नवीन लेखन...

हौस – Part 3

कामिनीच्या रखवालदाराने दरवाजा उघडला. मी घाबरत घाबरत त्याच्याकडे बघितले. बायको एकदम रुबाबात शिरली, रखवालदार जणू तिच्या दृष्टीने एखादे झुरळच! मी गुपचूप त्या भव्य आणि पॉश दुकानात, केविलवाणे पणाने इकडे तिकडे पांढरे कापड शोधीत होतो. सौ. ने आपला मोर्चा भरजरी साड्यांच्या काऊंटरकडे वळवला! मी घाबरत घाबरत म्हणालो, “अग, आपल्याला पांढरं कापड घ्यायचंय ना?”

“गप्प बसा हो! तुम्ही मुकाट्याने या माझ्या मागून ! मी बघते काय करायचे ते!”

काऊंटरवरच्या सेल्समनने स्वागत केले, “या या बाईसाहेब, काय दाखवू? पैठणी, कोईमतुरी, ब-हाणपुरी, संबळपुरी, नारायणपेठी, जिजामाता, इचलकरंजी, टिश्यू, गार्डन, शिफॉन, सिल्क, पोचमपल्ली, पॉलीएस्टर, ऑफीस वेअर, कॅज्युल वेअर, विपुल, कुंचर अजय, कल्पना सगळा लेटेस्ट माल आलाय.”

आता तो पुणेरी लेंग्याचे कापड पण आहे असे म्हणतो की काय असे मला वाटले! पण हिला म्हणालो, “अगं आपल्याला लेंग्याचे कापड घ्यायचंय ना?”

“तुम्ही गप्प बसा हो! काय हो दुकानदार, तुमची काही हरकत नाही ना साड्या बघायला?”

“छे! छे! बाईसाहेब, अहो हे काय विचारणं झालं? अहो, मग आम्ही कशाला आहोत इथं? अहो गि-हाइकाचा संतोष हाच तर आमचा संतोष! बोला, काय दाखवू?”

“ती, तिकडे कोपऱ्यात आहे ना. तीच तीच, ती नाही हो, ती त्याच्या पलीकडे, त्याच्याच शेजारची, हां ती किरमिजीच हां, ती जरा दाखवा पाहू.”

“काय आहे हो हे मटेरियल?”

‘बाईसाहेब, फार लेटेस्ट फॅशन आहे. इचलकरंजी आणि बहाणपुरीचा मिक्स आहे. अलीकडे लग्नात फार चालते. पैठणी हिच्यापुढे फिक्की पडते. हा तुमचा चॉईसही फार मस्त आहे कलरचा.

“केवढ्याला बसेल हो?”

“फार नाही बाईसाहेब. फक्त दोन हजार. पण चीज काय आहे. पाच हजाराचा शो आहे मॅडम!”

“असं करा, ही राहू द्या बाजूला, ती वरच्या बाजूला आहे ना, ती तांबडी, हां ती काढा बरं जरा.”

“वा! कित्ती छान! केवढ्याला हो?”

“फार नाही ताई, फक्त साडेतीन हजार! पटोला आणि नारायणपेठी दिमाख आहे. हा पल्लू पाहिलात बाईसाहेब? हे मोर पहा त्यावर. आणि तांबडा रंग फार खुलणार. कोणासाठी हव्यात मॅडम?”

“अहो, आता मुलाचं लग्न करायचंय ना, तेव्हा खरेदी करावी लागेल म्हणून ठेवतेय पाहून. आत लगेच काही घ्यायच्या नाहीत एवढ्या महागड्या.”

“हो,हो, पहा ना बाईसाहेब. अहो पाहिल्याशिवाय कसे समजणार काय काय नवीन प्रकार आहेत ते? आम्ही बाईसाहेब, स्वतः जाऊन निवडक माल आणतो. नुसतं इथं बसल्या बसल्या नाही ऑर्डर देत. अख्या ठाण्यात फिरलात ना बाईसाहेब तरी आमच्यासारखी व्हारायटी मिळायची नाही कुठे. गि-हाइक एकदा आलं की पुन्हा यायलाच पाहिजे. बरे बाईसाहेब तुमचं साधारण बजेट काय. म्हणजे तसे दाखवायला बरं.”

“हे पहा साधारण ५०० ते २००० च्या रेंजमध्ये दाखवा. त्यांच्यावरच्या पण दाखवा. पाहून ठेवते.”

“अग,पण घ्यायच्या नाहीत तर कशाला उगाच त्यांना त्रास?”

“तुम्ही जरा गप्प बसा हो, ते दाखवताहेत तर तुम्ही कशाला नकारघंटा वाजवताहात?”

“साहेब, आपण जरा बसा इथं आरामात अरे गोविंद साहेबांना एखादं कोल्ड्रिंक आण बरं. आपण बसा साहेब.” “हां, हे बरं झालं. तुम्ही बसा इथे आरामात. मी पहाते साड्या. अहो त्यांना नवीन सुरत पटोला आल्यात त्या त्यांचा एखादा नमुना दाखवाना.”

‘बाईसाहेब, त्या वरच्या मजल्यावर आहेत. अरे गोविंद, बाईसाहेबांना जरा वर प्रकाशकडे घेऊन जा बरं. साहेब तुम्ही बसा इथं. बाईसाहेब येतील जाऊन वर.”

“तुम्ही बसा हो इथं, मी येते जाऊन वर. आणि बरं का हो दुकानवाले,
त्या साड्या ठेवल्यात ना बाजूला, त्या राहू द्या बरं का तशाच. मी येईपर्यंत देऊ नका कोणाला.”

मला बसवून ती वर गेली. मी कोल्ड्रिंक पीत बसलो. ते आधुनिक चकचकीत दुकान बघत. खुर्ची आरामशीर होती. हवा थंडगार होती. बसल्या जागी माझ्या डोळा लागला. हिने हलवल्यावर मी जागा झालो!

“अहो उठा आता! झोपलात काय? चला झाली माझी खरेदी.’

“तुझी खरेदी? म्हणजे?”

“अहो, या दोन गार्डन शिफॉन, दोन कॅज्युअल वेअर आणि दोन नारायणपेठी घेतल्या. एका सुरत पटोला पण घेतली आणि कित्ती तरी प्रकार आहेत. सगळे पाहून ठेवले. आता राहुलच्या लग्नात खरेदी करायची ती इथेच!”

मी घड्याळात पाहिले. दोन तास होऊन गेले होते!

“आता आपण माझंपांढरं कापडघ्यायचं ना?”

“हो, ते आपण दीपकमधे घेऊ. साधं पांढरं कापड तर घ्यायचंय! त्यासाठी येवढं पॉश दुकान कशाला?”

“म्हणजे?”

“अहो इथं नाही मिळत ते!”

“अगं मघाशीच नाही का घ्यायचे? इकडे कशाला आणलं?”

“तुम्हाला किनई. कसली हौसच नाही मेली! कधी बघितलं होतं का येवलं चकाचक दुकान? मुद्दामच आणलं होतं तुम्हाला दाखवायला! चला जाऊ त्या दीपकमध्ये. तुमचं ते लेंग्याच कापड घेतलं ना की सुटले!”

“अग, पण मी म्हणत होतो ना तू कशाला त्रास घेतेस म्हणून? मी नसतं का आणलं? उगाच माझा वेळ मात्र गेला दोन तास! बरं किती झालं बिल?”

“काही नाही.फक्त पाच हजार!”

“काय? पाच हजार? अगंयेवढे पैसे नाहीत माझ्याकडे!’

“मला ठाऊक आहे. तुमचं नेहमीच असं असतं. कधी मार्केटिंगला निघालो तर पाकिटातून भरपूर पैसे घेणार नाहीत. ऐनवेळेला खाली पहायची वेळ येते.

“अगं, पण मला काय माहित तुला येवढ्या साड्या घ्यायच्यात ते? बरं थांब मी इथून राहूलला फोन करतोघरी आणि पैसे मागवून घेतो. तोपर्यंत बस इथं तूपण घे कोल्ड्रिंक.”

“काही नको. येवढं घाबरू नका. मी करते सगळी सोय.”
“म्हणजे?”

तिने पर्समधून क्रेडिटकार्ड काढून माझ्यापुढे धरले!!

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..