नवीन लेखन...

हाॅटेलिंग आणि मला न प(च)टलेल्या खाण्याच्या माॅडर्न पद्धती

Hoteling and Modern Eating Styles

ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय.

पैसे खर्च करायच्या नविन मार्गात हाॅटेलिंग हा चवदार प्रकार हल्ली भलताच लोकप्रिय आहे. हल्ली नवरा बायको दोघही नोकरी करणारे असल्याने त्यांची मुलाबाळांसहीतची निवांत भेट केवळ सुटीच्या दिवशीच होत असते आणि तो निवांत वेळ स्वयंपाक करण्यात घालवण्यापेक्षा एकत्र बसून गप्पा मारण्यात घालवणं ते पसंत करतात व त्यामुळे जेवायला बाहेर जाणं काहीसं अपरिहार्यही झालंय. याशिवाय जातिवंत खवय्यांची एक प्रजाती असते व त्यांचा कल नेहेमी नवनविन फुड जाॅईंटना आश्रय देण्याचा असतो.

मी व माझी पत्नी दोघही नोकरी करत असल्याने व मुलांना नवनविन हाॅटेलं माहित झाल्याने आम्हीही कधीतरी हाॅटेलात जातो. मी स्वत: खाण्यामधे जेवढा औरंगजेब गाण्यात दर्दी होता तेवढाच दर्दी, त्यामुळे हाॅटेलात जाऊन जेवायचं काय हा प्रश्न माझ्यासॅोर उभा राहातो. पण मी ही माॅडर्न आहे हे लोकांच्या (म्हणजे मुलांच्या) मनावर ठसावं म्हणून मी जातो.

मला या लेखात हाॅटेलातल्या चित्र-विचित्र नांवाच्या पण एकाच प्रकारच्या ग्रेव्हीत बनवलेल्या पदार्थांव्षयी काहीच टिप्पणी करायची नाही कारण वरती म्हटल्याप्रमाणे मला जेवण करणे आणि खाणे यात औरंगजेबाच्या गाण्याएवढाच रस असल्याने, मला असाही त्यावर बोलायचा एवढाही अधिकार नाही. मला सांगायचंय ते वेगळंच, खाण्याच्या हाॅटेलातील पद्धतीविषयी.

आता थेट मेनकोर्सकडे येतो.

का कोण जाणे, पण हाॅटेलातल्या जेवणाची सुरुवात ‘सुप’ने करायची हा बऱ्याचजणांचा प्रघात असतो. कुणी सुप पिण्याबद्दल माझी काही हरकत नाही. तशी ती मी घेऊही शकत नाही. पण आपण जेवणापूर्वी सुप का पितो याचं कुतुहल मात्र आहे. त्याचं ठोस आणि पटेल असं कारण मला अनेकांना विचारुनही सापडलं नाही. मग मात्र का कोण जाणे म्हणण्यापेक्षा हा युरोपियन मॅनर्स व एटीकेट्सचा आपल्यावर असलेला प्रभाव म्हटलं तर चुकणार नाही असं वाटलं. ब्रिटीशांनी आपल्याकडे जो वारसा सोडलाय तो ‘देशी साहेबां’नी कोणताही विचार न करता कटाक्षाने जपलाय असं माझं मत बनलंय.

सुप प्यायलावर सरसरून भुक लागते म्हणून प्यावं हे मी ऐकलं होतं पण अनुभव नेमका त्या ऐकीवाच्या नेमका उलट होता. माझा अनुभव असा, की सुप प्यायलो की पुढे मला फारसं जेवण जात नाही. माझी भुकही अंमळ कमी असल्यानं तसं होत असावं कदाचित. मग मी अनेकांना विचारल्यावर त्यांचही तसंच मत पडलं. आजारी माणसांना जेवण जात नाही म्हणून सुप देतात असंही माहित होतं म्हणजे सुप एका अर्थी लिक्विड जेवणाचं कार्य करतं असही अनुमान काढू शकतो. मग तरीही लोक सुप का पित असावेत?

गोरे साहेब पितात म्हणून आपण पितो हे एकच कारण मला त्यात दिसू लागलं. मला गोऱ्यांबद्दल दुस्वास नाही. उलट काही गोष्टी त्यांच्याकडून जरूर घ्याव्यात या मताचा मी आहे. पण त्या आंधळेपणाणं घेऊ नयेत असही मला वाटतं. जेवणाची सुरुवात सुपाने करण्यामागे साहेबांच्या देशातलं थॅड हवामान हे एक कारण असावं असंही वाटतं. पोटतली थंड पडलेली पचनयंत्र सावकाशीने सुरू व्हावीत व नंतरचं जेवण पचणं तुलनेने सोप जावं हे कारण जेवणपूर्वी सुप पिण्यामागचं असावं. आपल्याकडेही काही ठिकाणी काही जणांमधे पोळी/चपाती खाण्यापूर्वी तुलनेने नरम असा भात खाण्याची पद्धत आहे, त्या मागेही हेच कारण सांगीतलं जातं. दुसरं म्हणजे साहेबाचं जेवण आपल्यासारखं मलालेदार, ग्रेव्हीयुक्त ओलं नसतं तर बहुतकरून तुलनेने ड्राय पदार्थ खाण्याकडे साहेबाचा कल असतो. तो ड्रायनेस पोटात गेल्यावर नरम पडून पचावा हे ही कारण सुप पिण्यामागे असू शकेल.

आता सुप पिऊन झालं का वेटर टेबलवर प्लेट्स व काटे-चमचे-सुरी वैगेरे आणून ठेवतो. आपल्या डावीकडे रोटी/चपाती ठेवण्यासाठी लहान प्लेट व मुख्य पदार्थासाठीची मोठी प्लेट उजवीकडे पण आपल्या समोर ठेवतो. तो त्या प्लेट्स तशाच का ठेवतो हा एक फुकटचा प्रश्न मला नेहेमी सतावतो. होतं काय की रोटी/चपाती काट्याने किंवा चमच्याने प्रयत्न करूनही खाता येत नसल्याने भाजीसोबत हातानेच खावी लागते व डावीकडच्या प्लेटमधल्या त्या चंद्राचा तुकडा तोडतांना, लांब बाह्यांचा शर्ट घातला असेल तर त्याच्या कफ जवळचा भाग नेमका समोरच्या मसालेदार भाजीची चव घेतो. माझं तरी अनेकदा असं झालंय व त्यामुळे मी हाटेलात जायची पाळी आली की मी सरळ टि-शर्ट किंवा हाफ शर्ट घालून जातो.

चपाती/रोटीची प्लेट डावीकडे ठेवायची ही ही साहेबाची पद्धत. त्यांच्याकडे रोटी ऐवजी ब्रेड असतात व ते डाव्या हातानं काट्याने खाणं रोटी तशी खाण्यापेक्षा सोप व सोयीचं असतं. तसंच साहेब डावा व उजवा अशा दोन्ही हाताने खातो. डाव्याने ब्रेड व उजव्याने जे काही समोर असेल ते व त्यामुळे त्याला माझ्यासारखी बाह्यांची भिती बाळगावी लागत नाही. दोन हाताने खाण्याची पद्धत आपल्याकडे पंजाब्यांमधे आहे. डाव्या हाताने अख्खी रोटी हातात घेउन तोंडाने तोडतच ते जेवतात व उजच्या हाताने ती रसदार भाजी. प्रथम साहेब व नंतर हाॅटेल इंडस्ट्रीवर पंजाब्यांचा पगडा असल्यामुळे असेल कदाचित, अशा विचित्र पद्धतीने प्लेट्स मांडण्याची व जेवताना कसरत करायला लावणारी पद्धत आपण उचलली असावी. हे ही अंधानुकरणच..!!

आणखी एक, साहेबाचं जेवण ड्राय असल्यामुळे ते काट्या-चमच्यांनी सहज जेवू शकतात. आपल्यासारखं ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ वैगेरे कल्पना व त्यामुळे पूर्ण ब्रम्हाचा वास असलेली पाची बोटं जेवतांना मुखात गेली पाहिजेत अशी समजूत/श्रद्धा त्यांच्यात नसल्याने, त्यांच्या बोटांची व मुखाची गाठ पडणार नाही याची ते काळजी घेत असतात. आपण त्यांचं अनुकरण केवीलवाण्या पद्धतीने करत असतो व कधीतरी काट्याने पदार्थ उचलताना उडून बाहेर पडतो. तो तसा पडू नये यासाठीही काळजी घ्यावी लागते. अशी अनेक व्यवधानं सांभाळत जेवणं ते जेवण कसलं..? पूर्ण लक्ष देऊन हाताने जेवल्याशिवाय मला तरी जेवल्यासारखं वाटत नाही.

आता जेवण आटोपल्यानंतर आपल्यासमोर येतो तो गरम पाण्याचा बाऊल व एक लिंबाची फोड. याचं काय करायचं ते सुरुवातीला भल्या भल्यांना कळत नाही. अनेकजण तर ते पाणी लिंबू पिळून प्यायल्याचे दाखले अनेक नामवंतानी दिलेले आहेत. आता या पाण्यात हात ‘धुवायचे’ असतात हे इतर तसं करताना बघून लक्षात येतं पण चुळ कशी भरायची हे काही कळत नाही. कदाचित मॅनर्स आणि एटिकोट्समधे चुळ भरणं बसत मसावं. हे बाऊलचं फॅडही आपण साहेबाकडूनच उचललंय. साहेबाच्या देशात हवामान थेड व म्हणून गरम पाण्यात हात बुडवणं आलेलं असावं. पुन्हा वर लिहील्याप्रमाणे साहेबाचं जेवण आपल्या तुलनेत सुकं असतं व त्यामुळे त्याला चुळ भरण्याची आवश्यकता नसते. तसंच तो जेवतोही काटे-चमच्या आणि सुऱ्यांनी. खातो, त्यामुळे हात धुवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण काट्या-चमच्यांनी जेवणासोबत बाऊलमधल्या गरम पाण्यात हात बुडवायला (धुवायला नव्हे) शिकलो पण त्यात मसालेदार पूर्णब्रम्हाची आहुती दिलेल्ल्या मुखाचा अंतर्भाग मसाल्याच्या ओलसरपणमुळे माखलेला असल्याने मुख प्रक्षालन कसं करायचं ते अद्याप मला तरी कळलेलं नाही.

अर्थात हे काही प्रश्न मला पडलेले आहेत. अनेकांना तसे ते पडलेले नसतीलही किंवा असल्यास त्यांनी ते घासासोबत गिळूनही टाकले असतील. असंच का आणि तसं का नाही ह्याची उत्तर शोधायची प्रथमपासूनच खोड असल्याने मी माझ्यासमोरचा गोंधळ आपल्यासमोर मांडला. हाॅटेलात जेवतांना आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय यात माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही. कुणाला तसंच जेवायला आवडत असेल तर माझा आक्षेपही नाही. मी या लेखातून माझी मत आणि समज सांगीतले. आणखी ‘अॅन अॅपल अ डे, किप्स डाॅक्टर अवे’ यासारखी आपल्या देशात अर्थहीन असलेली भंपक म्हण, बुफे जेवण, टाॅयलेट पेपर्स व भेट म्हणून आलेले बुके यावरही बरंच काही लिहीता येईल, पण पुन्हा केंव्हातरी.

— नितीन साळुंखे
9321811091

मन कि बात

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..