नवीन लेखन...

हॉटेल मॅनेजर गोमु (गोमुच्या गोष्टी- क्रमांक १७)

गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.
त्यासाठी लागणारे भांडवल नव्हतं.
आम्ही मित्र त्याच्यापेक्षा जरा बऱ्या परिस्थितीत असलो तरी त्याला भांडवल तर सोडा पण उधार पैसे देणं सुध्दा आम्हाला जड जात असे.
ह्याला अपवाद होता तो फक्त अन्वय पाटीलचा.
अन्वय मूळचाच श्रीमंत.
सोन्याचा चमचा तोंडात धरून आलेला.
आतां तर तो स्वत:ही भरपूर कमावत होता.
परदेशवारींतही त्याला बऱ्यापैकी पैसा मिळाला होता.
मी ह्या पूर्वीही म्हटले आहे की अन्वयचा गोमुकडे बघण्याचा दृष्टीकोन फारपॉझिटीव्ह होता.
त्याला पैसे देतांना तो स्वखुशीने देई व परत करण्याची अटही नसे.
स्वाभिमानी गोमुही त्याच्याकडे वारंवार जात नसे पण तो हुकमी सोर्स आहे, हे तो जाणून होता.
अन्वयची माझी भेट झाली तर अन्वय आवर्जून गोमुची चौकशी करीत असे.


एकदां मला अन्वयचा फोन आला आणि त्याने मला भेटायला त्याच्या ऑफीसमधे बोलावले.
मी पूर्वीही त्याला त्याच्या ऑफीसात भेटलो होतो.
बहुतेक वेळां गोमुसाठीच.
यावेळी तो आणखीच मोठ्या केबीनमध्ये बसला होता.
अन्वयने सरळ विषयालाच हात घातला.
तो म्हणाला, “पक्या, मला गोमु सेटल व्हावा असं नेहमी वाटतं.
त्यासाठी मला काय करतां येईल याचा मी विचार करतोय.
तू त्याला जास्त ओळखतोस म्हणून मला वाटले की पहिल्यांदा तुला विचारावे.
तुला काय वाटते, गोमु कोणते काम चांगले करू शकेल ?”
मी म्हटले, “गोमु कोणतेही काम मनापासूनच करतो पण कधी त्याचे नशीब त्याला दगा देते तर कधीतरी कुणी व्यक्ती त्याला दगा देते.
तो परत पहिल्यासारखा रिकामाच राहतो.
तो चांगला विक्रेता आहे, बऱ्यापैकी व्यवस्थापक आहे, बोलण्यात हुशार आहे.
पण मी हे तुला काय सांगतोय ? तूही त्याला चांगला ओळखतोस.”
त्यावर अन्वय म्हणाला, “समज, त्याला रेस्टॉरंट चालवण्याची जबाबदारी दिली तर ती तो चागल्या पध्दतीने सांभाळू शकेल कां ?”


मी क्षणाचाही विलंब न लावतां अन्वयला सांगितले, “नक्कीच. फक्त त्याला स्वत:च्या खाण्यावर ताबा ठेवावा लागेल. कारण तो त्याचा विकपॉइंट आहे.”
अन्वय हंसला, “ते मला ठाऊक आहे. असंही त्याला कामाचा भाग म्हणून सगळ्या डीशेस रोज टेस्ट कराव्याच लागतील.
खाण्याचं जाऊ दे.
पण बाकी सर्व गोष्टी त्याला जमतील ना !
स्टाफवर देखरेख करणं.
ग्राहकांच्या तक्रारी हाताळणं.
किचनवर, खाण्यासाठी नव्हे तर ते स्वच्छ आणि आरोग्यावर पोषक राहिलं यावर नजर ठेवणं.”
मी म्हणालो, “गोमुने कांही हाॅटेलींगचा कोर्स केलेला नाही.
पण जेव्हा जेव्हा हॉटेलांत जातो, तेव्हां तेव्हा तो बारकाईने सर्व पहात असतो.
त्याला जमेल हे काम.
कुठल्या हॉटेलात त्याला लावायचा विचार आहे तुझा ?”
अन्वय म्हणाला, “असं कुठल्यातरी हॉटेलात त्याला लावायचा नाही मला.
माझा विचार वेगळाच आहे.
मला त्याला हॉटेलच्या मालकींत भागीदार बनवायचा आहे.”
“काय ? गोमुला हॉटेलात मालक करणार ? कसा ?”


अन्वय म्हणाला, “मी आणि माझ्या कुटुंबाचे कांही सदस्य रेस्टाॅरंटच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायचा विचार करतोय.
आणखीही एक पार्टनर आहे, जो पैसे आमच्याबरोबर ह्या धंद्यांत गुंतवायला उत्सुक आहे.
आमच्यापैकी कोणालाही त्यांत प्रत्यक्ष लक्ष मात्र घालतां येणार नाही.
म्हणून आम्ही मॅनेजरवर रोजची सर्व जबाबदारी सोपवू इच्छितो.
गोमुने जर हे काम यशस्वीपणे केलं तर त्याला एक ठराविक पगार तर मिळेलच पण दरमहा नफ्याचाही थोडा भाग त्याला देतां येईल.
त्याची स्वत: बिझिनेस करण्याची इच्छाही पूर्ण होईल.
कसा वाटतोय माझा प्लॅन ?”
मी तर नि:शब्दच झालो होतो.
मी म्हटलं, “अन्वय, ही इतकी चांगली गोष्ट तूच गोमुच्या कानावर घालावीस हे उत्तम.
मला वाटे फक्त मीच गोमुचा हितचिंतक आहे.
अन्वय, त्याचा खरा हितचिंतक तूच आहेस.
ग्रेट यार, ग्रेट.”
अन्वय स्मित करत म्हणाला, “पक्या, संध्याकाळी आपण तिघे भेटूया.
तुझ्या समोरच मी त्याला ही ऑफर देणार आहे.
मात्र ह्यांत भांडवल घालणारा मी एकटा नाही, हे त्याने लक्षांत ठेवून हे काम यशस्वी केलेच पाहिजे.
जर नुकसान झालं तर मला इतरांना जाब द्यावा लागेल.
हे तू त्याच्या मनावर बिंबवले पाहिजेस.”


गोमु कांही उगाचच भावनाप्रधान होणा-यांतला नाही.
तरीही गोमुला अन्वयने जेव्हां हे सांगितले, तेव्हां गोमुला गहिवरून आलं.
त्याने अन्वयला वचन दिलं, “अन्वय, तू एवढा माझ्यावर विश्वास टाकतोयस, मी तो सार्थ करून दाखवीन.”
अन्वयने, सीबीडीच्या सेक्टर अकरामध्ये जागाही बघून ठेवली होती.
सीबीडी हे हॉटेल्सचं केंद्रच झालं होतं.
वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या ग्राहकांना आकर्षित करणारी रेस्टॉरेंट्स तिथे आली होती.
त्या सर्वांत आपली वेगळी खासियत निर्माण करून आपलं बस्तान बसवणं हे आव्हानच होतं.
पण अन्वयने ती बिझिनेस रिस्क घ्यायचे ठरवले होते.
ऑथेन्टीक मराठी खाणं कुठेच मिळत नव्हतं.
महाराष्ट्रांत मराठी जेवण नाही ह्याची अन्वयला खंत होती.
महाराष्ट्रांतील कोल्हापुरी, नागपुरी, पुणेरी, कोकणी, सोलापुरी आणि गोवन अशा सगळ्या भागांतल्या खास डीशेस त्या हॉटेलात देता आल्या पाहिजेत अशी त्याची इच्छा होती.

गोमु उत्साहाने कामाला लागला.


जागा ताब्यात यायच्या आधीच गोमुने मनाशी प्लॅन बनवला की हॉटेल कसं असावं किती सीटस असाव्यात ?
रचना कशी असावी ?
मग अन्वयला आणि त्याच्या इतर भागीदारांना तो प्लॅन समजावून त्यांची संमती मिळवली.
त्यानंतर अन्वयने एक इंटिरियर डेकोरेटर नेमला व गोमुचा प्लॅन कागदावर आला.
त्यावर अंमलबजावणी सुरू झाली.
त्या सर्व कामावरही गोमुलाच देखरेख करायची होती.
त्यात दोन तीन महिने जाणार होते.
अन्वयने गोमुला त्या काळांत पगार म्हणून पंचवीस हजार रूपये द्यायचे ठरवले.
हॉटेल सुरू होऊन नफा मिळायला सुरूवात व्हायला आणखी चार पाच महिने लागतील असा अन्वयचा कयास होता.
बघतां बघतां हॉटेल सज्ज झाले.
बसायला सोफे, सुंदर टेबलं, कांचेची आवरणे लावलेल्या आणि त्या कांचेवर आल्हाददायक नक्षीकाम केलेल्या भिंती, फुलदाण्या, छोटी झुंबरं असं मस्त सजवलेलं हॉटेल गोमुच्या हाती आलं होतं.
आधुनिक सोयींनी सज्ज किचनही तयार झालं.
किचन स्टाफ, वेटर्स, ह्या सर्वांची नेमणूकही गोमुने अन्वयच्या आणि कांही वेळा माझ्या मदतीने केली.
सर्व अनुभवी मंडळी मिळाली.
हाॅटेलच्या उद्घाटनाचा बेत ठरला.


अन्वयचा भाऊ आणि वहिनी यांनी दुपारी पूजा केली आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून हाॅटेल सुरू झालं.
एकावेळी ६० लोक बसतील अशी व्यवस्था होती.
पहिल्या दिवशी येणाऱ्या सर्वांना वीस टक्के सवलत ठेवली होती.
हाॅटेल पहिल्या दिवसापासून भरलेलं दिसलं पाहिजे म्हणून गोमुने पंचवीस टक्के सवलतीची कुपन्स करून सीबीडीमधल्या काॅलेजांत वाटली होती.
कुपन असले तरी प्रत्येकजण येतोच असं नाही कारण बाकीचे ७५ टक्के द्यावेच लागतात.
हाॅटेलची हँडबिलंही पेपरवाल्या बरोबर घराघरातून वाटली होती.
नव्या मुंबईत महाराष्ट्राच्या इतर भागांतून आणि इतर राज्यांतून आलेले लोक अनेक.
त्यामुळे खास मराठी खायला पहिल्याच दिवशी खूप गर्दी झाली.
कूपन घेऊन आलेल्या लोकांची, विशेषत: तरूणांची रांगच लागली.
मग बाहेर बसायसाठी भाड्याने आणलेल्या खुर्च्या टाकल्या.
हाॅटेल त्या दिवशी रात्री उशीरापर्यंत उघडं ठेवावं लागलं पण कोणी निराश होऊन परत गेलं नाही.
हाॅटेलचं पहिल्याच दिवशी नांव झालं.
हाॅटेलचं नावही तसंच होतं. “आपलेच हाॅटेल”.


हाॕटेलचा कांही स्टाफ रात्री तिथेच झोंपत असे. खूप उशीर झाल्यामुळे पहिल्या दिवशी त्यांच्याबरोबर गोमुही तिथेच झोपला.
फॅमिलीसाठी राखून ठेवलेल्या सोळा खुर्च्याच्या भागांत तो झोपला.
मग तेच सोयीचे वाटल्याने त्याने शेअरींग रूम आणि व्हरांड्यांची जागा सोडून दिली व मुक्काम हाॅटेलात हलवला.
चोवीस तास तिथेच असल्यामुळे आणि स्टाफशी आपुलकीने वागण्याच्या त्याच्या पध्दतीमुळे स्टाफला तो आपल्यांतलाच वाटू लागला.
त्याला त्यांचे चांगले सहकार्य मिळू लागले.
हाॅटेलमध्ये प्रोव्हीजनसचा अंदाज करणं, ती आणणं ही कामंही तोच करत असे.
कांही वायां जाऊ नये याचीही तो काळजी घ्यायचा.
कांही वेळ गोमु गल्लाही सांभाळत असे पण त्या कामासाठी एका थोड्या वयाने मोठ्या विश्वासू व्यक्तीला घेण्यात आले होते.
गोमु सर्वत्र फिरून सर्व ठीक चाललयं ना, हे पहात असे.
गिऱ्हाईकांशी संवाद साधत असे.
काय हवं नको पहात असे.
त्याने पाहिलं होतं की बरेच जण काय खावं हे ठरवून आलेले नसतात.
गोमु त्यांची चौकशी करून त्यांना “हे कां ट्राय करून पहात नाही ?” असे सल्ले देऊन आॅर्डर देण्याचं त्यांच काम सोपं करत असे.
टाटांच्या एकेकाळच्या विमानसेवेचा महाराजा जसा नम्रपणे झुकलेला असायचा, तसाच गोमु कायम गिऱ्हाईकांसमोर झुकलेला असे.
गोमुच्या आदरातिथ्याने ते खूष होऊन जात.


त्याचबरोबर गोमुने कांही स्कीम्सही जाहीर केल्या.
वाढदिवसाच्या पार्टीला दहा टक्के सूट आणि केक फुकट.
लग्नाचा वाढदिवस साजरा करणार असलात आणि त्यांत दहा जणांपेक्षा मोठा गृप येणार असेल तर दोन हार आणि केक फुकट व पाच टक्के सूट.
६० वर्षे पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन असेल तर हाॅटेलकडून स्त्रीला एक ड्रेस तर पुरूषाला एक शर्ट हाॅटेलकडून भेट मिळे.
पंचाहत्तर किंवा ऐंशी पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन असेल तर एखादी मौल्यवान भेट मिळे.
एखादा दिवस जरा गर्दी कमी वाटली तर तो एखाद्या काॅलेजांत सवलतीची कूपनं वाटून येई.
दुसऱ्या दिवशी बसायला जागा मिळणे कठीण होई.
गोमुने पहिल्या पंधरा दिवसांतच महिन्याचे टार्गेट अचिव्हं केलं.
एक दिवस संध्याकाळी मी आणि अन्वय हाॅटेलांत गेलो.
गोमु खुशींत होता.
त्याने आमचं स्वागत केलं.
हाॅटेलच्या कमाईचा रिपोर्ट तो अन्वयला रोजच देत होता.
पण त्याला तिथे असं यजमानासारखं वावरतांना आणि पाहुण्यांची सरबराई करतांना पहाणं आल्हाददायक होतं.


आम्हाला गोमुची प्रगती पाहून खूप समाधान वाटले.
अन्वय म्हणाला, “ह्या वेगाने तू दोन महिन्यातच ब्रेक इव्हन करशील.
मी खूप खूष आहे तुझ्यावर.
पुढल्या महिन्यापासूनच तुला फायद्यांतला भाग द्यायला मिळेल कां पहातो.”
गोमु म्हणाला, “माझा स्टाफही मेहनती आहे. मला मिळणारा अधिकचा फायदा मी प्रथम त्यांच्यांतच वाटणार.”
हाॅटेल व्यवसायात रूळलेला, आनंदीत, आपल्या स्टाफची काळजी घेणारा गोमु पाहून आम्ही दोघेही चकीत झालो.
अन्वयने गोमुवर टाकलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखवला होता.
हे सर्व पाहूनही माझ्या मनांत येत होतं की गोमु नेहमीप्रमाणे कांही गोंधळ तर करणार नाही ना !
परंतु लौकरच एक महिना पूर्ण झाला.
पहिल्या महिन्याचं हाॅटेलच्या उत्पन्नाचं टार्गेट २००%नी ओलांडलं होतं.
गोमुला पहिला पगार मिळाला.
अन्वयने इतर पार्टनर्स बरोबर बोलून गोमुला नफ्याचा भागही दिला.
गोमुने शब्दाला जागून तो स्टाफला वाटून टाकला.
आमचे सर्व मित्र गोमुकडे पार्टी मागू लागले.
गोमुने त्याच हाॅटेलमध्ये आम्हाला आठजणांना पार्टी द्यायची तारीखही ठरवली.
ती पार्टी कशी झाली आणि गोमुच्या हाॅटेलचं पुढे ह्या स्पर्धायुगांत काय झालं ते पुढील भागांमध्ये पाहू.

क्रमशः

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..