गड्यांनो, — या लवकरी,उघडा हा दरवाजा,
लेकरु वाट पाहे खाली,
तान्हुला बाळ माझा,
संध्याकाळ होऊन गेली ,
उशीर किती झाला आता,
बाळ माझे झोळीत खाली,
फुटू लागला मलाही पान्हा,
भुकेलेला बाळ माझा,
रडत असेल तो केव्हाचा
,घरांत दुसरे कोणी नाही,
धनीही मोहिमेवर माझा,
कुणी नसते अशावेळी,
लेकराला लागतां भुका,
मायच भूक जाणे त्याची,
जीव तडफडे कसा तिचा,–!!!
राजांस वंदन करुनी,
निरोप द्याल का माझा,
असतां ताकीद तुमची,
मोडते नियम तुमचा,–!!!
पदर आपुला पसरुनी ,
भाकिते तुमची करुणा,
समजून घ्या हो काकुळती,
खरा त्यातला आर्तपणा,
करते पुन्हापुन्हा विनवणी,
आईपण माझे जाणा,
नका दाखवू नियमांचा बडगा,
तुमचीही आई आठवा,
सोडा मला तुम्ही झडकरी,
दाखवा माझ्यावरती दया,
व्हा भाऊ माझे तुम्ही,
जाणा माझी ममता, माया,
कठोर काळजाचे तुम्ही,
का मला असे रडवतां,-?
रडते माझ्यातील आई,
समजावू कसे आता तुम्हां,–!!!
का घालता अशा भिंती,
का छळता मज गरीबा,
आई आहे चिमुकल्याची,
करत नाही जिवाची पर्वा,
विनंती तुम्हा शेवटची,
थोडा दरवाजा उघडा,
बुरूज इथे दिसल्यावरती,
थांबेन कशी मी जरा,–??
बुरुजच आता माता-पिता,
टाकते उडी लेकरासाठी,
आता विनवणी भगवंता,
तोच राहील माझ्यापाठी,–!!!
हिमगौरी कर्वे.
©
Leave a Reply