नवीन लेखन...

होळी

घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

एरवी सुट्टीचा दिवस असेल तर साडे नऊ दहा पर्यंत दोघं ही अंथरुणातून हलत नसायची ! पण आजची गोष्ट वेगळी होती .आज होळी चा दिवस ! जरी होलिका दहन संध्याकाळी होतं पण त्यासाठीची तयारी…म्हणजे चाळीतील चौकातील जागा स्वच्छ करणे, घरटी पाच दहा रुपयांची वर्गणी काढून, नारळ, फुलं, प्रसाद आणि इतर साहित्य आणणे …चाळ भर फिरून जुनी लाकडे…आणि दहन योग्य गोष्टी गोळा करणे आणि सर्वात आवडीच काम म्हणजे चाळीमागच्या रुईकर वाडीतून नारळाच्या वाळलेल्या झावळ्या आणणे ! ही सर्व कामं चाळीतील सुमारे दीड डझन बालगोपाळ अतिशय आवडीने आणि तन्मयतेने पार पाडीत असत! ….

अर्थात होळी असो …दिवाळी असो किंवा गणपती…. या ” जयराज चाळी ” साठी सगळे उत्सव सार्वजनिकच असायचे . सुमारे पन्नास एक बिऱ्हाडांच्या या चाळीत कमालीचा एकोपा होता . सगळे सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे कोणाच्याही घरातलं लग्न म्हणजे अगदी आपल्याच घरचं कार्य असल्याप्रमाणे प्रत्येक चाळकरी लग्नघरात उत्साहानं राबायचा…. बायका देखील सकाळीं पाण्याच्या नळावर झालेली भांडणं तिथेच सोडून चाळीतल्या एखाद्या पहीलटकरणीला सल्ला आणि धीर द्यायला सर्वात आधी हजर असायच्या, शिवाय कोणाकडे दुःखद प्रसंग असेल तर अगदी सूतक संपेपर्यंत जातीने त्या घराला जेवण डबे पोहोचवण्याचं कर्तव्य न सांगता पार पाडलं जाई…” चार लोक काय म्हणतील,? ” किंवा ” मी हे कसं सांगू किंवा बोलू? ” असला अवघडले पणा किंवा औपचारिक पणा कोणाच्याच मनात नव्हता …सर्व चाळकऱ्यांची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती तशी जेमतेमच होती परंतु मनाची श्रीमंती मात्र अपरंपार होती..

त्यामुळेच मुंबई सारख्या शहरात या अश्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या  वातावरणामुळे जयश्री ताईंना त्यांच्या पतीच्या निधनानंतर दोन मुलांना घेऊन दिवस काढणं तसं सुसह्य झालं होतं…. अर्थात जयश्री ताईंचा स्वभाव ही तसा…लाघवी, मनमिळाऊ आणि शांत असाच होता.. मुलच काय पण संपूर्ण चाळ त्यांना ” माई ” म्हणूनच हाक मारायची आणि अकरा वर्षांचा मनीष व सात वर्षांची मृण्मयी यांना ” माई ची मुलं ” म्हणूनच ओळखल जायचं …..

मुलं उठून आवरून उत्साहाने खाली होळीच्या तयारी साठी खाली पळाली आणि ” माई ” देखील संध्याकाळच्या पुरणाच्या नैवेद्याची तयारी करण्यात मग्न झाली ! ..

पुरण पोळी आठवून जरा त्यांना नेहमीप्रमाणे काहीसं भरून आलं…त्यांचे यजमान म्हणजे ‘ केशव रावांचा ‘ सर्वात प्रिय पदार्थ होता पुरणपोळी…

” अगं जयू … पुरण पोळी खायला सण कश्याला पाहिजे? ? वाटलं खावीशी की करून खायची ..आणि तुझ्या हातची पुरणपोळी आणि कटाची आमटी म्हणजे…. अहाहा !” असं म्हणून ते माई ला आग्रहाने अधून मधून पुरण पोळी करायला लावायचे . साधारण पंधरा एक वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातून लग्न करून हे जोडपं मोठ्या उमेदीने आणि जिद्दीने या मुंबापुरीत संसार थाटण्यासाठी आलं होतं… तसं तर केशव रावांच संयुक्त कुटुंब…शेती वगैरे गावाकडे होतं पण ” अरे तू आता मुंबईकर चाकरमानी, तुला कधी इथे येऊन शेती करायला जमणार? ” असं म्हणून दोन्ही वडील बंधूंनी केशवरावांच्या नावची जमीन लाटली आणि त्या बदल्यात अत्यंत कवडीमोल अशी रक्कम त्याच्या हवाली करून एकप्रकारे त्यांना या सगळ्यातून बेदखल केलं होतं … त्यात केशवराव म्हणजेच अत्यंत पापभिरू..साधे आणि भोळसट व्यक्ती …जे पदरात पडलं ते पवित्र मानून गावातून बाहेर पडले ते कायमचेच .. बाकी छत्तीस गुण जमवून लग्न गाठी स्वर्गात बांधणाऱ्या विभागाने कदाचित ” केशव राव आणि जयश्री ” यांची गाठ बांधताना कदाचित अजून चार पाच गुण बोनस म्हणून दिले असावेत…कारण जयश्री ताईं देखील अगदी तश्याच शांत …सोशिक आणि सध्या होत्या ! दोघे ही कधी कोणाशी भांडले नाहीत की कसला हट्ट धरला नाही …मिळेल ते गोड मानून समाधानी आयुष्य जगले ! म्हणूनच कदाचित सुरुवातीला या मुंबईत स्थिर स्थावर होताना अनेक कष्ट आणि हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या त्यांना ! परळ मधल्या एका औषधे तयार करणाऱ्या कंपनीत केशव रावांना अकाऊंट विभागात नोकरी मिळाली आणि त्यांच्या सचोटी …प्रामाणिक पणा आणि साधेपणा वर खुश होत कंपनीचे मालक ‘ मोहनलाल पाठक ” यांनी या जयराज चाळीत त्यांच्या मालकीच्या असलेल्या दोन खोल्या नाममात्र भाड आकारून या नवदाम्पत्याला राहण्यास दिल्या…आणि मग कुठे यांच्या संसाराला थोडं स्थैर्य आलं मोहन शेठ चे मुनीम म्हणजेच खेडेकर हे दर महिन्याच्या एक दोन तारखेला न चुकता चाळीत यायचे आणि चहा व गप्पा या सोबत केशवरावां कडून भाड घेऊन जायचे .. हे असे दिनक्रम सुरू होतेच पुढे मग मनीष झाला आणि त्याच्या पाठीवर मृण्मयी यांच्या रूपाने दोनाचे चार झाले आणि मग खऱ्या अर्थाने ह्या कुटुंबाला सुखाचे दिवस आले ! अर्थात नियतीच्या सारीपाटावार नेहमीच आपल्याला हव्या तश्या चाली पडत नाहीत, काळा पुढे कोणाचाही निभाव लागत नसतो.. मृण्मयी चा पहिला वाढदिवस उत्साहाने सर्व चाळकरी मंडळींनी साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी कंपनीत कामावर असतानाच हृदय विकाराच्या झटक्याने केशव रावांनी या जगाचा निरोप घेतला आणि जयश्री ताई मात्र संपूर्ण कोलमडून गेल्या, दोन्हीं लहान मुलांना वाढवणे …सांभाळणे आणि घर चालविणे हे मोठे आव्हान होते त्यांच्या समोर! सासुरवाडी हून काही मदत मिळणे दुरापास्तच होतं आणि कोल्हापूरला राहणाऱ्या मोठ्या बहिणी शिवाय दुसरा कोणीही आधार त्यांना नव्हता..

पण काळ जसं कधी ही भरून न येणारे घाव घालतो.. तसच दुःख कमी करण्यासाठी ही तोच एकमेव औषध असतो ….परिस्थिती सर्व काही शिकवून जाते, तद्वत दुःख बाजूला ठेवून चाळकऱ्यांच्या मदतीने जयश्री ताईंनी हळू हळू संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करायचा प्रयत्न सुरू केला, मोहन शेठ नी त्यांना अनुकंपा तत्वावर केशवरावांच्या जागेवर नोकरी देऊ केली परंतु लहान मुलांची जबाबदारी आणि फारसं शिक्षण न झाल्याने त्यांना ते रोज ऑफिस मध्ये जाऊन काम करणं शक्य नव्हतं मग अखेर त्यांच्या साठी घरीच बसून औषधांच्या बाटल्या आणि बॉक्स यांना लेबल्स लावायचे काम देण्यात आले …त्या जोडीला मग कुठे स्वयंपाक करायला जा… वाती करून विक असं करीत त्यांनी घराला आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आई आणि बाप अश्या दुहेरी भूमिका निभावून मुलांना वाढविणे सोपे नसते ..पण जयश्री ताईंनी हे चोख पणाने केले होते . मोहन शेठ ने ही केशवरावांच्या पश्चात कधी ही त्या खोल्यांचे भाडे वाढविले नाही की जयश्री ताईंनी खोल्या सोडाव्या म्हणून तगादा नाही लावला …अजून ही खेडकर दरमहा भाडे घ्यायला यायचे आणि या कुटुंबाची ख्यालखुशाली विचारून जायचे …

परंतु दोन एक वर्षापूर्वी मोहन शेठ नी या इहलोकीची यात्रा संपवली आणि त्यांची कंपनी…इतर कारभार आणि ” जयराज” चाळीतील या खोल्यांची जबाबदारी त्यांच्या एकुलत्या एक मुलावर अर्थात अमोल वर आली . त्याने ही कधी जयश्री ताईंच कुटंब आणि त्या खोल्यांचं भाड या व्यवहारात काही विशेष लक्ष घातलं नव्हत आणि खेडकर ही ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडीत होते ….

परंतु गेल्याच महिन्यात भाड घ्यायला आलेल्या खेडकरांनी भाड्याचे पैसे खिशात ठेवून पावती देता देता जयश्री ताईंना ती कठीण बातमी सांगितली आणि त्या दिवसा पासून आजतागायत त्या अस्वस्थच होत्या.

” वहिनी ! एक सांगायचं होत.. अमोल शेठ नी या खोल्या आता विकायचं ठरवलंय !! काय …आता त्यांना हे सगळे व्याप सांभाळायला जमत नाही म्हणत होते… कारखाना आहे.. घर ..आणि शिवाय फॅमिली… ” ” अहो..पण आम्ही कुठे जाणार भाऊजी..? इतकी वर्षे इथेच राहिलो आम्ही…” घश्यात आवंढा आल्यामुळे जयश्री ताईंच् वाक्य अर्धच राहिलं…

 

” आता काय बोलणार ! आम्ही शेवटी चाकर त्यांचे …” खेडकरांनी हतबलता दर्शवत खांदे उडवले..

याच घरात मोठ्या उमेदीने नव्या संसाराची सुरुवात केली होती.मुलं…त्यांचं शिक्षण…खेळणं… जीवाला जीव देणारे शेजारी .. हे सगळं सोडून कुठे जायची कल्पना ही त्यांनी कधी केली नव्हती ….. बरं एव्हढ्या नाममात्र भाड्यात मध्यवर्ती मुंबईतच काय तर उपनगरात ही अशी जागा कुठे मिळणं शक्य नव्हत !! या विचारात जयश्री ताई गुंग असतानाच खेडकारांनी गळ्यातील शबनम मधून एक पत्र काढून त्यांच्या हातात ठेवत म्हटलं ” वास्तविक मी नको म्हटलो होतो .पण अमोल शेठ नी काही ऐकलं नाही …ही नोटीस दिली आहे तुमच्या साठी !! एकतीस मार्च पर्यंत ह्या खोल्या खाली कराव्या लागतील… दोन महिन्यांची नोटीस आहे …. ” त्यांचा ही स्वर आता कातर झाला होता…..पुढे काही न बोलता त्यांनी जयश्री ताईंचा निरोप घेतला आणि ते बाहेर पडले…..नोटीस घेता घेता जयश्री ताईंचा बांध मात्र सुटला आणि पदराने डोळे पुसत पुसत त्या पाठमोऱ्या खेडकरांकडे पहात राहिल्या…

दोन महिने? ?? जिथं नव्या संसाराचा आजपर्यंत चा प्रत्येक क्षण व्यतीत केला होता ती वास्तू.. ते घर असं सोडून जायचं? ? महिनाभरात मुलांच्या वार्षिक परीक्षा येतील, त्यांना कसं सांगू?? जयश्री ताईंना काही सुचेना …

तो महिना तसाच गेला आणि मार्च महिना उजाडला एक तारखेला सकाळी साडे अकरा बारा च्या सुमाराला दार वाजलं ” खेडकर भाऊजी असतील ..पण आज त्यांना उशीर झालाय वाटतं ” घड्याळाकडे पहात पाहत स्वतः शीच पुटपुटत त्यांनी दार उघडलं. दारात खेडकर नव्हते तर एक तरुण जोडप होतं….न ओळखून जयश्री ताईं विचारणा करणार तेव्हढ्यात त्यातला तरुण म्हणाला ” माफ करा आम्ही असं अचानक आलो… मी अमोल आणि ही माझी बायको अंकिता …खेडकर काका आठवडाभरां साठी गावाकडे गेले.. म्हणून आम्ही आलो आज !! आणि आमचा दवाखाना ही इथे जवळच आहे…सो…” स्वतः मालक घरी आलेले पाहून जयश्री ताई चटकन सावरल्या आणि त्यांचे स्वागत करीत म्हणाल्या…” हो हो…अरे वा ! या ना आत या…” मार्च महिना …भर उन्हाची वेळ …दोघे ही थकलेले घामेजलेले दिसत होते..जयश्री ताई चटकन आत पाणी आणायला गेल्या ..तेव्हढ्यात अमोल आणि अंकिता घराचं निरीक्षण करू लागले…दोनच खोल्या पण अत्यंत नीटनेटक्या ..स्वच्छ आणि प्रसन्न ..कुठे ही धूळ ..नाही की कचरा नाही…समोरील भिंतीवर चंदनाचा हार घातलेला केशव रावांचा फोटो, पूर्वेच्या भिंतीवर महालक्ष्मी आणि सिद्धी विनायकाच्या तस्वीरी …त्या समोर लावलेल्या धूप आणि जास्वंदीच्या फुलां मुळे अधिकच प्रसन्न आणि सात्विक दिसत होत्या …अंकिता चटकन उठून सिद्धी विनायका समोर भक्तिभावाने हात जोडून उभी राहिली……

 

” खूपच प्रसन्न आहे ही सिद्धिविनायकाची तस्वीर ” जयश्री ताई बाहेर आल्याचे पाहून अंकिता म्हटली … ” होय…. आणि आज तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर आमच्या कडे आलात..बसा मी प्रसादाचे मोदक देते तुम्हाला …”

पाण्याचे ग्लास हातात देता देता जयश्री ताई म्हणाल्या ..

आणि एकदम गहिवरून अंकिताने चटकन वाकून जयश्रीताईना नमस्कार केला..

” अष्ट पुत्र सौभाग्यवती भव..सुखी रहा ” असा प्रेमळ आशीर्वाद ताईंनी तिला दिला तसं तिने आणि अमोल ने चमकून एकदुसऱ्या कडे पाहिलं आणि त्यांचं ते तसं पाहणं ताईंच्या ध्यानात आलेलं कळताच दोघे ही काहीसे चपापले…जयश्री ताईंना ते जरा चमत्कारिक वाटलं…मग विषय बदलत त्यांनी विचारलं …

” अमोल …आल्या आल्या तू दवाखान्याचा काय म्हणालास? तब्येत ठीक आहे ना ” आणि पुन्हा ते दोघे बावरले…

” काय सांगू काकू तुम्हाला … आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली..पण अजून घरात पाळणा काही हलला नाही…बरेच उपाय केले डॉक्टर ..वैद्य झाले पण काही यश नाही ….त्यात आमचा प्रेम विवाह..मग नातेवाईक आणि घरात हिला नको ते टोमणे..टिपण्या सहन कराव्या लागतात…” आता अंकिता च्या डोळ्यात पाणी तराराल होतं….

” सिद्धी विनायकाला आम्ही नवस देखील बोललोय…पण बाप्पा बहुधा आमचं काही ऐकत नाही, ” अमोल च्या आवाजात नैराश्य स्पष्ट दिसत होतं…. काही काळ शांततेत गेल्या वर जयश्री ताई अंकिता च्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाल्या ” तो सिद्धी विनायक असं नाही करणार .त्याच्या साठी सगळी लेकरं सारखीच … ” तो बाप्पा नक्कीच तुमची मनोकामना पुर्ण करेल अशी मला खात्री आहे ! ” मग अमोल आणि अंकिता प्रसाद आणि त्या महिन्याच भाड घेऊन निघून गेले…आणि जयश्री ताईनी देखील बाप्पा समोर हात जोडून नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या कामात मग्न झाल्या ! …..

आता होळीच्या नैवेद्याची तयारी पूर्ण झाली होती….आणि इतर आवरा आवरी करत असताना ‘ आता ही घर सोडायची गोष्ट मुलांना कशी सांगावी ह्याची त्यांना चिंता होती… …

या विचारात असतानाच संध्याकाळ झाली होती आणि तेव्हढ्यात दोन्ही मुलं हातातल्या टीमक्या वाजवत आणि ओरडत घरात शिरली आणि जयश्री ताई भानावर आल्या…

होलिका दहन साठी मनीष आवरून तयार झाला होता…

आणि ‘ माई ‘ कडून वेण्या घालून घेता घेता छोटी मृण्मयी अचानक म्हणाली ” माई …आपण ना या उन्हाळ्याच्या सुट्टीत इथेच राहू ….कोल्हापूर ला नको जायला ” आणि ‘ घराचं या मुलांना समजलं की काय ‘ या विचाराने दचकून जयश्री ताई विचारत्या झाल्या ” का ग मनू? मावशी कडे नाही जायचं? ? का बरं असं ” …

” अगं माई या सुट्टीत चिनू चे बाबा आम्हाला सगळ्या मुलांना सर्कस ला घेऊन जाणार आहेत…आणि जुहू ला पण समुद्र किनाऱ्यावर ” आनंदाने मान हलवत मृण्मयी ने उत्तर दिलं ” हो माई ….अगं या सुट्टीत दिपू च्या ताई च लग्न पण आहे .. चौकातच मांडव घालणार आहेत…धमाल मजा करणार आहेत सगळे ” आता मनीष ने छोट्या बहिणीच्या सुरात सूर मिळवला !! ” अच्छा अच्छा… ! बरं मला सांगा ..जर आपल्याला हे घर ही चाळ सोडावी लागली तर…?” जयश्री ताई नी खडा टाकला आणि दोघांची प्रतिक्रिया पाहू लागल्या..

” अजिबात नाही माई … हे घर सोडून कुठेच नाही जायचं आपण ..आमचे सगळे मित्र इथे आहेत…खूप छान आहे इथे !” मनीष ने निमिषार्धात उत्तर दिलं…

” माई….मी त्या खेडकर काकांना सांगणार ..हे आमचं घर आहे ..आम्ही कुठेच नाही जाणार….” राणा भीमदेवी थाटात इवलिशी मृण्मयी ने उत्तर दिलं आणि तिचा तो आवेश पाहून जयश्रीताई ना हसू आवरलं नाही …

” बरं बरं ..आता जावा दोघं खाली..आणि होळी पासून लांब राहायचं ह… होळी पेटली की मला हाक मार ह मनू..मग मी नेवेद्याचे ताट घेऊन खाली येते ” अशी सूचना देत जयश्री ताईंनी दोघांना खाली पिटाळल आणि मागे वळून आत जाणार तेवढयात दारावर टकटक झाली आणि जयश्री ताईंनी पाहिलं तर दारात अमोल आणि अंकिता होते..

आश्चर्य वाटून त्यांनी ” अरेच्च्या तुम्ही? या ना आत या ” असं स्वागत केलं..

” माफ करा ह! पण आम्ही दारात उभ राहून मुलांच्या गप्पा ऐकल्या !” हसत हसत अमोल म्हणाला ..

किंचित ओशाळत जयश्री ताई म्हणाल्या ” हो का? ? माफ करा ह… मुलांना काही समजत नाही …काय बोलावं..!” ” छे छे….अहो त्यात काय…खूप गोड आहेत दोघं ही ” अमोल ने पुस्ती जोडली…

पंधरवड्या पूर्वी भाड घ्यायला ही दोघं आली होती तेव्हा पेक्षा आज समाधानी ..प्रसन्न आणि आनंदी दिसत होती…

पण आज इथे…परत? घर सोडण्या संदर्भात काही बोलायला आले असतील का? या विचारात जयश्री ताई असतानाच अमोल ने पिशवीतून पेढ्यांचा बॉक्स काढला आणि जयश्री ताईंसमोर धरला …

जयश्री ताई अजूनच बुचकळ्यात पडल्या…

मग अमोलनेच खुलासा केला..

“काकू…नाही माई…. आम्ही पण तुम्हाला माई म्हटलं तर चालेल ना? ? ” त्यावर प्रसन्नतेने जयश्री ताई नी होकारार्थी मान डोलावली व उत्तर दिलं ” नक्की….चालेल ” ” पंधरा दिवसापूर्वी आम्ही इथे आलो होतो…तेव्हा तुमच्या कडून प्रसादाचा मोदक आणि आशीर्वाद मिळाले होते आम्हाला ! आणि कदाचित आमची नव्हे तर तुमची प्रार्थना या सिद्धी विनायकांने ऐकली असावी …

माई …त्या नंतर आज दुपारी डॉक्टरांनी काही टेस्ट साठी आम्हाला बोलावलं होतं…आणि त्यात त्यांनी गोड बातमी सांगितली..

माई….अंकिता आता आई होणार आहे ! ” ” अरे वा! काय सांगताय …कित्ती छान बातमी !” जयश्री ताई नी आनंदाने चित्कारत हे उद्गार काढले आणि अंकिता कडे पाहिले तेव्हा लज्जा आणि आनंद असे सुरेख मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर होते…आणि अमोल च्या डोळ्यात आनंदाश्रू!! पुन्हा एकदा दोघांनी जयश्री ताईंना नमस्कार केला …

दोघे स्थानापन्न झाल्यावर जयश्री ताईंनी चाचपडत विषय काढला…

” एक विनंती होती अमोल…तुम्ही दिलेली घर सोडायची मुदत या महिनाखेर संपेल ..तेव्हाच मुलांच्या वार्षिक परीक्षा आहेत..एव्हढ्या परीक्षा संपून दोघे सुट्टीत कोल्हापूर ला मावशीकडे जातील….. मग दुसरी कडे जागा शोधून त्यांना समजावून मी परत घेऊन येईन ..तर नोटीस ची मुदत अजून एखादा महिना वाढवून द्यायला जमेल का प्लीज? ” जयश्री ताईचे आर्जव ऐकून अमोल आणि अंकिता ने एकमेकांकडे पाहिले ..आणि अमोल ठामपणे म्हणाला ” नाही जमणार ते माई ” …

आणि जयश्री ताईंचा चेहरा पडला ” ओह….काही हरकत नाही …थांबा ह मी पाणी आणते ” असं म्हणत त्या आत जायला वळणार तेव्हढ्यात अमोल आणि अंकिता जोरदार हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी चमकून वळून पहिले…

” अहो माई… नाही जमणार कारण ..आता तुम्ही हे घर ही चाळ सोडून कुठे ही जायचं नाहीये.. मनसोक्त रहा हवं तोवर…अगदी भाड नाही दिलत तरी चालेल ” जयश्री ताईंचा स्वतः च्या कानावर विश्वास बसेना…त्याच स्वरात त्यांनी विचारलं ” म्हणजे? मी नाही समजले…तुम्ही हे घर विकणार होता ना? “…

” होय माई… पण आता नाही अहो ज्या प्रसन्न घरात आम्हाला तुम्ही मनापासून आशीर्वाद दिले…विश्वास दिला…बाप्पा ने आमचं गाऱ्हाणं ऐकलं ते घर कुठल्या ही मंदिरा पेक्षा कमी पवित्र नाही..आणि अश्या मंदिरातून देवालाच बाहेर काढण्याचं पाप आम्ही नाही करणार ” …अमोल चे उतर ऐकून जयश्री ताईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं…पदराने त्या डोळे टिपू लागल्या…

” आणि हो….तुमच्या छोट्या मनू चा आदेश आम्ही कसा नाकारणार? ?” अंकिता च्या या वाक्याने मात्र सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली…

” पण मग हि नोटीस? ? ” टेबलावर पडलेली नोटीस हातात धरत जयश्री ताईंनी प्रश्न केला..

” द्या ती इकडे….” अस म्हणून अमोल ने ती नोटीस हातात घेतली आणि जयश्री ताईंचा निरोप घेऊन दोघं बाहेर पडले….

त्या दोघांना पाठमोर पहात जयश्री ताई दारात येऊन उभ्या राहिल्या…

चौकात होळी पेटली होती…मुलं त्या होळी भोवती फेर धरून नाचत होती….अमोल ने जाता जाता ती नोटीस फाडली आणि त्या होळीच्या अग्निमध्ये टाकून दिली…

आता चौकातून ” माई लवकर ये खाली … नेवैद्याचे ताट घेऊन..” मनीष बेंबी च्या देठा पासून ओरडुन जयश्री ताईंना बोलावत होता …पण जयश्री ताईंनी नजर त्या होळीच्या ज्वाळां मध्ये खिळली होती…

यंदाची होळी जरा जास्तच तेजस्वी दिसत होती त्यांना…..

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..