मी लेखन करायला लागलो, त्याला आज काही वर्ष उलटून गेली. एखादी गोष्ट,व्यक्ती भावते, एखादा सुंदर अविस्मरणीय अनुभव येतो, मनात ठसलेल्या काही गतस्मृती जाग्या होतात, काही खूप आनंद देणारे प्रसंग घडतात आणि मग मात्र ते शब्दरूपात उतरल्याशिवाय शांत बसवत नाही. अधूनमधून काही वैचारिक स्फुरतं.
आता, जोपर्यंत तुमचा एखादा शब्दसंग्रह प्रकाशित होत नाही, तोपर्यंत साहित्यजगतात तुम्ही लिंबू टिंबुच असता. मला साहित्य सभा, काव्य संमेलनात गेल्यावर अनेकांनी विचारलय,
“तुमचे किती लेखसंग्रह किंवा कवितासंग्रह प्रकाशित झालेयत.”
मी आपला त्या प्रश्नाने दबून हळूच उत्तरतो,
“नाही, एकही नाही….”
उत्तराबरोबर माझं स्थान त्यांच्या लगेच लक्षात येतं.
पुढे ते सांगतात, “गेल्याच महिन्यात माझा तिसरा किंवा पाचवा काव्य – कथा – लेख जो काही असेल तो संग्रह प्रसिद्ध झाला.”
मी या थोरा मोठ्यांपासून जरा सरकून बसतो बापडा. असो, पण मी लेखन करू लागलो, ते किती चांगलं वाईट उत्तम वाचनीय असतं हे वाचकच सांगू शकतात, पण मला पूर्ण भावलेलं असतं. पण लेखन करू लागल्यापासून, किंवा लेखनामुळे म्हणू, ज्येष्ठ निवेदक सुधीरजी गाडगीळ, ज्येष्ठ तबलावादक नानाजी मुळे, थोर व्यासंगी विदुषी ज्ञानदा उर्फ धनश्री लेले, अष्टपैलू अभिनेते प्रशांत दामले, राष्ट्रपतीपदक सन्मानित पोलीस उपायुक्त अजित देशमुख, वयाची नव्वदी ओलांडलेल्या प्रतिभावंत ज्ञानयोगीनी सुमनताई फडके, पुण्यातील तपस या oldage होमच्या चालक प्राजक्ता वढावकर, चतुरस्त्र अभिनेते समीर चौगुले, लोककलाकार नागेश मोरवेकर, ज्येष्ठ लेखक अभिनेते नारायणराव जाधव, प्राणीमित्र गणराज – डॉ अर्चना जैन, प्रकाशक नितीनजी हिरवे अशी व्यासंगी, प्रतिभावान, ज्ञानी, सेवाव्रती, कलावंत थोर मंडळी माझ्या परिचयाची झाली. यातल्या काहींची भेट घडली, तर काहींची खूप चांगली ओळख झाली, काहींची प्रत्यक्ष भेट न होताही खूप घनिष्ट मैत्री झाली. काहींशी ओळख व्हॉट्सॲपवर शब्दगप्पातून रंगली, तर काहींशी समोरासमोर झालेल्या मनसोक्त गप्पांमधून रंगली. प्रत्येकाचे विचार वेगळे, विचार करण्याची पद्धत वेगळी. खूप समृद्ध करून गेल्या या ओळखी.
या सगळ्यांबरोबर काही महिन्यांपूर्वी आणखी एका व्यक्तीची ओळख झाली. जीच्याबद्दल फारच थोडी माहिती झालेली होती. त्या व्यक्तीचं नाव रमेश भिडे. कोण हे रमेश भिडे? तर नटवर्य प्रभाकर पणशीकरांपासून रंगभूमीवरचे अनेक ज्येष्ठ कनिष्ठ अभिनेते, नामवंत दिग्दर्शक, नाट्यलेखक, कलाकार यांच्यासोबत वावरलेले, अनेक जुन्या नाटकांमधून विविध लहान मोठ्या व्यक्तिरेखा साकार केलेले, त्याहीपेक्षा डॉ.काशिनाथ घाणेकर या वादळामधलं वास्तव अनुभवलेले, मी आणि डॉ काशिनाथ घाणेकर या अप्रतिम पुस्तकाचे आणि एकपात्री रंगावृत्तीचे लेखक आणि सादरकर्ते रमेश भिडे.
त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक अगदी नुकतंच वाचनात आलं (अर्थात त्यांनीच पाठवून दिलं) त्यावर लिहावं असं मनापासून वाटलं, आणि ते मी प्रत्यक्षातही आणलं. असो, आता थोडसं मागे जातो, मागे म्हणजे चार पाच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर माझा एक लेख वाचून मला एक मेसेज आला, “तुमचा फोन नंबर कळवला तर आपण काही गोष्टी शेअर करू शकतो.” रमेशजींबद्दल थोडंफार वाचलं असल्याने, त्यांच्यासारख्या वयाने, कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला फोन करावा हे पटेना. म्हणून मी मेसेज केला,.
“मी करू का फोन ?”
