वार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:
ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी तोंडावाटे प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.
अभ्यंग- संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.
Leave a Reply