे जात अनेक कठीण वाटांवरुन मार्गस्थ होणं ही क्रमप्राप्त ठरतं त्यासाठी ट्रेकर्सकडून जाडसर दोरखंडाची सोय करण्यात येते, तर कुठे कायम स्वरुपी साखळदंड बसवलेले आपल्याला दिसतात, ज्यामुळे चढाईची मोहिम अधिक सुकर होत जाते, जस जसं कासच्या भागावर आपण पोहोचतो तेव्हा गड काही अंतरावर असल्याचं आपल्याला जाणवतं, अधुन मधून उगवलेल्या गवतावर चालल्यानं काही अंशी तर चढाई पटापट होत राहते; जसजसं पुढे सरकतो तसा वार्‍याचा वेग व पावसाची तीव्रता वाढू लागते, कारण भवताली फक्त ढग आणि दूरवर विस्तीर्ण धुकं ही नजरेस पडतं, अखेर तो टप्पा येतो ज्याची आपल्याला उत्कंठा असते शिखरावर स्थित असलेल्या मंदीरा ठिकाणी तिथे जाण्यासाठी एका लोखंडी शिड्यांवरुन जाण्यासाठी मार्ग आहे, अगदी अलगतरित्या पाऊले टाकत अखेर त्या “परमोच्च शिखरापर्यंत” आपण येऊन पोहोचतो त्याचप्रमाणे कळसू आईचं दर्शन घडतं, इथुन खाली पहाण्याचा आनंद आणि त्यानंतर मनातील चेतना, सोबत विहंगम दृश्याची बरसात; नजार्‍याचं वर्णन करण्यासाठी कदाचित शब्द ही अपुरे पडावेत असं रुप आपण डोळ्यात अगदी अदाश्यासारखं साठवतो व गड सर केल्याचा आनंद असतो, तो काही औरच!
गडावरुन जर का नजारा स्वच्छ असेल तर फोटोग्राफीसाठी उत्तम स्कोप असतो, पण पावसाळी वातावरणात फोटो खास येतील याची अपेक्षा नसते, शेवटी मनातल्या “मेमरी कार्ड” वरील आठवणी चिरंतनच असतात; या सर्वांग सुंदर दृश्याचा मनमुराद सुख उपभोगल्यावर उतरण्याच्या वेळी, लोखंडी शिड्याहून उजवीकडे उतरणारी पायवाट आपल्याला बारी गावात घेऊन जाते. हा मार्ग पहिल्या मार्गापेक्षा कितीतरी “स्मुथ वाटतो”, म्हणूनच बरचसे ट्रेकर्स चढाईसाठी सुद्धा हाच मार्ग निवडतात.
उतराईच्या समई वाटेवर आपल्याला खोलवर पसरलेली दरी, अथांगता, विरुद्ध दिशेने वाहणारे वारे, तसंच रंगबिरंगी शालू सारखी झाडा पानांनी नटलेली सृष्टी डोळ्यांचं पार्ण फेडून टाकते, अशातच आपण खाली उतरताना पलिकडच्या शिखरावरुन दुधासारखे कोसळणारे – फेसाळ धबधबे, जणू काही निसर्गानं आपल्या स्वागतासाठी परिधान केलं आहे असच वाटत राहतं; सरते शेवटी जसजसं आपण गावाच्या जवळ येतो तेव्हा शेतीची कामं करताना काही शेतकरी दिसतात, तसंच त्या परिसरातले चिखल तुडवत एकदाचे आपण बारी गावात पोहोचतो व आनंदाचा सुस्कारा देत त्या सह्याद्रीच्या राजाला मानाची सलामी देत आठवणींचा संच मनात ठेऊन, ट्रेकचा “रॉकिंग एक्सपिरियन्स” कायम उराशी बाळगून राहतो, कधीही न विसरण्यासाठी …….
“सह्याद्रीच्या उच्च शिखरा
नाव तुझे कळसूबाई
राकट विलोभनीय
सर्वार्थानं शोभे हे रुप
एव्हरेस्टला ही साद घालशी
भूषण आमच्या महाराष्ट्र देशी….”

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..