६ ऑगस्ट १९४५ची सकाळ होती. स्वच्छं सूर्यप्रकाश पडला होता. जपानच्या हिरोशिमा शहरातले दैनदिन व्यवहार सुरु होते. शाळेतील मैदानावर मुले खेळत होती. कचेरीतील कामे रोजच्याप्रमाणे सुरु झाली होती. रस्त्यावर वर्दळ सुरु झाली होती. त्याच वेळी हिरोशिमाच्या आकाशात दोन विमाने घिरट्या घालत होती. एका क्षणात त्यातल्या एका विमानातून अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर पडला. प्रचंड मोठा स्फोट झाला आणि मशरूमच्या आकाराचा आगीचा लोळ आकाशाकडे झेपावला. त्या आधीच ती दोन्ही विमाने हिरोशिमाच्या बाहेर पडली. त्या दोन विमानापैकी एक वैमानिक होता पौल तीबेट्स व दुसरा वैमानिक होता क्लौड इथेर्ली (Claude Eatherly).
इथेर्लीचा जन्म व्हान अल्स्तेन येथे २ ऑक्टोबर १९१८ ला झाला. त्याने बॉम्बर स्कूलमध्ये पदवी घेतली आणि ऑगस्ट १९४१ रोजी सेकण्ड लेफ्टनंट पदावर रुजू झाला.हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याआधी त्याने १० महिन्याचे वेगळे प्रशिक्षण घेतले.
सगळे आलबेल आहे कळल्यावर त्यांची विमाने होरोशिमाच्या दिशेने निघाली होती . त्यांची विमाने टायनीअन बेटावरून म्हणजे हिरोशिमा पासून २००० मैल दूरवरून निघाली होती. त्यासाठी त्यांना ६ तास उड्डाण करावे लागले. हिरोशिमाची वाताहात इथर्लीने पेपरमध्ये वाचली. सत्तर हजार माणसे,लहान मुले, बायका, मृत्यूमुखी पडले होते . त्यांची कातडी वितळून शरीराचा कोळसा झाला होता. आकाशातून केमिकलचा पाउस पडत होता. जी लोकं जखमी झाली होती ती शरीराचा दाह विझवण्यासाठी पाण्यात शिरली तर केमिकल युक्त पाण्याने ती आणखीन होरपळून निघाली. त्यांना कायमच अपंगत्व येणार होत हे समजल्यावर इथर्ली मनातून हादरला. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत असा त्याने समज करून घेतला. त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळले. वास्तविक बॉम्ब त्याने टाकलाच नव्हता.तो टाकला होता तीबेट्सने. इथेर्लीच काम होत बॉम्ब नेमका कुठे टाकायचा हे सांगणे. तरीही हिरोशिमाच्या विनाशास आपण कारणीभूत आहोत असे त्याला वाटत होते. या उलट ज्याने बॉम्ब टाकला तो तिबेट्स म्हणाला ” मी माझं काम केलं. मला जी ऑर्डर मिळाली त्याच पालन केले”
या घटनेनंतर इथेरली पुरता सैरभैर झाला. पश्चातापाने त्याचे कशातही लक्ष लागेना. त्याला पूर्णपणे नैराश्याने ग्रासले.त्याने शांतीप्रिय संगठनाशी चर्चा केली. काही मदत हिरोशिमाला पाठवायचा प्रयत्न केला. त्याच्या गावी लोकांनी त्याचा सत्कार करायचा ठरवल्यावर तो तिथून पळून गेला. त्याला सन्मान नको होता. त्याने १९४७ साली आर्मी सोडली.
त्याने ह्युस्टन येथे एका तेलाच्या कंपनीत नोकरी केली. त्याला स्किझोफ्रेनिया व नैराश्याने ग्रासले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात आले. त्याच्या या वागणुकीमुळे कंटाळून पत्नीने घटस्फोट दिला. बॉम्बच्या कृत्याबद्दल आपण तुरुंगात जायला हवे म्हणून त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. बँकेचे फ्रोड केले. अनेक छोटे फ्रोड करून त्याचे पैसे हिरोशिमाला मुलांसाठी पाठवले. या चोऱ्यामाऱ्या मुळे त्याला अनेकदा तुरुंगात जावे लागले. जेणेकरून प्रायश्चित घेता येईल असे त्याला वाटले. त्याला युद्धाचा हिरो हि खुण पुसून टाकायची होती. प्रसंगी त्याने शेतमजुरी सुद्धा केली. जे अन्न मिळेल त्यावर गुजराण केली.
अश्या प्रकारे स्वताहून ओढवून घेतलेले आयुष्य जगत तो १ जुलै १९७८ रोजी घश्याच्या कर्करोगाने मृत्यू पावला.
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply