<हिरवा कॅन्सर
कुठे म्हणून प्रदुषण नाही ते सांगा? वायूप्रदूषण, जलप्रदूषण, अश्या अनेक प्रदूषणाने आपण घेरालेलो आहोत. तरीही त्यातून मार्ग काढत प्रदूषणावर मात करीत आहोत. झपाटयाने होणाऱ्या औद्योगीकरणाने रासायनिक तसेच अन्य कारख्यान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी ज्यामध्ये तांबे, शिसे, कॅडमियाम, क्रोमियम व चांदी यांचे विषारी क्षार कळत न कळत मोठया प्रमाणात जलसाठ्यात मिसळले जाऊन जलप्रदूषण करतात आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. रासायनिक आणि अन्य कारखान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी एका टाकीत साठवून त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास जल प्रदूषण होण्यास मर्यादा येतील. परंतू असे सांडपाणी एका नैसर्गिक उपयानेही स्वच्छ व क्षारविरहित कसे करता येते ते पाहू.
एथोनो-बॉटनी म्हणजे सांस्कृतिक वनस्पतीशास्त्र ही नवी शाखा उदयास आली. जगभरातील लोकांनी आपापल्या परिसरात आढळणाऱ्या विविध वनस्पतींचे वेगवेगळे उपयोग शेकडो पिढ्यांच्या अनुभवामधून आत्मसात केले. ते पूर्णपणे विसरण्याआधी त्यांच्या नोंदी करून ठेवण्याचं काम या विद्याशाखेमुळे केले जात आहे. जमा झालेल्या माहितीच्या आधारे संशोधक, शास्त्रज्ञ आणि न्यानोत्सुक मंडळी त्यातून उद्याच्या गरजा भागविण्याचे कार्य समर्थपणे पेलत आहेत हे आजच्या नवनवीन संशोधनांती दिसत आहे. या संदर्भात कितीतरी माहिती सतत उपलब्ध होत आहे होणार आहे. अश्याच एका जलपर्णी वनस्पती संबंधी अधिक माहिती घेणार आहोत जी वरील क्षारयुक्त जलप्रदूषण कमी करण्यास कशी मदत करते !
अनेक पाणवठ्यांवर वॉटर ह्यासिंथ, इकॉर्निया, इशॉनिर्या, आयकॉर्निया, गंगावती, कांदळ अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी वनस्पती तसेच धरणांचे जलाशय, डोह, तलाव, नदीकाठ, तळी, डबकी अश्या सर्व ठिकाणी ही फुग्याची वनस्पती आढळते. संपूर्ण जलजीवन संपवणारी ही हिरवी पीडा म्हणजे भारताच्या पर्यावरणाला लागलेला हिरवा कॅन्सर आहे असं वाटण्या पर्यंत याची मजल गेली आहे. ही परदेशी वनस्पती आपल्या देशात नेमकी कशी आली हे मात्र गुढच आहे. अर्थात पर्यावरण प्रेमींच्या रागाला बळी पडलेली ही वनस्पती आपले काही चांगले गुणही दाखवू लागली आहे.
सांडपाण्याच्या टाक्यात ही जलपर्णी सोडली तर मोठया प्रमाणावर हे विषारी क्षार ती शोषून घेते. शिवाय ही जलपर्णी बाहेर काढून त्याची भुकटी किंवा पावडर करून ती जैववायूसंयंत्रात (बायोगॅस प्लांटमध्ये) वापरत येते. एक किलो वाळलेल्या ह्यासिंथ पासून ३७५ लिटर जैववायू (बायोगॅस) मिळवता येतो. वायू काढून उरलेल्या भागावर काही प्रक्रिया केल्या तर धातूक्षार बाजूला करता येतील व ते महाग धातुही परत मिळवता येतील. शहरी अन् औद्योगिक सांडपाण्यावर वाढणारी ही पानफुगी कदाचित उद्याच्या भरताला सुखाचे दिवस काखाविणारी फायदेशीर वनस्पती ठरण्याचा संभव आहे. “विष हे अमृत झाले” असे कदाचित पुढे येणाऱ्या पिढ्या म्हणतील. या वनस्पतीवर संशोधन होणं आणि त्यानुसार जलपर्णीचा योग्य तो वापर केला जाण फार महत्वाच आहे.
वाळलेल्या जलपर्णी पासून इंधनासाठी वड्या किंवा फ्युअल ब्रिक्स तयार करत येण सहज शक्य आहे. गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातील उमरेठ गावी जलपर्णी पासून इंधन वायू आणि वीजनिर्मित करण्याचा प्रयत्न होत आहे. स्वित्झर्लंड आणि सुदानमध्ये असे प्रकल्प यशस्वी झाले आहेत. इंधन समस्येवर एक तोडगा म्हणून जलपर्णीने अशा निर्माण केली आहे.
<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply