भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर !
आमचा “पिंजरा” मराठीत तुफान गाजला. राम कदम, लागू-फुले जोडी आणि बेफाम लावण्या यामुळे चौकटी मोडल्या. पण त्याचे हिंदी व्हर्शन कोठेही चालले नाही. अपेक्षाभंग खूप झाला.
” उंबरठा ” स्मिता-जब्बार मुळे भावून गेला. बापट-भटांच्या रचना पंडीत हृदयनाथांनी आत्मा न बदलता घराघरात नेल्या. कोठल्या तरी क्षणी ही पालखी हिंदीत “सुबह ” नांवाने विसावली आणि उठलीच नाही. माध्यम तेच ठेवले पण भाषांतर/अनुवाद यांचे पाय डगमगले.
मात्र या वास्तू स्वतःच्या दिमाखात, आपापल्या भाषेत उजळून निघाल्या. ” तू तिथे मी” हा भावसंपन्न अनुभव जपता-जपता त्या संकल्पनेशी मिळता-जुळता पूर्ण हिंदी अवतार “बागबान” तरून गेला. त्यामध्ये अमिताभ/हेमा हे ( आणि थोडा सलमान) ग्लॅमर असल्याने अधिक दूरवर पोहोचलं पण हा राष्ट्रीय / प्रादेशिक एवढाच मुद्दा आहे. दक्षिणेकडील “रिमेक” हिंदीत चालतात, बंगाली/हिंदी सुपरहिट होतात पण मराठी/हिंदी या भाषाभगिनी जुळवून घेताना आढळत नाही. दोघींच्या चवी वेगळाल्या !
उदा. आमचा “नारबाची वाडी” ज्याला पूर्ण कोकणी स्वाद आहे, तो हिंदीत कसा उतरेल ? आणि “एक होता विदूषक ” तरी?
हिंदीतील ” मुगले-आझम ” आणि ” शोले ” मराठी वेशात कसे दिसतील?
माझा एक मित्र भाषांतर/ अनुवाद हे शब्द धुरकट वाटतात असे मानतो आणि म्हणून उंबरा ओलांडताना अपरिचित शब्द सुचवतो- ” हृदयांतर ”
जोपर्यंत हे हृदयांतर होत नाही तोवर या भाषाभगिनी आपापल्या माहेरी निवांत असोत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply