सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ! प्रा. विजय पोहनेरकर यांची
हलकी फुलकी , डोक्याचा ताण कमी करणारी ” होळीची ” कविता !!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
” अटॅक बिटॅक येणार नाही ”
होळी म्हणते बिनधास्त जग
चिंता नको करू
कुणा बद्दल मना मध्ये
राग नको धरू ll
जे काय वाईट घडलं
त्याला लाव काडी
वर्तमानात जग जरा
मजा घे थोडी ll
संकट येत राहतील
घाबरून नको जाऊ
कोणत्याच गोष्टीचा
करू नको बाऊ ll
भिऊ भिऊ रोजच जगतोस
मोकळा श्वास घे
दोस्त मित्र जवळ कर
थोडी मजा घे ll
चौकटीत राहून राहून
कंटाळा येणारच
चार चौघात बसल्यावर
दुःख पळून जाणारच ll
स्त्री झाली म्हणून काय
तिला मन नसतं का ?
गुलाबी , लाल रंगाचं
तिचं वाकडं असतं का ?
शेजारणींनी , मैत्रिणींनी
एकत्र आलं पाहिजे
रंग खेळून मन कसं
चिंब झालं पाहिजे ll
मोठं झाल्या नंतर सुद्धा
लहान होता यावं
मुखवटा न घालता
आयुष्य जगता यावं ll
गप्पा मार , जोक सांग
खळखळून हास
अर्धी भाकरी जास्त घे
म्हणू नको बास ll
मन मोकळं जगल्यानं
प्रेशर होतं कमी
अटॅक बिटॅक येणार नाही
याची नक्की हमी ll
गप्पातल्या lnsulin ने
Sugar कमी होते
हृदयाच्या ठोक्यांची
गती धीमी होते
धुरवड साजरी करणं म्हणजे
वाया जाणं नसतं
गडगडाटी हासण म्हणजे
खरं Tonic असतं
एक दिवस पत्ते खेळल्यानं
दुर्जन थोडंच होतं
टेन्शन कमी झालं की
जगणं सोपं होतं ll
कोणत्याही व्यसनाच्या
आहरी नकोस जाऊ
गाण्याच्या मैफिलीत
रडगाणं नको गाऊ ll
कितीही चांगलं वागलं तरी
वाईट म्हणणार आहेत
तुझा कोण भव्य – दिव्य
पुतळा उभारणार आहेत ? ll
प्रा. विजय पोहनेरकर
9420929389
औरंगाबाद , 12/3/ 2017 ( होळी )
Leave a Reply