घरी आल्यावर बायकोने कपाळावर हात मारला! “अहो, या दोन किलो
जिलब्या मी काय माझ्या डोक्यावर थापून घेऊ का? जा, जा, परत करा त्या मी दोनशे ग्रॅम सांगितल्या तर दोन किलो घेऊन आलात? खाणारे आपण तिघं त्यात मला डायबेटीस. तुम्ही एखादा तुकडा खाणार, मग याचं काय करायचं?’
“अग, असू दे आता. मी मुद्दामच आणल्यात जास्त. तुला हव्या तेवढ्या ठेव, बाकी मी उद्या क्लासमध्ये द्यायला आणल्यात!”
“सर काय बोलताय काय? खरंच असं झालं?”
“अरे, मग सांगतेय काय? हे तुझे प्रोफेसरसाहेब, कॉलेजमध्ये असतील वाघ. पण व्यवहारात एकदम शेळी रे शेळी! बरं, काय रे तू कशाला आला होतास? आमच्या या बुडुला गंडवायला तर नाही ना?”
“छे! छे! काय बोलताय बाईसाहेब? अहो मी काय गंडवणार यांना?”
“उल्हास, अरे हे क्रेडिटकार्ड तूच ना मारलेस माझ्या गळ्यात? गोड गोड बोलून?”
“क्रेडिट कार्ड? बघू बघू!” म्हणून हीनेही ते घेतले. उल्हासने अगदी नव्या उत्साहाने तिला सगळं रामायण पुन्हा सांगितलं. त्यावर ही खूष होऊन गेली.
“एक वर्ष फुकट आहे ना? मग काही हरकत नाही. यांच्या हातून मुहूर्त होतोय ना? छान! आणू का आणखी थोडी जिलबी?”
“नको, बाईसाहेब राहू द्या. उशीर फार झालाय.” चहा घेऊन उल्हास तोटे ”
सटकला. क्रेडिट कार्ड हिच्या ताब्यात देऊन!
मी पण कामाला लागलो. दोन तास त्या तोट्याने खाल्ले. माझे नेहमीचे रुटीन चालू झाले. क्रेडिट कार्ड प्रकार मी विसरुनच गेलो. कारण दुकानात जायची वेळ माझ्यावर क्वचितच यायची. यायची म्हणण्यापेक्षा यांना दुकानात पाठवणे म्हणजे नसती आफत अशी हीची ठाम समजूत. मी पण गप्प बसून ते संकट परस्पर टळतंय ते बरं अशा धोरणीपणाने आणि एकूणच प्रोफेसर मंडळी म्हणजे जरा हीच असतात या बुरख्याखाली ते अप्रिय प्रसंग टाळीत असे. कुठल्याही दुकानात जाऊन खरेदी करणे म्हणजे तो दुकानदार आपल्यावर उपकार करायलाच बसलाय या भावनेने मी त्याच्याकडे अगदी लाचारीने पहातो. रेल्वे खिडकीवर जाऊन तिकीट काढणे किंवा रिझर्वेशन करणे म्हणजे त्या महान व्यक्तीस आपण फारच त्रास देतोय ही आमची भावना! तर हे माझे शत्रूपक्ष टाळणेच मी पसंत करतो.
मधे आठ-पंधरा दिवस गेले. चिरंजीव म्हणाले, “बाबा! तुमचे लेंगे आता फार जुने नाही का वाटत तुम्हाला?”
“का रे बाबा, माझ्या लेंग्यांवर का घसरलास? फार तर दीड-दोन वर्ष झाली असतील. आणि घरात तर घालायचे असतात.”
“बाबा, प्रत्येक वस्तूचे एक आयुष्य असते. त्यानंतर त्याचे विसर्जन करावे लागते. गणपती नाही का, आपण नवा कोरा आणतो, पण पाच-दहा दिवसांनी त्याचं विसर्जन करतोच ना? देव पण हेच सांगतो.फार मोह पाशात गुंतू नका.
“हे बघ राहूल, तू मला मोहपाशाच्या गोष्टी शिकवू नकोस. अरे कुठे लेंगा आणि कुठे गणपती? काही कशाचा ताळमेळ?”
“काय चुकलं हो त्याचं? आणि काय वाईट सांगतोय का तो? ते जुने लेंगे द्या आता फेकून. वीट आला तेच तेच पाहून. ते प्रोफेसर दीक्षित पहा, कसे पॉश असतात. रोज रोज नवीन झब्बा सुरवार घालतात घरात कायम. टिप टॉप!”
“आता, कोण हे दीक्षित काढलेस?”
“अहो,ते अवंतिकाचे वडील हो?” सौ.
“अवंतिकाचे वडील? कोण ही अवंतिका? मला समजेल असं बोलशील
का?”
‘अहो, असं काय करताय? ती अवंतिका मालिका नसते का टी.व्ही. वर?
त्यातल्या अवंतिकाचे वडील! ते प्रो. दीक्षित म्हणतेय मी!
“अच्छा? ते दीक्षित म्हणतेस होय? अग हे टी.व्ही मालिकावाले काय वाट्टेल ते दाखवतात. एखाद्या कारकुनाचे घरसुद्धा एखाद्या सावकाराच्या तोंडात मारील असे दाखवतात.
“ते जावू दे! मी म्हणते, चांगलं टिपटॉप रहायला काय हरकत आहे हो?”
“अग, म्हणजे रोज ते टिप टॉप ठेवायचं म्हणजे आलंच रोज धोबी इस्त्रीचा भुर्दंड. त्यापेक्षा हे काय वाईट आहे? धुतलं की घातले. काही इस्त्री नको का फिस्त्री!’
“अहो, पण ते लेंगे आता अगदी विरलेत हो. नका पाहू अंत त्यांचा, काही नाही. आता जर का तुम्ही ते नवीन शिवणार नसाल ना, तर मी राहूलला सांगते नवे सुरवार झब्बे आणायला तुमच्यासाठी. रेडीमेड!
“अग, नको, नको. मला ते रेडिमेड कपडे नाही येत अंगाला. पुन्हा ते उंची जास्त झाली. हात लांब वाटतात. म्हणून मी कमीजास्त करायचे प्रकार. मी आणतो दोन -चार दिवसात नवीन कापड आणि टाकीन शिवायला मग तर झालं?
तो विषय तिथं संपला. मग दोन-चार दिवसांनी मी हिला म्हणालो, “बरं का ग, मी येतो जरा बाहेर जाऊन.”
“कुठे?”
“अग ते लेंग्यासाठी कापड घेतो आणि आपला मॉर्डर्नवाल्याकडे शिवायला टाकतो.”
“थांबा. मी येते तुमच्याबरोबर.
“अग, आता तू कशाला तेवढ्यासाठी?”
“थांबा म्हणते ना? मी येते. तुम्हाला नाही कळायचं कुठलं कापड घ्यायचं
ते.”.
“म्हणजे? अगं लेंग्याला काय मी लाल, पिवळ्या रंगाचं कापड घेणार आहे का? साधं पांढरं तर कापड आणायचंय. तू उगाच नको माझ्यामागे लागू,
“अहो, दोनशे ग्रॅम जिलब्या आणायला पाठवले तर दोन किलो घेऊन आलात! आता लेंगे आणायला जाल आणि लंगोट घेऊन याल!”
“काय म्हणतेस काय तू? अगं लंगोट आणि लेंगा हे मला काही कळत नाही का? तूम्हणजे बुवा अगदी कहरच करतेस कधी कधी
“हे पहा. पांढरे कापड आणणार असाल ना, तरी त्यात हजार प्रकार असतात. तुम्हाला काही कळायचं नाही. घेऊन याल एखादं मांजरपाट!”
“बरं, मग असं करतेस का? तूच घेऊन ये. एखादं चांगलं पांढरं कापड. त्या मॉडर्नवाल्याला विचार माझ्या लेंग्या,झग्यासाठी किती लागेल ते. नंतर मी जाईन शिवायला टाकायला.” ही खरेदीची ब्याद टाळावी म्हणून मी ठेवणीतला उपाय काढला पण हिनं तो उधळून लावला.
“काही नको, आपण बरोबरच जायचं. आणि माप घेऊ आणि तसेच दुकानात जाऊ.पुनः पुन्हा नको तेच तेच काम!”
आम्ही दोघं बाहेर पडलो. शिंप्याकडे जाऊन किती कापड लागेल याचा अंदाज घेतला आणि मी माझा मोर्चा शेजारच्याच दीपक क्लॉथ स्टोअरकडे वळवला.
‘मला वाटलेच तुम्ही इकडे घुसणार ते! तुम्हाला काय दीपक शिवाय दुसरे काही दिसतच नाही का हो?”
“का गं? काय वाईट आहे? शिवाय पांढरे कापड तर घ्यायचंय. त्यात काय बघायचं? पटकन घेऊन जाऊ आणि मोकळं होऊ?”
“अहो जरा पहा तरी आजुबाजूला. केवढाली मोठी मोठी सुंदर, वातानुकुलीत दुकानं आली आहेत ती? आम्ही मेलं त्या भिकारड्या शिवाय कुठे जाणारच नाही कधी. चला मी तुम्हाला एक मस्त पॉश दुकानात नेते आज. ह्या डायमंड हॉलसमोर नवं दुकान झालंय, कामिनी, तिथं जाऊ.’
कामिनी? म्हणजे बायकांचं दिसतंय, साड्या बिड्यांचं?”
“हो साड्यांचंच आहे! पण तिथं पांढरं कापडसुद्धा मिळतं.”
“अग, पण येवढ्याश्या पांढऱ्या कापडासाठी येवढ्या मोठ्या दुकानात जायचं?”
“मग? तो दुकानदार काय खातोय का काय आपल्याला? अहो त्याचा धंदाच आहे. काय हवं ते दाखवलं पाहिजे त्यानं आपल्याला. आता ग्राहकराजाचे दिवस आहेत म्हटलं.”
“अगं, पण घ्यायचंलेंग्याचं कापड, आणि बघायच्या साड्या?”
“मग काय झालं! तुम्ही ना फारच घाबरट बाई! चला माझ्याबरोबर मुकाट्यानं,
मी बळीचा बकरा असल्यासारखा खाटकाच्या हाती मान देतात तसा,
निमूटपणे निघालो.
–विनायक अत्रे
Leave a Reply