तोंडात पटकन रुळतील आणि गुणगुणता येतील, अशा चाली देणे ही रवि शंकर शर्मा ऊर्फ मा.रवी यांची खासियत होती. आपल्या सोप्या आणि गोडवा राखणाऱ्या संगीताने मा.रवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
रवी यांनी संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतले नव्हते, तरीही त्यांना संगीताचा कान निश्चितच होता. लहानपणापासून आपल्या वडलांकडून ऐकलेली भजने आणि आजुबाजूला ऐकू येणार्या संगीताचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी त्यावरच स्वरसाज चढविला. विशेष म्हणजे रवी यांच्यावर अमुक पध्दतीने संगीत देणारा संगीतकार असा कोणताच ठसा उमटविता येत नाही. कव्वाली (ऐ मेरी जोहराजबीं), बालगीत (चंदामामा दूर के, टिमटिम करते तारे), गझल (दिल के अरमां आँसूओं में बह गए), क्लब संगीत (बार बार देखो), भजन (तोरा मन दर्पन कहलाए, तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा), भावगीत यासारख्या अनेक प्रकारच्या चालींमध्ये त्यांनी गुंफलेली गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत. पियानोवरील गाणी देण्यात त्यांचा हातखंडा होता. गुरुदत्त यांच्या `चौदहवी का चाँद’ चित्रपटातील गाण्यांनी रवी प्रसिध्दीच्या शिखरावर चढले. या चित्रपटाच्या शीर्षकगीताची चाल पाहिली तर उत्तररात्रीची शांतता आणि चंद्राची शीतलताच मनावर पांघरली जावी, असे वाटते. त्यानंतर आलेल्या `वक्त’मधील बहुतेक सर्वच गाणी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली. बलराज साहनीच्या तोंडची `ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं’ ही कव्वाली आजही मनात घर करून राहते, तर `आगे भी जाने ना तू’ हे गाणे ऐकणाऱ्याला स्वप्नसृष्टीत नेऊन सोडते. `धुंद’सारख्या थरारपटाचे शीर्षकगीतही लक्षात राहावे अशी त्यांची चाल आहे. यावरूनही त्यांच्या वैविध्य लक्षात येते.
अर्थात बदलत्या संगीत अभिरुचीमुळे १९८० च्या दशकानंतर रवी काहीसे मागे पडले. पण तेव्हाही `निकाह’ चित्रपटातील `दिल के अरमां’ या गाण्याने त्यांची शेवटची चमक दिसली.
रवी यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला. त्यांच निधन ७ मार्च २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply