भारतातील प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचा जन्म १० डिसेंबर १८७० रोजी बांगला देशातील राजशाही जिल्ह्यातील करचमारिया या गावी सधन कुटुंबात झाला. वडील राजकुमार व आई हरिसुंदरी. राजकुमार जमीनदार असून ब्राह्मो समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते.
त्यांचा इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता. जदुनाथांवर त्यांच्या या व्यासंगाचे संस्कार आपातत: झाले. ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विदयापीठातून एम्. ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले . कलकत्त्यातील रिपन कॉलेजात ते प्राध्यापक झाले (१८९३-९६). विदयार्थिदशेत त्यांनी ह्यूम, कार्लाइल, फॉइड, रांके, मॉमसेन, लॉर्ड ॲक्टन, मेटलॅड, गिबन, लेकी इ. विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले. त्यांच्यावर ईश्वरचंद्र विदयासागर, चंडिचरण बंदोपाध्याय, देवेंद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव होता.
जदुनाथांनी विदयार्थिदशेतच इतिहासलेखनास प्रारंभ केला आणि १८९१ साली ‘फॉल ऑफ टिपू सुलतान’ हा विचारप्रवर्तक लेख लिहिला. भारतभर त्यांनी प्रवास केला आणि किल्ले, युद्घक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी देऊन तेथील माहिती मिळविली. पाटण्याला असताना त्यांची गो. स. सरदेसाई यांबरोबर ओळख झाली. ही मैत्री अखेरपर्यंत टिकली. सरदेसाईं-मुळे त्यांना महाराष्ट्रनातील ऐतिहासिक साधने, विशेषत: बखर वाङ्मय हाताळता आले. परिणामतः जदुनाथांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रात रस घेतला.
जदुनाथांनी हिस्टरी ऑफ औरंगजेब ( पाच खंड, १९१२-२४) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. दरम्यान त्यांनी आयर्विनस लेटर मुघल्स या दोन खंडांचे संपादन केले आणि नादीरशाह इन इंडिया हे पुस्तक लिहिले. यानंतर त्यांनी मुघल ॲड्मिनिस्ट्रेशन आणि द फॉल ऑफ द मुघल एम्पायर ( चार खंड, १९३२-५०) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मोगलकालासंबंधी तपशीलवार व मुद्देसूद माहिती प्रथमच उजेडात आणली. मोगलकालाविषयीचे त्यांचे संशोधन-लेखन आणि त्यांनी काढलेले अभ्यासपूर्ण निष्कर्ष बऱ्याच प्रमाणात मान्य झाले आहेत.
सरकारांनी मराठी बखर वाङ्मयाबरोबरच तत्कालीन पाश्चात्त्य लेखकांचे वृतांत अणि फार्सी ऐतिहासिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास करून शिवा अँड हिज टाइम्स (१९१९) हा छ. शिवाजी महाराजांविषयीचा मौलिक ग्रंथ प्रसिद्ध केला. एका महाराष्ट्रेतर इतिहासकाराने नि:पक्षपाती दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या कार्याचे व चरित्राचे केलेले मूल्यमापन त्यांत आढळते. याशिवाय हाउस ऑफ शिवाजी (१९४०) हा ग्रंथ आणि शिवाजी ए स्टडी इन लिडरशिप (१९४९) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. सरकारांचे हे शिवचरित्र उपलब्ध शिवचरित्रांत एक साक्षेपी व वस्तुनिष्ठ चरित्र ठरले आहे. इंग्रजीत हे चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्रेतर शिक्षितवर्गाला महाराजांचे चरित्र ज्ञात झाले आणि त्यांची संघराज्य कल्पना, स्वतंत्र हिंदवी राज्याची कल्पना आणि लष्करी डावपेच यांची माहिती झाली. या ग्रंथाशिवाय त्यांनी बिहार अँड ओरिसा डयुरिंग द कॉल ऑफ द मुघल एम्पायर , ॲनेक- डोट्स ऑफ औरंगजेब अँड हिस्टॉरिकल एसेज , स्टडीज इन औरंगजेब्झ रेन , इंडिया थू द एजिस इ. अन्य गंथ लिहिले. त्यांचे अनेक स्फुटलेख मॉडर्न रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी इतिहासाशिवाय शिक्षण, मातृभाषा, शक्तिपूजा, बंगीय नाटय, कुंभमेळा इ. विविध विषयांवर लेखन केले आहे.
कलकत्ता विदयापीठाचे ते उप-कुलगुरू होते (१९२६-२८), रॉयल एशिॲटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचे ते सन्मान्य सभासद होते. तसेच अमेरिका हिस्टॉरिकल सोसाटीचे ते सभासद होते. डाक्का आणि पाटणा विदयापीठांनी त्यांना सन्मान्य डी.लिट्. पदवी प्रदान केली. कॅम्बेल गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते आणि बिटिश शासनातर्फे सी.आय.ई. (१९२६) आणि सर (नाईट) हे किताबही त्यांना मिळाले (१९२९) रेकॉर्ड कमिशन, बंगीय साहित्य परिषद, अखिल भारतीय इतिहास परिषद (१९५२) इत्यादींचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.
१९ मे १९५८ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply