* गझल (ग़ज़ल) हे गेय काव्य आहे. शब्द, अर्थ आणि संगीत यांचा अजोड मिलाफ गझलमध्ये होतो.
- इतर पद्य रचनांमध्ये साधारणतः अंत्य अक्षरयमक असते. पण गझलमध्ये रदीफ आणि काफिया अशी दोन यमके असतात. त्यातील एक असते संपूर्ण शब्दाची वा शब्दांची पुनरावृत्ती; आणि दुसरे असते अक्षर अथवा अक्षरसमूहाची पुनरावृत्ती. अशा दुहेरी यमकामुळे गझलचा मझा (मज़ा) वाढतो.
- गझल आणि कविता (अथवा गीत) यांच्यात एक मूलभूत फरक आहे. असे म्हटले गेलेले आहे की, कविता हा एक हार आहे तर गझल हा भिन्न भिन्न फुलांचा गुच्छ आहे. कवितेला एक मध्यवर्ती विषय असतो. एक मध्यवर्ती विषय घेऊन गझल लिहिली जाऊ शकते, पण साधारणतः गझलच्या प्रत्येक ‘शेर’ला (द्विपदीला) वेगवेगळा विषय असतो. प्रत्येक शेर स्वतंत्र असूनही, हे सर्व शेर एकमेकांशी रदीफ-काफिया ने बांधलेले असतात. (म्हणून, अनेकदा गझलला शीर्षक दिले जात नाही कारण विषयांची विविधता.) गझलचा प्रत्येक शेर एक कविताच असते आणि एक गझल रसिकाला अनेक कवितांचा आनंद देते.
- म्हणूनच, कविता उलगडत जाते तशी गझल उलगडत जात नाही; प्रत्येक ‘शेर’चा स्वतंत्र आस्वाद घ्यावा लागतो. गझलची मांडणी कवितेपेक्षा मूलतःच भिन्न असते, हे ध्यानी घ्यावे लागते.
- उर्दू ‘शेर’बद्दल ठाऊक असल्यास, गझलच्या ‘शेर’बद्दल अधिक सांगायला नको. शेरच्या पहिल्या ओळीत एका विषयाचे सूतोवाच अथवा सुरूवात होते. दुसर्या ओळीत तो विषय अधिक गहिर्या पद्धतीने मांडला जातो किंवा त्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळते आणि हे साध्य करतांनाच ‘रदीफ-काफिया’ही साधला जातो. अशा अनेकविध खासियती असल्यामुळे गझलचा प्रत्येक शेर रसिकांची उत्स्फूर्त दाद घेऊन जातो. त्यातच, गझलची अतूट लय रसिकाला अधिक धुंद करत जाते.
- गझलचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील आर्तता, उत्कटता आणि ही उत्कटता गझलच्या प्रत्येक शेरमध्ये आढळते. म्हणजेच, एका गझलमध्ये ती आपल्याला अनेक वेळा भेटत राहते. म्हणून गझल हृदयाला अधिक भिडते.
- अखेरीसः गझल हे काव्य खरे, पण ते गेय काव्य आहे. त्यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्वाद घेतांना सुद्धा ‘ध्वन्य’ पद्धतीने वाचावी, म्हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल.
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126
eMail – vistainfin@yahoo.co.in
Leave a Reply