नवीन लेखन...

अमेरिकेतले हायवेज – मानवी प्रगतीचे निदर्शक

आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो.

या तीन आठवडयांच्या वास्तव्यात आम्ही १४ दिवसांची मोठी ट्रिप स्वतःच्या कारने केली. या ट्रीपमध्ये आम्ही न्यूयॉर्क ते अमेरिका खंडांचं शेवटचं टोक असलेल्या ‘कीवेस्ट’ (फ्लोरिडा) असा साधारण ११५०० ते १२००० किमीचा प्रवास केला. या प्रवासात आम्ही न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टिकट, व्हर्जिनिया, पेनसिल्वानिया, जॉर्जिया, कॅरोलिना, टेनिसी, फ्लोरिडा अशा अनेक राज्यातून प्रवास केला.

खरंच काय रस्ते आहेत तिथे. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच त्यांनी याचा खोल विचार करायला सुरवात केली. रस्ते बांधणी देखील हळूहळू सुरु झाली. या विचाराने वेग घेतला त्याचं मुख्य श्रेय राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर (१९५३) यांना जातं. त्यांनी या संबंधात ‘फेडरल एड हायवे ऍक्ट, १९५६’ हा कायदा आणून अत्यंत शिस्तशीरपणे हे विकसित करायला सुरवात केली. त्यात सुरक्षितेला सर्वोच्च स्थान देऊन त्या प्रमाणे बांधकामाचं स्टॅंडर्ड, त्याची नियमित निगराणी, वेगाचे नियम, रस्त्यावरच्या खुणा अशा अनेक गोष्टींवर भर दिला. आज ५०-६० वर्षांनंतरही हे रस्ते अगदी आजचे मॉडर्न वाटतात. आजही एवढी प्रचंड वाहतूक असूनही हे रस्ते ती सहज करत आहेत.

रस्त्याच्या प्रत्येक बाजूला – डावीकडे एक लेन ठेवलेली असते. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी. ही कोणीही चुकूनही वापरत नाही.
तसंच प्रत्येक बाजूला अगदी उजवीकडे दीड दोन फुटांची एक खडबडीत स्ट्रीप असते आणि त्या पलीकडे एक रुंद लेन असते. या खडबडीत स्ट्रीपला ‘अलर्ट स्ट्रीप’, ‘स्लिपर लाइन’ असंही म्हणतात. रात्री-पहाटे जर कोणाला डोळ्यावर झापड येऊन गाडी रस्ता सोडायला लागली तर ती या स्ट्रीपवर येते आणि मग खडबडीत सरफेसमुळे तिला हादरे बसतात. हादरे बसल्यावर ड्रायव्हर सावध होतो. त्या स्ट्रीपपलीकडे देखील मोठी रुंद लेन ठेवल्याने त्याला गाडी सावरायला जागा आणि वेळ मिळतो. अशा स्ट्रीप लाखो किमीच्या रस्त्यांवर केलेल्या आहेत.

या हजारो-लाखो किमी पसरलेल्या रस्त्यांवर दर ७०-८० किमीवर (साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर) प्रवास्यांसाठी ‘रेस्ट रूम्स’ आहेत. त्याची उत्तम देखभाल असल्याने त्या अत्यंत स्वच्छ असतात. या रेस्टरूम्स चोवीस तास चालू असतात. खूप ठिकाणी या बाजूला कॉफी शॉप देखील असतं. अगदी असेच ठराविक अंतरावर गॅस स्टेशन्स म्हणजे पेट्रोल पंप्स देखील आहेत. इथे मात्र आपलं आपणच इंधन भरावं लागतं. अशा प्रत्येक पेट्रोल पंपावर एक मोठं कॉफी शॉप-दुकान असतंच आणि त्यात देखील रेस्ट रूम असणं बंधनकारक असतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतके सुंदर रस्ते असूनही खूप म्हणजे खूप कमी टोल रस्ते आहेत. बहुतेक रस्ते टोल नसलेले आहेत.

अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे कमीत कमी सिग्नल्स. तुम्हाला पलीकडच्या बाजूला जायचं असेल तर डावीकडे एक लेन असते आणि पुढे भुयारी मार्ग असतो. हायवेवरून पलीकडच्या बाजूला जाताच येत नाही. हे केल्याने मुख्य ट्रॅफिकला अजिबात अडथळा येत नाही आणि अपघात होण्याची तर सुतराम शक्यता नसते. मात्र अशा भुयारी मार्गासाठी तुम्हाला साधारण १५-२० किमीचा प्रवास करावा लागतो.
रस्त्याच्या दोन बाजूंमध्ये इतकी मोठी रुंद जागा असते की चुकून एखादी वेगात असलेली गाडी घसरली तरी ती पलीकडच्या बाजूपर्यंत पोचूच शकत नाही. आणि मग दुसऱ्या गाडयांवर ती आदळायचा प्रश्नच येत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे रात्री समोरच्या गाडीचे लाइट दुसऱ्या बाजूच्या वाहनांना अजिबात त्रास देत नाहीत. बऱ्याच ठिकाणी या मधल्या भागात सुंदर झाडं झुडुपं लावल्याने खूप प्रसन्न देखील वाटतं.

सगळ्यात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे जर रस्त्यावर पहारा करणाऱ्या पोलिसाला वाटलं की तुम्ही वेगाची मर्यादा तोडली आहे. तर तो तो तुमच्या गाडीमागे त्याची गाडी सायरन वाजवत आणि मोठे लाइट लावून पळवतो. तुम्हाला ते कळल्यावर तुम्ही गाडी थांबवून गाडीतच बसून राहायचं असतं. तो त्याच्या गाडीतून तुमची नंबरप्लेट स्कॅन करून सगळी माहिती घेतो. तो मग खाली उतरून तुमच्या (ड्रायव्हर) जवळ येतो. तुम्ही काच खाली घेऊन त्याच्याशी बोलायचं असतं. मग तो विचारेल आणि सांगेल त्याप्रमाणे करायचं असतं. जर कोणी ड्रायव्हर खाली उतरला तर त्याला गोळी मारायचे अधिकार त्या पोलिसाला असतात. आपल्यासारखी चिरीमिरी वगैरे पद्धतींचा तिथे विचार देखील केला जात नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

खूप मोठा आणि सुंदर विषय आहे. कितीही लिहिलं तरी कमीच. आम्ही ही अटलांटिक महासागराच्या पूर्व किनाऱ्याची ट्रिप खूप एन्जॉय केली… आणि ती नक्कीच अविस्मरणीय अशी झाली. आता पूर्व किनारा ते पश्चिम किनारा अशी रोड ट्रिप करायचा मानस आहे … किंबहुना त्याही पुढे.

— प्रकाश पिटकर
Photo Copyright : Prakash Pitkar

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

1 Comment on अमेरिकेतले हायवेज – मानवी प्रगतीचे निदर्शक

  1. Dear Sir, very nice account about roads
    Recently we came across two major accidents one on samruddhi highway and another three trains crashed. We must learn and make efforts regarding such incidents regards Shailesh

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..