एव्हाना सर्वत्र गुढी पाडव्यानिमित्तच्या हिन्दू नववर्ष स्वागतयात्रांची तयारी सुरु झाली असावी. सुरुवातीला डोंबिवलीचा फडके रोड व ठाकूरद्वारापर्यंत मर्यादित असलेल्या या यात्रांचं लोण आता मुंबईतील दूरवरच्या उपनगरातही चांगलंच पसरलंय. डिझायनर कुर्ता-पायजमा, डोक्यावर लफ्फेदार फेटा, पायात मोजडी व बुलेटवर मांड ठोकलेले रुबाबदार तरुण आणि मराठमोळी नऊवारी साडी किंवा पैठणी, नाकात नथ व सर्व शृंगाराने युक्त अॅक्टीव्हाधारी तरुणींचा हा मेळा खरोखर दृष्ट लागण्यासारखाच असतो. जोडीला ढोल-ताशांच पथकही असतं. त्याचं सळसळतं तारुण्य, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्यातली उर्जा पाहून मन आनंदान भरून येत आणि आपण अंमळ लवकरच जन्माला आलो याची उगीचच रुखरुखही वाटते.
या स्वागत यात्रेतील प्रत्येकजण ‘माझ्याकडे बघा’ असंच सुचवत असतो. ‘त्या’चं लक्ष वेधून घेण्यात ती व ‘ती’चे कटाक्ष झेलण्यात तो मग्न असं चित्र बहुतेकदा असत. तरुण-तरुणी एकत्र आल्यावर हे घडणारच आणि ते तस नाही घडल तर समाजाचं काहीतरी बिघडलंय हे नक्की समजावं. माणूस नटतोच मुळात कुणीतरी आपल्याकडे पहावं किंवा आपण कुणाकडे बघावं म्हणून. बहुतेकांच लक्ष ‘दिसण्यावर’ व ‘पाहण्यावर’ असत. यात वयाचा भेद नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर गुढी पाडव्याच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येणाऱ्या या तरुणाईच्या मनात गुढी पाडवा आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ याबद्दल किती माहिती आणि ममत्व असेल याबद्दल माझ्या मनात कुतूहल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू समाजातील तरुणाई एकत्र येते ही समाधानाची बाब आहे परंतु त्या एकत्र येण्यामागील अर्थ त्यांना कळला तरच त्यात अर्थ आहे अस मला वाटते. आपण तसेही उत्सवी आहोत व त्यात आणखी एका उत्सवाची भर, असं असल्यास त्यात मजा नाही. मग त्यात केवळ दिखावूपाणाच उरतो.
या तरुणांच्या मोठ्याप्रमाणावर अशा एकत्र येण्याला काहीतरी विधायक दिशा देऊन ह्या सणाचा उत्तररंग गुडी पाडवा ते गुढी पाडवा असा वर्षभर साजरा करता येणार नाही का, याचा विचार आपल्यासारख्या थोड्याश्वा वाढलेल्या लोकांनी कारण आवश्यक आहे असं मला वाटतं.
ही हल्लीची मुलं गुणी आहेत, हुशार आहेत, जगातील बऱ्या-वाईटाची त्यांना जाण आहे, जगाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. गरज आहे ती त्यांची नाळ आपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी जुळवायची आणि ती जबाबदारी आपल्यासारख्या त्यांच्यापेक्षा वयाने काहीसे मोठे असलेल्यांची. मुलांना उगाच ‘दिखावूपणा’वरून नांव ठेवण्यात काही मतलब नाही असं मला वाटतं. मग त्यात वयाच्या फरकाची सुक्ष्म अढी दिसून येईल.
जाता जाता एक विनंती, नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या. सर्वधर्मसमभाववाल्यांनी (केवढा मोठा शब्द. दमलो राव लिहीतांना) केवळ ‘नववर्ष स्वागत यात्रा’ असं नांव दिलं तरी चालेल, पण ते ‘शोभायात्रा’ असं बेगडी नांव मात्र नको..
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply