सी मेंटचा शोध लागण्यापूर्वी बांधकामात इतर पदार्थांचा वापर होत असे. चुन्याचा शोध फार प्राचीन काळीच लागला होता, कारण उत्तर भारतात चुनखडीचे खडक अस्तित्वात होते व आहेत. हे पांढरे खडक इतर खडकांच्या तुलनेत खूपच ठिसूळ व छिद्रमय असतात. ते फोडणे सहज शक्य होते.
पावसाच्या पाण्याने त्याची धूप होऊन आजूबाजूला पसरत असे. त्याचा थर हळूहळू कडक होत असलेला पाहून त्या चुनखडीचे गुणधर्म माणसाला समजले. दुसरे म्हणजे वाळूच्या दोन दगडांमध्ये चुन्याची धूप वाळल्यावर ते दगड एकमेकाला घट्ट चिकटलेले आढळल्यावर त्याचा चिकटपणा हा गुणधर्म लक्षात आला. तेव्हा दगडी किंवा विटांच्या बांधकामात सांधे भरण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो हे लक्षात आले.
म्हणून चुनखडीची पूड करून तिचे पाण्याबरोबर मिश्रण करून त्याचा सांधे भरण्यासाठी वापर होऊ लागला. त्यापूर्वी चिकण मातीचा वापर सांधे भरण्यासाठी होत असे. चिकण माती व वाळ यांच्या मिश्रणाने विटा बनवल्या जात व भिजवलेली चिकण मातीचा सांधे भरण्यासाठी वापरीत. जेथे पावसाचे प्रमाण खूप आहे, त्या भागात मातीचे सांधे उखडले जात असत, पण चुना एकदा सांध्यात भरल्यावर वाळला की कडक होऊन तो अनेक वर्षे टिकत असे.
विशेषतः दगडी बांधकामात चुन्याचा उपयोग पूर्वीच्या किल्लेबांधणीत केलेला आढळतो. आणखी एक प्रकार सुरकी नावाने ओळखला जातो. भट्टीत भाजलेल्या विटांचा चुरा करून त्याचाही उपयोग सांधे भरण्यासाठी होत असे. म्हैसूरमधील कृष्णराजसागर धरणाचे सबंध दगडी बांधकाम सुरकी मॉर्टरने बांधले आहे. आज सीमेंट अत्यंत प्रगत अवस्थेतील आहे. चिकट गुणधर्म असलेला पदार्थ वापरूनदेखील २०-२५ वर्षांतच भिंतींना व काँक्रीटला भेगा जातात. याचा संबंध कामाचा निकृष्ट दर्जा व अकुशल कारागीर आणि देखरेखीचा अभाव यांच्याशी आहे. जुनी बांधकामे अजूनही टिकून आहेत, याचे कारण त्या वेळी भिंतीची जाडी २ ते ३ फूट ठेवीत असत. त्यामुळे हवा, पाऊस, उन्हाळा यांचा फारसा हानीकारक परिणाम होत नसे.
Leave a Reply