परंतु त्याचं उत्तर येण्यापूर्वी त्यांचा फोन आलाच. Husky स्पर्श असलेला खणखणीत आवाज पलीकडून येत होता. सरळ मुद्यावर येत, अगदी मोकळेपणाने आपल्याला लेख आवडल्याचं त्यांनी सांगून टाकलं आणि त्यांचं मोकळं बोलणं मनाला स्पर्शून गेलं. आणि त्या दिवसापासून आमच्यामध्ये एक निनावी नातं फुललं. त्यानंतर माझा कोणताही लेख, कविता वाचली की रमेशजींचा फोन येणार हे ठरूनच गेलं. प्रतिक्रिया देणं हे हळुहळु निमित्त ठरू लागलं आणि त्या निमित्ताने आलेला फोन अर्धा पाऊण तास अनेक विषय, किस्से, अनुभव शेअर करून मगच बंद होऊ लागला. यामध्ये माझी भूमिका मनापासून ऐकणाऱ्या श्रोत्याची असते, कारण रमेशजींकडे आठवणी, अनुभव, किस्से, डॉ काशिनाथ घाणेकरांसोबत अनुभवलेले प्रसंग इतकच नव्हे तर जीवनविषयक सोप्या भाषेतलं तत्त्वज्ञान, अध्यात्म, आयुष्यात असलेल्या, येऊन गेलेल्या अनेक ज्येष्ठ कनिष्ठ व्यक्ती आप्त, सखे, सोयरे, सुहृद, रमेशजी उघड्या डोळ्यांनी वावरले ते नाट्यक्षेत्र, या सगळ्याचा प्रचंड साठा आहे. या प्रत्येक आठवणीची सुरवात,
“बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात बरं का
एक…….” अशा कथाकथन स्वरूपात होत असते. आणि आपण त्यांच्या त्या वास्तव आठवणी, किस्स्यांमध्ये रंगत जातो. बरं या आठवणींना सुसूत्रता अजिबात नसते. म्हणजे अमुक विषय आणि त्या संदर्भातले सगळे किस्से आठवणी असं काही नसतं. आमच्या बोलण्यात येणाऱ्या विषयानुरूप आठवणी, संदर्भ येत जातात आणि फोन घेतल्यावर एका विषयावर सुरू झालेला सुसंवाद प्रवास करत करत अनेक विषयांना स्पर्श करत कुठे येऊन पोहोचतो समजतही नाही. मी एखादा संदर्भ आठवण सांगितली, की त्याला आपल्या अनुभवांशी गुंफत रमेशजी बोलत जातात. दरवेळी फोन बंद करताना मात्र, मी अनेक गोष्टींनी समृद्ध झालेला असतो.
“यावरून आठवलेली एक गोष्ट सांगतो”
“तुम्ही जे म्हणालात त्या संदर्भातला एक अनुभव सांगतो”
“आता शेवटचा एक किस्सा सांगतो आणि आपण थांबुया.”
अशा वाक्यांनी सुरवात होणाऱ्या आठवणी थांबत नाहीत, त्या सुरूच रहातात, कारण रमेशजींचा चांगल्या वाईट स्मृतीनी भरलेला भाता रिकामा होत नाही, किंबहुना रिकामा होऊच शकत नाही इतका तो भरलेला आहे. लहानपणी माझे वडील मला अशा पद्धतीने गोष्टी सांगायचे, ती आठवण रमेशजीना ऐकताना जागी होते आणि मी सगळी शक्ती कानात साठवून सिद्ध होतो.
देवगड तालुक्यामधलं मुटाट हे रमेशजींच जन्मगाव. शालेय शिक्षण तिथेच झालं. कोकणी इरसालपणा सोबत स्वच्छ, निर्मळ, खणखणीत स्वभाव आणि बोलणं. हेकटपणा नाही पण आपल्या म्हणण्यावर, विचारांवर ठाम रहाण्याची वृत्ती. एखादी गोष्ट, उदा.लेखन, काव्य, कलाकृती आवडली भावली की, मनात काहीही राखून न ठेवता दाद देण्याचा स्वभाव, तरीही प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याचा त्यांचा एक व्ह्यू निश्चित असतो. चुकीचं वागणं, बोलणं, लिहिणं दिसलं ऐकलं, वाचलं की तितक्याच खणखणीतपणे पण सभ्य भाषेच्या मर्यादा न ओलांडता ती चूक दाखवून देणार. मुळात मन शुद्ध , बंधनं कर्मकांड याचं अवडंबर नाही पण ईश्र्वरावर नितांत श्रद्धा. चोरुन लपून काही करण्याची मानसिकताच नाही. आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला नेमकं जोखण्याची विलक्षण नजर आणि हातोटी. तितकीच वयोवृद्ध ज्ञानी व्यक्तींचा मनापासून आदर करण्याचा स्वभाव. बारीकसारीक गोष्टींनी गडबडून गोंधळून घाबरून जाणं नाही. एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो, आम्ही फोनवर बोलत असताना, त्यांचा नातू आजोबा आजोबा असं त्यांना सारखं बोलावत होता. अखेर, एक मिनिट हं, असं मला सांगून त्यांनी विचारलं, काय रे काय झालं ?
त्यावर तो म्हणाला,
आजोबा आजोबा बाबांच्या तोंडातून रक्त येतंय.
आता आमच्यासारखा माणूस गडबडून फोन ठेवून धावला असता, रमेशजीनी शांतपणे त्याला विचारलं,
बाबा दाढी करतोय का ?
आणि पुन्हा एकदा फोन हातात घेऊन बोलणं सुरू केलं. या माणसाने अनेक पावसाळे नुसते पाहिलेले नाहीत, तर त्यात स्वतः चिंब भिजून पाहिलंय पण स्वत:ला वाहून मात्र जाऊ दिलं नाही. रमेशजी, त्यांनी पाहिलेला अनुभवलेल्या नाट्यसृष्टीच्या सुवर्णकाळातील आठवणींमध्ये आजही मनापासून रमतात, कारण आजही तो त्यांच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा आहे. मी आणि डॉ काशिनाथ घाणेकर या त्यांच्या पुस्तकावर मी माझ्या परीने लिहिलेलं वाचून त्यांनी मनापासून आवडल्याचं सांगितलं, आणि त्या दिवशीच्या फोन गप्पा संपताना म्हणाले, “आपले संबंध असेच अखेरपर्यंत रहावे ही मनापासून इच्छा आहे.”
ही केव्हढी मोठी माणसं नियतीने माझ्या आयुष्यात आणली हे जाणवतं आणि मन भरून येतं. त्यांच्या पुस्तकावर मी लिहिलेलं गूगलवर पोस्ट करावं म्हणून दोन तीन वेळा सांगितलं, आणि त्यामागचा शुद्ध हेतूही सांगितला. म्हणाले,
पुढे काही वर्षांनी कुणाला या पुस्तकावर काही लिहावं असं वाटलं आणि त्यांनी गुगल वर शोध घेतला, तर तुमचं हे समीक्षण त्यांच्या उपयोगी पडू शकतं. दोन दिवसांपूर्वी रमेशजी बोलता बोलता म्हणाले, माझ्या मित्रांमध्ये सारस्वत बरेच आहेत, पुढे त्यांनी काही नावं घेतली. मी गंमतीने म्हटलं, आणि प्रसाद कुळकर्णी. त्यावर ते लगेच उद्गारले, तुमचं नाव काही वर्षांनी यादीत येईल. सध्या आपण बॅटिंग सुरू केलीय. किती टिकतो ते पुढे कळेलच. स्वच्छ लख्ख पारदर्शक रोखठोक विचार. दर दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही रमेशजींचा फोन येतो. मी काही लिहिलेलं वाचल्याचं सांगितलं जातं, थोडंफार त्यावर बोलणं होतं आणि मग पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींचा ओघ सुरू होतो आणि शेवट, “बाकी सगळं ठीक ना ?” या निरोपाच्या प्रश्नाने होतो. आपल्याला काही गोष्टींची सवय जडून जाते ना ? त्यात खंड पडला की मनापासून चुकचुकल्यासारखं होतं. तसा दिवस उगवल्यावर मी त्यांच्या व्हॉट्सॲप कॉलची वाट पहात असतो……
हे गेल्या जन्मीचे ऋणानुबंध असतात का ? कुणास ठाऊक. बघा ना, आपला एक लेख वाचून रमेश भिडे नावाच्या व्यक्तीचा फोन येतो. गप्पा गोष्टी होतात, त्यांचं पुस्तक वाचनात येतं, त्यावर न राहवून लिहिलं जातं. पुस्तकाची सुरेख बांधणी पाहून प्रकाशक नितीनजी हिरवे यांना आवडल्याचा माझा फोन जातो. बोलताना त्यांनीच प्रकाशित केलेलं नारायणराव जाधवांच पुस्तक पाठवतो म्हणून ते सांगतात, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नारायणरावांचा फोन येतो आणि त्यांच्याशी जवळजवळ एक तास गप्पा होतात. लेखात उल्लेखलेल्या सगळ्या मोठ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात अशाच अचानक आल्यायत. मी याचा उगम शोधत जातो आणि लिंक लागत जाते, जी खूप मागे म्हणजे माझ्या लहानपणात जाते.
मी लेखनच करत नसतो तर ???
लेखन का करू लागलो ? कुठून आलं हे लेखनाचं बीज ? तर वाचनातून. मग वाचन कुठे करायला मिळालं ?? तर आमच्याच घरात. हे वाचन संस्कार कुणी केले ?? तर माझ्या वडिलांनी. आणि अखेर या सगळ्याच्या मुळाशी मी पोहोचतो…जन्मदाते. त्यांनी वाचनसंस्कृती दिली नसती तर कदाचित आज माझ्या आयुष्यात या व्यक्ती आल्याच नसत्या……
आई वडिलांच्या फोटोकडे पाहून आनंदाश्रुनी डोळे भरून येतात, सगळी उत्तरं मिळून जातात, कोंडलेल्या प्रश्नांचा निचरा होतो आणि आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागतं……
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.
९७६९०८९४१२
Leave a Reply