इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म ३० मे १८९४ रोजी झाला.
पिसुर्लेकर यांचे सर्व शिक्षण पोर्तुगीज भाषेमधून झाले होते; तथापि त्यांना इंग्रजी, फ्रेंच, कोकणी, संस्कृत या भाषा तसेच मोडी लिपी चांगल्या प्रकारे अवगत होती. त्यांचे लेखन मुख्यत्वे मराठी व पोर्तुगीज या दोन भाषांतच आढळते.
शिक्षकीपेशानंतर त्यांनी पणजीच्या अभिलेखागारात काम पत्करले (१९३१). या अभिलेखागाराच्या संचालकपदावरुन ते १९६१ मध्ये निवृत्त झाले. पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला. फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रजी, मराठी अशा चारही भाषांवर प्रभुत्व असणा-या डॉ. पिसुर्लेकरांनी ‘विविध ज्ञान विस्तारा’त १९१७ मध्ये पहिला मराठीवरील लेख लिहिला. कृष्णदास श्यामांचा मराठी ग्रंथ संपादित करून गोव्याचा आद्य ग्रंथकार मराठीच होता, हे सिद्ध केले. पिसुर्लेकरांना लेखनसंशोधनाबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. पोर्तुगाल शासनाने त्यांना नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सँटिएगो हा किताब दिला (१९३५). याशिवाय रॉयल एशिअॅाटिक सोसायटी (बंगाल) आणि एशियाटिक सोसायटी (मुंबई) यांनी त्यांना सुवर्णपदके दिली (१९४८ व १९५३). लिस्बन विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मान्य पदवी त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचे १० जुलै १९६९ रोजी निधन झाले.
Leave a Reply