‘धंदा म्हटला म्हणजे तो बुडणारच! धंदा म्हणजे अळवावरचे पाणी! ज्याला नेकरी मिळत नाही तो धंद्यात पडतो!’ उद्योग व्यवसायाविषयी मराठी समाजात अशी विचित्र मनोवृत्ती असल्याचे मला आढळून आले आहे. इतर जमातीत उद्योग व्यवसाय असलेल्या कुटुंबात मुलगी देणे प्रतिष्ठेचे समजले जाते. आपल्याकडे मात्र अशा कुटुंबात मुलगी देण्याआधी शंभर वेळा विचार करण्यात येतो. अजुन तरी या मनोवृत्तीत विषेश फरक झाल्याचे निदान मला तरी आढळून आले नाही.
मराठी माणूस हा नेहमी धंद्यात ‘पडतो’. तो कधी आपणहून धंद्यात येत नाही. जो माणुस धंद्यात ‘पडतो’ त्याचा धंदा पण शेवटी पडतोच’. पण जो माणूस आपणहून, स्वखुषीने, आत्मप्रेरणेने, जिद्धीने किंवा इर्षेने, आवडीने धंद्यात येतो त्याचा धंदा कधीच बुडत नाही तर तो तरतो, फोफावतो, मोठा होतो असे मी पाहीले आहे. मग या साठी त्याचे वय, शिक्षण, क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, फॅमिली बॅकग्राऊंड, आर्थिक परिस्थिती, स्त्री का पुरुष, जात-पात-धर्म, तो मराठी मिडियम मधून शिकला का इंग्लीश मिडियम मधून शिकला या सगळ्या गोष्टी गौण, दुय्यम किंवा कमी महत्वाच्या म्हणजेच सबस्टँडर्ड ठरतात. याचे उत्तम उदाहरण आहे पुण्याचे एक उद्योजक सदाशीव रामा बोराटे उर्फ अण्णा.
अठरा विश्वे दारीद्रय असलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या एखाद्या खेडुत मुलाने लहानपणापासुनच कारखानदार, इंडस्ट्रियालीस्ट किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने बघणे हा शुध्ध वेडेपणाच! त्यांतुन उत्तम नोकरी मिळविण्यासाठी लागणारी दणदणीत क्वॉलिफिकेशन्स हाताशी असताना चालुन आलेली चांगली नोकरी नाकारुन नोकरिचा दरवाजा स्वतःसाठी कायमचा बंद करण्याचे धाडस दाखवणे हा अजुन एक मुर्खपणा! त्यांतही स्वतःला कांही इन्कम नसताना हायस्कुल टीचर असलेल्या आपल्या बायकोला पण नोकरी सोडायला लावुन तिच्या येणार्याय नीयमीत उत्पन्नावर गदा आणणे हा तर मुर्खपणाचा कळसच! पण अशी मुर्ख किंवा वेडी माणसेच काहीतरी भरीव कामगिरी करुन दाखवत असतात. म्हणुनच ऍपलच्या स्टीव्ह जॉब्ज सारखे लोक ‘स्टे हंग्री, स्टे फूलीश’ ( Stay Hungry, Stay Foolish ) ‘ ऊपाशी रहा, मुर्ख बना’ असा उपदेश करत असतात ते उगीच नाही. सुप्रसिद्ध पार्श्व गायिका श्रीमती आशा भोसले एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की घरची गरिबी आणि पोटातील भुकेची आग यामुळेच त्या श्रेष्ठ गायिका बनल्या. अशी पोटातील भुकेची आग व गरिबिचे चटके त्यांना बसले नसते तर त्या आत्तासारख्या श्रेष्ठ गायिका कधीच झाल्या नसत्या. आण्णा सुद्धा याच कॅटेगरीतले आहेत.
कारखानदार होण्याचे स्वप्न जरी अण्णांनी उराशी तरी बाळगले असले तरी करखनदार व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कुठे माहित होते? अण्णासारखा ग्रामीण भागातून आलेला, बिना इस्त्रीचे साधे कपडे व चपला घालणारा, भाड्याच्या सायकलवर फिरणारा, किरकोळ शरिरयष्टी व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला, ज्याला धड इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही असा, ज्याच्या खिशात गावाला जाण्यासाठी लागणार्यास एस.टी. भाड्याचे पैसे सुद्धा नसतात अशी दरिद्री अवस्था असलेला मराठी माणूस कारखानदार कसा होऊ शकेल असेच सर्वांना वाटायचे.
पण जे मोठी स्पप्न बघायचे धाडस दाखवत असतात व त्या दिशेने प्रयत्न करत असतात त्यांची स्वप्ने नेहमीच खरी ठरतात. आज अण्णांचे एक नाही, दोन नाही तर चक्क पाच कारखाने आहेत. त्यातील दोन पुण्याला, दोन सातारला व एक चाकणला आहे. प्लॅस्टिक मोल्डिंगच्या क्षेत्रात त्यांच्या कंपनीचे मोठे नाव झाले आहेत. टाटा मोटर्स, फोक्स वॅगन, जनरल मोटर्ससाख्या मोठ्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत. 90 कोटीच्या वर टर्वओव्हर आहे. 200 माणसे काम करीत आहेत. त्यांना चार मुले-तीन मुली व एक मुलगा आहे. त्यातील दोन मुली व मुलगा क्वालिफाईड इंजिनिअर तर एक मुलगी एम.बी.ए. आहे. बि.कॉम. झालेला त्यांचा पुतण्या ‘उत्तम’ हा उत्तम इंजिनिअर झाला आहे. प्लॅस्टिकला लागणारे मोल्ड बनवण्यात त्याने प्राविण्य मिळवले आहे. जर इंजिनिअर व्हायचे असेल तर त्यासाठी इंजिनिअरींगची क्वालिफिकेशन्स असलीच पाहीजेत असे नाही. जर आवड असेल तर कोणालाही उत्तम इंजिनिअर बनता येते याचे ‘उत्तम’ हे उत्तम उदाहरण आहे. ज्यांची भाड्याने जागा घेण्याची ऐपत नव्हती व भाड्याच्या सायकलवरून फिरायची पाळी होती त्याच अण्णांचे आज बंगले आहेत, गाड्या आहेत. थाटात फॅरीन टुर्स करत आहेत. नोकरीत हे कधीच जमले नसते असे त्यांचे म्हणणे आहे.
अर्थात अण्णांचा हा प्रवास काही साधा, सरळ व सुखाचा झालेला नाही. पार्टनरने ऐन वेळेला दगा देणे, लोकांनी फसवणे किंवा टोप्या घालणे, अंडर एस्टिमेट करणे, थोड्याश्या मोबदल्यात त्यांच्या फॅक्टरीवर कबजा करण्याचा प्रयत्न करणे, बिझनेच्या मोठ्या मोठ्या थापा मारून त्यांना फुकटात राबवून घेणे, वेगळे घर घ्यायला पैसे नाहीत म्हणुन फॅक्टरीतच संसार थाटणे, केवळ तीन भांड्यांपासून संसाराला सुरवात करणे, हेवे दावे, लोकांच्या पोटात दुखणे अशा अनेक संकटांना तोंड द्यायची पाळी त्यांच्यावर आली. पण ते डगमगले नाहीत. याचवेळी त्यांना काही चांगली माणसे पण भेटली. असे असुनही आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटु दिली नाही. आपल्या गावी पण त्यांनी कारखाना काढला होता. त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषीक पण मिळाले होते. पण विजेच्या समस्येमूळे त्यांना हा कारखाना बंद करावा लागला.
जास्तीत जास्त मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात यावे, कारखानदार व्हावे, लघु उद्योजक व्हावे, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी या क्षेत्रात पुढे यावे, ग्रामीण भागात कारखाने काढावेत या साठी अण्णांचे तळमळीने प्रयत्न चालू असतात. यासाठी त्यांची विनामुल्य मार्गदर्शन देण्याची तयारी असते. त्यांचे म्हणणे आहे की लघु उद्योग हा मोठ्या उद्योगाचा पाठीचा कणा आहे. त्यांच्या पासून प्रोत्साहन घेऊन त्यांच्या गावाजवळील गावातील काही तरुणांनी कारखाने काढले आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर आधरलेले माझे ‘हिम्मते मर्दा’ हे पुस्तक इ-साहित्य प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून ते विनामुल्य उपलब्ध आहे. यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी joshiulhas5@gmail.com या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा. अण्णांशी संपर्क साधायचा असल्यास borate.sr@elite-group.co.in या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे.
— उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
Leave a Reply