इ. स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यातही मलेरियाने घट्ट पाय रोवले होते. साथीच्या या तापाचा त्याकाळी रोमन फीवर या नावाने उल्लेख होत असे. राणी क्किओपात्राच्या महालात मच्छरदाण्यांचा वापर नेहमी केला जात असे असा उल्लेख आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते रोमन साम्राज्याचा ऱ्हासाला मलेरिया रोग देखील कारणीभूत होता.
इटली हा दलदलीचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असल्याने तेथे मलेरियाचे माहेरघर होते. इटलीमध्ये मलेरियावरील संशोधन जगात प्रथम सुरू झाले. त्यावेळी घडलेल्या वितंडवादाचा परामर्श पुढील प्रकरणात घेतला आहे.
चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वी मलेरिया संबंधात इतके ज्ञान होते की त्या देशातील धाडसी प्रवासी जगातील विविध देशांच्या सफरीवर निघत त्यावेळी आपल्या बायकांचा निरोप घेताना ते त्यांना पुनर्विवाहाची मानसिक तयारी करण्यास सांगून ठेवीत, कारण प्रवासात बरेच वेळा हा रोग मृत्यूला कारणीभूत ठरत असे.
सुमेरिया व इजिप्त मध्ये ३५०० वर्षांपूर्वी ताप व सोबत वाढलेली प्लीहा (Enlarged Spleen)अशा प्रकारचे अनेक रोगी असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आलेले आहेत. इजिप्शियन ममींच्या उत्खदनात त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्लीहा आढळलेल्या आहेत. युरोपियन व आफ्रिकन लोकांची रोगप्रतिबंधकारक शक्ती बहुतांशी एक सारखी होती परंतु Falciparum मलेरिया विरुद्ध युरोपियनांत मुळीच प्रतिक्षमता नव्हती. १७९० मध्ये हायटी बेटावरील गुलामांचे बंड मोडून काढण्यासाठी फ्रान्सने सैन्य पाठविले, त्यात मलेरियामुळे या सैन्याची वाताहात झाली होती. वेस्टइंडीज वरील ऍडमिरल व्हर्नानच्यानेतृत्वाखालील ब्रिटिश आरमारी मोहिमेचा मलेरियाने फज्जा उडवला. एकोणतीस हजार नौसैनिकातील अर्ध्याहून अधिक सैन्याला मलेरियाच्या डासांनी यमसदनास पाठविले.
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply