१९५० साली देवेंद्र गोयल यांनी ‘आँखे’ या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी मदन मोहन यांच्यावर सोपवली.. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.. त्यांनी गायिका म्हणून लताला बोलाविले.. मात्र तिने, स्टेडियमवर क्रिकेट खेळणाऱ्या या तरुणाला गंमतीने पहिल्यांदा नकार दिला.. नंतर मात्र ती त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी गात राहिली.. २५ वर्षांच्या कारकिर्दीत मदन मोहन यांनी आशा भोसलेच्या अनेक गाण्यांपैकी एकच गाणं सर्वात जास्त गाजलं… ते म्हणजे, सुपरहिट चित्रपट ‘मेरा साया’ मधील ‘झुमका गिरा रे..’!!
चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील इतर सर्व संगीतकारांपेक्षा वेगळे व रुबाबदार दिसणारे मदन मोहन, हे एकमेव होते.. त्यांचा जन्म इराक येथील बगदाद शहरातला.. नंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. लहानपणापासून संगीताची आवड होतीच. कर्तार सिंग यांनी त्यांना संगीताचे मूलभूत ज्ञान दिले. शिक्षण झाल्यावर सैन्यात नोकरी केली. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली व लखनौ आकाशवाणीवर निवेदकाची नोकरी धरली. तिथे मोठमोठे गायक येत असत, त्यांचं ऐकून मदन मोहन यांच्या ज्ञानात भर पडत गेली.. तिथे मन रमेना, म्हणून मुंबई गाठली.. मनात होतं हिरो व्हावं, दोन तीन चित्रपटात काम केल्यावर व गायक म्हणून काही गाणी गायल्या वर, तो नाद त्यांनी सोडून दिला..
१९५० पासून ते १९७५ पर्यंत चित्रपटांना अप्रतिम संगीत देऊन मदनजींनी स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं.. सुरुवातीला जसं यश मिळालं तसं पुढे टिकलं नाही.. सत्तरच्या दशकात ‘संजोग’, ‘मेरा साया’, ‘वह कौन थी’ अशा चित्रपटांनी अभूतपूर्व यश मिळवलं.. तर काहींना अपयश आलं. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ चित्रपटाने त्यांना मानाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला..
चेतन आनंद यांच्या बहुतांश चित्रपटांना, मदन मोहन यांचच संगीत आहे. ‘हकीकत’, ‘हंसते जख्म’, ‘हिर रांझा’, ‘हिंदुस्थान की कसम’, ‘साहब बहादुर’ या चित्रपटातील गाणी अविस्मरणीय आहेत. हकीकत मधील ‘कर चले हम फिदा..’ हे गाणं दरवर्षी १५ आॅगस्टला हमखास ऐकायला मिळतं. ‘हंसते जख्म’ मधील ‘तुम जो मिल गए हो, तो ये लगता है..’ हे कंपोजिंग म्हणून, सर्वोत्कृष्ट गाणं आहे..
दिग्दर्शक राज खोसला यांच्या प्रमाणेच, नैराश्याच्या काळात मदन मोहन यांनी मदिरेला जवळ केले. काही वर्षांनंतर ते व्यसनाधीन झाले.. १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘लैला मजनू’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट..
१४ जुलै १९७५ रोजी, वयाच्या एकावन्नव्या वर्षी, मदन मोहन रायबहादुर चुनीलाल कोहली, सेकंड लेफ्टनंट आॅफ इंडियन आर्मी.. हे ‘होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा..’ म्हणत परमेश्वराकडे निघून गेले.. आज त्यांना जाऊन सत्तेचाळीस वर्षं झाली, तरीदेखील त्यांच्या गीतांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही..
गुलजार यांच्या सुमधुर शब्दांना, त्यांनीच साज चढवला.. ‘दिल ढुंढता है..’ या ‘मौसम’ चित्रपटातील गीताला त्यांनी अठरा चाली लावलेल्या होत्या, प्रत्यक्ष रेकाॅर्डिंगला मात्र नवीनच चाल दिली.. जी अजरामर झाली.. ‘नैना बरसे..’ हे त्यांच्याच आवाजातलं गाणं ‘यु ट्युब’वर उपलब्ध आहे. ‘दस्तक’ मधील ‘तुमसे कहू एक बात परोंसे, हलके हलके..’ या गाण्यात एका ठिकाणी कोणतंही संगीत न देता, रात्रीच्या वेळेस, रस्त्यावरुन जाणाऱ्या घोड्याच्या टांग्याचा आवाज घेतलेला आहे.. हे फक्त मदनजीच, करु जाणे..
ज्यांना आयुष्यात खूप काही करायचं असतं, त्यांनाच परमेश्वर लवकर घेऊन जातो.. मदनजी आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांचं संगीत, ‘अजरामर’ आहे… त्यांना विनम्र अभिवादन!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-६-२२.
Leave a Reply