वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा’ हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.’ हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे…त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड’ होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.
अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply