गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे.
अतिशय विचारपूर्वक, गहिरे चित्रपट स्वतःच्या अटी -शर्तीवर निर्माण करणारा हा माणूस.
सगळाच प्रवाह तलम.
कसल्याशा संशोधनासाठी पत्नी,आई आणि मुलीला सोडून जाणारा आलोक राजवाडे. आणि त्याच्या पत्रांच्या आधारे त्याचा शोध घेत परदेशात फिरणारी मॉली- त्याची तरुण झालेली मुलगी. पार्श्वभूमीला वाड्यांचे पुणे आणि निसर्गसुंदर स्वीडन.
मुलीशी आणि गतकाळाशी दुवा साधण्यासाठी तिला पत्रं लिहिणारा बाप- सखोल निसर्गवर्णनं करणारा, मार्गदर्शन करणारा आणि तिला साथसंगत देऊ न शकणारा ! ही पत्रं म्हणजे एक विलोभनीय तुटक-तुटक कविताच.
एके ठिकाणी तो म्हणतो- ” विश्वात जिवंत असतो तो फक्त निसर्ग- त्याचे नदीचे प्रवाह, झाडांची पाने सगळं सगळं पूर्वापार चालत आलंय.आपण माणसे फक्त पेशी असतो- क्षणोक्षणी मरणाऱ्या आणि त्यांची जागा घेणाऱ्या फक्त नव्या पेशी.”
“ट्रेझर हंट ” खेळासारखा हा चित्रपट. नव्या दुव्यांच्या सुगाव्यात मुलीने हिंडणे-बापाला शोधत. तिथे तिला पदोपदी मानवी रूपातील चांगुलपणा भेटत राहतो- टॅक्सीवाला, वाद्य वाजवत निरुद्देश फिरणारा वादकांचा फड, तिची दुसरी आई-लिंडा. तिला आणि आपल्यालाही माणुसकीवर विश्वास ठेवायला भाग पाडणारी ही पात्रे ! जगात, त्या परक्या देशात अजून “सत ” शिल्लक आहे याची प्रचिती देणारी, अलगद हात धरून मॉलीचा शोध संपविणारी !
आणि “नवी” आई भेटल्यावर ती मॉलीच्या हाती सोपवते -तिच्या वडिलांनी तिच्यासाठी (भविष्यातील वीस वर्षांसाठी) लिहून ठेवलेली पत्रांची बॉक्स ! स्वतः गेल्यानंतरही मुलीच्या संगोपनाची केलेली तजवीज-बेगमी ! आणि इकडे भारत सोडण्यापूर्वी तिची खरी आणि पहिली आई तिच्या हाती सोपवते -दागिन्यांची पेटी, ज्यांत लहानग्या मुलीसाठी बापाने पूर्वी पाठवलेली पत्रे !(तीच घेऊन तर मॉली स्वीडनला आली असते-जन्मदात्याच्या शोधार्थ !) पण तो कोठल्यातरी अनिवार हाकेला ओ देऊन नेहेमीसारखा एकटाच आधी दिसेनासा झालेला.
पत्र हा भावनिक दुवा असतो, पत्र प्रदीर्घ काळ गेलेल्या नातेवाईकांची आठवण बनलेले असते, त्या पत्रांमधून हस्ताक्षर भेटते, प्रेम स्पर्श करून जाते, सहक्षणांच्या आठवणी रुंजी घालत फिरतात आणि हळुवार मायेची उब उरलेल्या प्रवासासाठी शेकोटी बनलेली असते.
मग त्या पत्रांच्या वल्ह्यांना हाती घेत होडी पल्याड न्यायची असते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply