मुंबई शहरातील देवतांचा अभ्यास करताना, सन १८९५ साली श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी यांनी इंग्रजीत लिहिलेलं ‘The Hindu Temple of Bombay’ हे पुस्तक मुंबईच्या एशियाटिक सासायटीत हाती लागलं. सन १९०० अखेरीस मुंबईत असलेल्या सर्व महत्वाच्या मंदिरांचा, त्यातील देव-देवतांचा आणि त्या देवळांवर असलेल्या सरकारी किंवा खाजगी मालकीचा अत्यंत सुंदर आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.
श्री. के. रघुनाथजी हे पाठारे प्रभू ज्ञातीचे विद्वान गृहस्थ असून ब्रिटिश सरकारचं गॅझेट लिहिण्याच्या कामात होते. ह्या पुस्तकात उल्लेख असलेल्या सर्व देवळांना त्यांनी स्वत: भेट देऊन नंतरच पुस्तक लिहिलेलं आहे. सन २००४ मध्ये या पुस्तकचं पुन:मुद्रण करण्यात आलं त्यास डाॅ. अरुण टिकेकरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.
सन १९०० मधे हे पुस्तक प्रकाशित झालं, तेंव्हा मुंबईत एकूण ४०३ मंदिरं होती. मुंबई म्हणजे तेंव्हाची मुंबई. पश्चिम बाजुला माहिम आणि पूर्वेला शिव(सायन) अशा मुंबई शहराच्या हद्दी होत्या आणि आजही आहेत. तेंव्हा असलेली ४०३ मंदिरं आता ११८ वर्षांनंतर नक्कीच काही पटींनी वाढलेली असतील. आपल्या देशात राजकीय पक्ष आणि मंदिरं काही न करता वाढत असतात, कारण हेच आपले तारणहार आहेत अशी उगाचंच आपली समजूत असते. उलट आपल्याला गरीबीत ठेवून यांची श्रीमंती भलतीच वाढत असते. असो.
तुम्हाला सांगायचंय ते वेगळंच. सन १९०० सालातील या ४०३ मंदिरांपैकी सर्वात जास्त मंदिरं, म्हणजे ७९ मंदिरं आपल्या देशाची लोकप्रीय देवता हनुमानाची होती, तर महादेवाची मंदिरं एकूण ५३ होती. रामाची देवळं ३६ होती.
सध्या नवरात्र सुरु असल्याने, देवी मंदिरं किती आहेत ती मोजली, तर ती एकूण ४७ भरली. यात सर्व प्रकारच्या आणि नांवांच्या देवी आल्या. सर्वात जास्त संख्या, म्हणजे ११ देवळं जरीमरी माता किंवा मरीआईची आहेत. त्या खालोखाल ५ देवळं कालिका माता किंवा काळबादेवीची आहेत. बाकी देवळं इतर विविध देवींची आहेत.
मुत्र देवी (Goddess of Urine), खापऱ्या देवी, चेड्या देवी, समुद्रदेवी, खाडी देवी अशा वैशिष्ट्यपूर्ण नांवाच्या देवताही आहेत. यातील खाडी देवी ही सातआसरांपैकी आहे. आता या देवळांची नक्की परिस्थिती काय आहे किंवा त्यांच्या नांवा-स्वरुपात किती बदल झाला , हे मी पाहिलेलं नाही. मला आश्चर्य वाटलं ते हे, की या देवतांमधे माहिमचं प्रसिद्ध शितळादेवी मंदिर कुठेच नाही याचं. असं का असावं याचा मी घेतलेला शोध नंतर स्वतंत्ररीत्या मी तुमच्यासमोर ठेवेनच. कामाठीपुऱ्यात मात्र शितळादेवीचं एक स्वतंत्र देऊळ आहे.
खोकला देवी मात्र त्यावेळच्या बहुतेक सर्व देवळांमधे असल्याचं दसून आलं. शितळादेवी जशी ताप-देवी-कांजण्या बरी करते, तशीच खोकला बरं करणारी देवता अशी या देवतेची ख्याती. ही एक त्याकाळची गौण देवता असावी असं वाटतं. हिला मुख्य मंदिरात स्थान नाही, तर देवळाच्या बाहेर तिची स्थापना केलेली दिसते.
या देवळांमधे श्री दत्तांचं मात्र एक मंदिर आहे, तर अक्कलकोट स्वामींचा केवळ एकच मठ आहे. हल्लीची लोकप्रिय देवता साईबाबांचं तर एकही मंदिर नाही. अर्थात ते असणंही शक्य नाही. साईबाबांचं महानिर्वाण १९१८ सालात झालं व त्यानंतरच कधीतरी ते देव म्हणून तमाम जनतेमध्ये मान्यता पावले. गणपतीचीही फारशी मंदिरं त्याकाळात नव्हती.
बहुतेक देवळं भुलेश्वर-गिरगांव भागातली आहेत. त्यावेळची मुख्य लोकवस्ती त्याच भागात असल्याने तसं झालं असावं. शिवाय भुलेश्वर विभाग तिर्थस्थानापेक्षा कमी नव्हता. आजही त्या भागात भरपूर देवळं आहेत.
जरीमरी माता किंवा शितळादेवी किंवा खोकला देवी इत्यादी दवी ह्या लोकदेवता प्रकारातल्या आहेत. पूर्वी लोक आजारपणांत डाॅक्टरकडे कमी आणि या दैवतांच्या देवळात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात. आलेलं आजारपण हा दैवी प्रकोप आहे आणि देव तो नक्की बरा करेल असा त्यांचा विश्वासही असे. म्हणून तर या देवींची देवळं जास्त प्रमाणात दिसतात. मी ही लहानपणी कांजण्या आल्या असता माहिमच्या शितळादेवीच्या दर्शनाला आईसोबत गेल्याचं मला आठवतं.
हनुमानाची देवळं मुंबईतच नव्हे तर देशभरातच जास्त का असावीत याचा विचार करताना मला एक मजेशीर तर्क सुचला. मारुती हा मरुत पुत्र, म्हणजे वाऱ्याचा मुलगा. पुन्हा तो चिरंजीव आहे. आता वारा हा चिरंजीवच असतो आणि वारा किंवा हवा नसेल तर मनुष्य जगू शकत नाही आणि म्हणून मारुती लोकप्रिय आहे असं मी समजतो. घरात पाय न टिकणाऱ्या माणसाशी कुणीच लग्न करत नाही, क्लंच तर ते टिकत नाही. तिथे साक्षात लहरी हवेशी कोण हो लग्न करणार, म्हणून त्यानेच बिचाऱ्याने स्वत:हून ब्रम्हचारी राहाण्याचा निर्णय घेतला असावा की काय, असं मला वाटतं.
वरील देवळं त्या त्या जातीची देवळं म्हणून ओळखली जातं. बहुसंख्य देवळं पाठरे प्रभुंची आहेत. त्या खालोखाल कोळी समाजाची देवळं असून नंतर बहुतेक सर्व जातींची देवळं आहेत. जैन देरासरही त्या काळात होते, परंतू जैनांना त्याकाळात स्वतंत्र धर्म म्हणून न समजता त्यांना हिन्दूमध्येच धरलेलं आहे. भुलेश्वर कडील भागात मंदिरातील पुजेचं काम गुजराती समाजाकडे सोपवलेलं दिसून येत. इतरत्र गुरव किंवा त्या त्या जातीने नेमलेला पुजारी असे. पुजाऱ्याला भोपी असं म्हणत. पुजाऱ्याला पगार मिळत असे किंवा देवळात दान म्हणून आलेल्या वस्तूंमधे पूर्ण किवा अर्धा वाटा मिळत असे. मंदिरात राहायला जागाही दिली जात असे.
वरील माहिती मला मनोरंजक वाटली म्हणून तुमच्यासमोर ठेवली.
-©नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply