दुपारी मस्त पाऊस पडत होता. भाऊसाहेब रावसाहेबांना म्हणाले, चला रामभरोसेत. झक्कास भजी मिळते तिथे.
भाऊसाहेबांच्या ऑफरला रावसाहेबांनी नाकारणं शक्यच नव्हतं. कारण भाऊसाहेबांच्या ऑफरी बिग बाझारी स्टायलिच्या असत. म्हणेज एकावर पाच फुकट-बिकट. रावसाहेब नोकरित आल्यावर याच भाऊसाहेबांनी त्यांना ही बिकट वाट सोपी करुन दाखवली होती. त्यामुळे भाऊसाहेब बोलेनि रावसाहेब हाले. तिकडे नो आर्ग्यूमेन्ट. तेव्हा भजी म्हंटल्यावर रावसाहेबांची नसलेली भूक प्रज्वलित झाली. फुकटात-बिकटात हे सारच चालतं. यात पोट-बिट बिघडलं तरी पुन्हा भाऊसाहेबच डॉक्टरकडे नेण्यास कार्यतप्तर. औषधही तेच घेणार नि बिलही तेच देणार. म्हणजे इथेही फुकटात-बिकटातच . तेव्हा रावसाहेबांना तशी काही चिंता नव्हतीच.
भाऊसाहेब सोबत असताना सर्व चिंता अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये नेऊन ठेवायच्या असतात याचं ज्ञान त्यांना नोकरीच्या तिसऱ्याच महिन्यात उत्तमरित्या आलं होतं.
आता हे भाऊसाहेबांना जमत कसं हे मात्र विचारायचं नाही. तसा अलिखत नियम सम्राट अकबरानेच केला होता म्हणे . तो नियम कोणत्याही बादशाही-पादशाही – राजेशाही-निजामशाही-इमादशाही-लोकशाहीने बदवलला नाही.
भाऊसाहेब-रावसाहेबांची जोडी वीरु-जयपेक्षाही घट्ट होती. याचा अर्थ रावसाहेब भाऊसाहेबांसाठी मदारीवाला बंदर नव्हते हे सुध्दा तितकेच खरे. मात्र या रावसाहेबांना भजी म्हंटली की त्यांचे बंदर झाल्याशिवाय राहतच नसे. त्यामुळे रावसाहेब भाऊसाहेबांसोबत रामभरोसेत अतिव आनंदानेच आले.
भाऊसाहेबांनी दोन प्लेट कांद्याभज्यांची ऑर्डर दिली.पाच मिनिटात छोटूने दोन प्लेट गरमागरम भजी दोघ्यांच्या पुढ्यात ठेवले.
अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स. हा हा हा भाऊसाहेबांनी त्यानांच समजेल असा (पांचट) विनोद केला .फुकट-बिकट भज्याला जागण्यासाठी रावसाहेबांना हा हा करावे लागले.
हॉटेलमधीलच भजी कुरकुरे कां होतात ,याचा शोध घ्यायलाच हवा गडे. रावसाहेब पुन्हा मूळ मुद्यावर आले. भाऊसाहेबांनाही त्यांचं म्हणनं पटलं. हा शोध घेणं अत्यावश्यक असल्याच त्यांनाही वाटू लागलं होतं. कारण त्यांच्या बायकोला तर भजेच बनवता येत न्हवते. कुरकुरे भजे अफगानिस्तानातच राहिले. त्यामुळे रावसाहेबांच्या प्रपोजलला भाऊसाहेबांनी पाठिंबा दिला. घरची (नॉट-सो कुरकुरित) भजी आणि हॉटेल (हॉट-सो-कुरकुरित) ची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ, समकालीन वास्तवाचे सत्यशोधन..हा संशोधनाचा विषय रावसाहेबांना सुचला सुध्दा.
पीएचडी करण्याचे त्यांचे स्वप्न होतेच. हे स्वप्न मरण्यापूर्वी पूर्ण करणार(च) असा त्यांचा पण होता. आतापर्यंत त्यांना विषय सूचत नव्हता. व्यासमुनिंनी सारे काही लिहून ठेवले होते. त्यामुळे विषयांचा ठणठणपाळ होता. विषय नाही म्हणून संशोधानाला सुरुवात नाही,असे रावसाहेबांच्या बाबतीत इतकी वर्षं होत होते. पण आज अचानक त्यांना संशोधनाचा विषय सापडला.
ऑर्किमेडिजला तो स्नानगृहात उघडाबंब असताना कोणतातरी शोध सापडला तेव्हा तो युरेका युरेका ओरडतच भोंगळाच बाहेर धावत सुटला होता. रावसाहेबांना हॉटेलमध्ये भज्यावर ताव मारताना विषय सापडला होता. त्यांनाही कुरेका कुरेका असे ओरडत बाहेर जाऊन नाचायची इच्छा होत होती पण ते आर्किमेडिजच्या ऐवजी रावसाहेब होते ना. त्यामुळे पंचाईत झाली. पण त्यांनी मनातल्या मनात युरेका अरे कुरेका, असे म्हणून त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी छोटूला थाटात हाक मारली आणि तो येताच पुन्हा दोन प्लेट कुरकुरित भज्याची ऑर्डरही दिली. याचे बिल आपणच देणार हे त्यांनी जाहीर करुन टाकले. भाऊसाहेबांना हा धक्का न मानवणारा होता.. पण हॉटेलातील कुरकुऱ्या भज्यांचे रहस्य शोधण्यासाठी त्यांनी हा धक्का मोठ्या धिराने आणि साहसाने सहन केला..
—
Leave a Reply