अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. मोहिनी वर्दे यांनी लिहिलेला हा लेख
रस्त्यावर पडलेला रूमाल त्या दिवशी मी सहज उचलला चार बाजूंनी लेस विणलेली कोपऱ्यात दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून;… एक आवंढा गिळला. कुठे गेले ते दिवस? तो रोमान्स? स्वप्नांच्या थरकत्या पुलावरुन पैलतीर गाठण्याचा दिवस कोणाकोणाच्या आयुष्यात येतो? त्यांच्या? माझ्या?
तसं पाहिलं तर जीवनात काही मिळवलं नाही असं नाही. घर संसार तर आहेच. मुलं बाळं, नातवंड! लेखन केलं थोडं फार नाव मिळवलं कधी स्फूर्तीसाठी अडून बसले, तर कधी सहज सुचत गेलं. तेव्हा वाटायचं हे आपण लिहीत नाही कोणीतरी आपल्या हातून लिहून घेतंय.
साळुंकी ती कैसी बोले मंजुळवाणी।
बोलविता धनी वेगळाची ।।
पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हां श्री. वसंत शिरवाडकर (कुसुमाग्रज यांचे बंधू) यांनी संपादकांना लिहिलेलं एक पत्र संपादकांनी मला वाचायला दिलं.
“स्त्रियांनी लिहिलेले कथासंग्रह परीक्षणासाठी पाठवू नयेत असं मी आपल्याला लिहिलं होतं. पण ही नवी लेखिका कथेच्या माध्यमातून जीवनाची जाणीव वाढवू पाहात आहे. संग्रह वाचनीय आहे.” अभिप्राय वाचला आणि पोस्टकार्ड संपादकांकडून मागून घेतलं. जपून ठेवलं. आपोआप वाट निश्चित झाली. लेख, परीक्षण लिहिता लिहिता कथा सुचू लागल्या. इकडे कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका म्हणून थेट बी.ए. आणि नंतर पी.एच्.डी केल्यानंतर एम.ए. च्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. मान मिळाला. खूप वाचन केले. व्यवसायाकरिता ते आवश्यक होते.
मी लहानपणापासून नाटक- सिनेमा खूप पाहिले. घरात आईवडिलांना आवड होती. पूर्वी गिरगावात केळेवाडी येथे साहित्य संघ मंदिरातर्फे वर्षातून एकदा नाट्यमहोत्सव होत असे. त्यात आठदहा नवी जुनी नाटकं सादर केली जात. वडील त्या काळातील संगीत नाटकातील अनेक अभिनेत्यांना ओळखत असत. त्या वेळी दहा बारा वर्षांची असताना रंगमंचाच्या मागच्या बाजूला नटांना भेटण्यासाठी मी देखील वडिलांबरोबर जात असे. रंगमंचावरचा कृष्ण मागच्या बाजूला फुर् फुर् चहा पितांना पाहिलं तेव्हा धक्काच बसला. आदल्या दिवशी पाहिलेला एखादा नट मंचावर धोतर नेसून बंडी घालून वावरताना पाहिलेला तो एकदम शर्ट-पँटमध्ये सिगरेट ओढताना दिसला, नऊवारी फाटक्या लुगड्यातली ‘एकच प्याला’ मधली सिंधू बॉब केलेल्या केसात बघितल्यावर माझे डोळे खोबणीतून बाहेर पडतात की काय असं वाटायला लागलं. मनात यायचं की हे अॅक्टर लोक एका जन्मात मरणाविना किती जन्म भोगतात? मजाच आहे.
मी कथा लिहीत राहिले. माझ्या पहिल्याच संग्रहातील ‘देवकी’ ही क्रांतिकारी म्हणा किंवा अपारंपारिक कथा आहे. आपले प्रत्येक बाळ कंसाच्या क्रूर सूडभावनेपोटी मारले जाते आहे हे पाहून देवकीच्या मनात विचारांचे वादळ उठते. आपले बाळ वाचवणे आपल्या हातात नाही. पण होऊच दिले नाही तर? ती वसुदेवाच्या जवळ जाण्यास घाबरते. अशीच एक त्या काळातील म्हणजे १९७६ मधल्या संग्रहातील कथा आहे. आमच्या लांबच्या नात्यातील सीतामावशी आणि त्यांचा भाऊ अविवाहित. खूप वृद्ध झाले. भाऊ वारला. तेव्हा मी त्यांच्यावर कथा लिहिली.
सीतामावशींनी स्वत: अंत्यविधी केले, पिंडदान केले. मग स्त्रियांनी अंत्यसंस्कार करायचे नाहीत म्हणून कुणातरी लांबच्या नात्यातल्या पुरुषाला बोलवायचे, किंवा परक्याकडून अंत्यविधी करवून घ्यायचे हे त्यांच्यासारख्या परंपरा जपणाऱ्या, कर्मकांड मानणाऱ्या सीतामावशींना का वाटले असावे? माणसाच्या मनाचा ठाव लागत नाही. प्रत्यक्षात सीतामावशींनी काय केले हे महत्त्वाचे नाही. पण माझी कथा अशी जन्माला आली. एका प्रसिद्ध कंथाकाराने मला कथेवर नाट्य उत्तम रीतीने व्यक्त करता येते आणि माझे संवाद सहज प्रगट होतात असे मला सांगितले. एकंदरीत मी नाटक लिहिले नसले तरी
नाट्यात्मक संवाद चांगले जमत होते. कुठेतरी माझ्या नकळत नाटक माझ्यात घर करून होते.
नाटक चित्रपट यांची समीक्षा करणे हा छंद लहानपणापासून होता. त्या वेळी मी काही पाक्षिकातून नियमित लिहीत असे. थोडी प्रगल्भता, आल्यावर समीक्षेचे दोर आवळून, साहित्य आणि नाटक, किंवा ‘प्रयोगशील कला, त्यातील त्रुटी आणि संभाव्य फायदे यावरील व्याख्याने कॉलेजविश्वात, इतर कॉलेजात जाऊन देत असे. जसे आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम (सांस्कृतिक) आयोजित करावे लागत तसे इतर कॉलेजमध्ये त्यांची आवश्यकता होती. एकूण असे साटेलोटे असायचे. तरीही नाटकाची साहित्यिक मूल्यांच्या आधारे चर्चा करीत असताना नटाच्या अभिनयामुळे आपण अधिक प्रभावित होतोअसे वाटायचे.
नाटक, चित्रपटांच्या निमित्ताने, अभिनेत्यांना भिन्न भिन्न भूमिकांमध्ये पाहाताना एक विलक्षण अननुभूत आनंद मला मिळतो. आपल्या मनाचा कल असेल तसे नाटक सिनेमा पाहातांना हव्या त्या भूमिकेत स्वत:ला कल्पून प्रसंगात (सिचुएशन) मध्ये हवे तसे बदल करून स्वप्नरंजनाचे सुख मी सतत घेत असते. नाटक संपले प्रेक्षागृहातून बाहेर जायची वेळ आली तरी मी नायक किंवा नायिकेच्या भूमिकेमध्ये गुंतलेली असते.
.
लहानपणापासून पोहायला जाण्याची आम्हा दोघी बहिणींना सवय होती. एकदा असा प्रसंग आला की स्वतःमधल्या देवत्त्वाची नकळत प्रचीती आली. पूर्वी पुणे, नाशिक, नागपूर या शहरांची आजच्यासारखी भरमसाठ वाढ झाली नव्हती. नाशिक शहराबाहेर गंगापूर धरणाच्या परिसरात गोदावरी नदीला एके ठिकाणी रुंद धबधबा निर्माण झाला होता. आज हा परिसर पूर्ण बदलेला आहे. आमच्या ओळखीच्या एका श्रीमंत बाईंनी आम्हाला दोघींना सोबतीला नेले. त्यांना पोहोण्याची हौस होती. त्या आणि त्यांचा दोघी मैत्रिणी नदीत पोहायला उतरल्या. शांती नावाची त्यांची न पोहता येणारी मैत्रीण काठावर बसली. नदीला पाणी कमी होते. त्यामुळे काठावरचे खडक उघडे पडले होते. जणू काळ्या पाठीचे अजस्त्र प्राणी काठावर तणावून निद्राधीन झाले होते. मी शांतीला सोबत करीत होते. शांती मला पुन्हा पुन्हा सांगत होती. “तू जा. तुला पोहोता येतंय तर मजा कर.”
मी देखील बसून बसून कंटाळले. पाण्यात उतरले, मुख्य सांगायचं म्हणजे आम्ही सर्व साडी नेसून पोहत होतो. स्विमिंग सूट असा उघड्यावर घालण्याची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हते. पाण्याचा थंडगार अमृतस्पर्श दुपारच्या टळटळीत उन्हात सर्वांगाला सुखावून गेला. इतक्यात “भाभी ! भाभी ! बचावो ऽऽ!”
अटीतटीचे काकुळतीचे शब्द कानावर पडले. शांती प्रपाताखाली नदीच्या प्रवाहाच्या मध्यावर मध्येच तिचे डोके पृष्ठभागावर दिसे आणि पुन्हा गायब होई. मी प्राणपणाने तिच्यापर्यंत जाऊन कशी पोहोचले, तिला बळजबरीने माझी कंबर घट्ट पकडायला कशी लावली तिचा भार अंगावर झेलून किनाऱ्याला कशी आले. काही उमगले नाही. होती ती
केवळ ईशकृपा. हातून पुण्य घडायचे होते किंवा पूर्व संचिताने पुण्य घडवून आणले होते.
असे कुठेतरी खोल खोल रूतलेले जाणिवेतून निसटलेले नेणिवेत मंद हेलकावे खाणारे. रंग उधळणारे, काळोख पसरवणारे, आपल्याशी झगडणारे, जवळच्या माणसांच्या कायमच्या विरहाने पोळणारे, विजयोन्मादाने वाऱ्यावर फडफडणारे, खरेपणाचे, खोटेपणाचे, समुद्राची लाट वाळूच्या किनाऱ्यावर फेसाची नक्षी कोरून ओसरते, नव्याने सरसावते नवी नक्षी कोरते. आठवणी जाग्या होतात. तेव्हा ते खरे वर्तमान असते.
मी कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यात ‘टीझर’ ही एका स्टड फार्मवरच्या घोड्यावरची वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी लिहिली पण दुर्दैवाने समीक्षकांनी माझी घोड्याविषयच्या अभ्यासपूर्ण कादंबरीला लेखणीच्या एका फटकाऱ्याने कर्जाऊ माल असल्याचे जाहीर केले. ही कादंबरी मूळ इंग्रजीवरून घेतली असावी असा आरोप केला. चिखलफेक करणं सोपं असतं. नवनिर्मिती ह्या जिवाला लागलेल्या कळा असतात. त्यांचे व्रण खोलवर जातात.
मोटर चालवायला शिकणे हा मी माझा एक पराक्रम मानते माझ्या नवऱ्याने मला मोटार चालवण्याची शिकवणी देण्याचे ठरवले. माझे जरा काही चुकले की आरडाओरड करीत. ब्रेक दाब, ब्रेक दाब म्हणता म्हणता स्वतःच व्हील हातात घ्यायचे, मी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली की यांचा संताप, झाडून टाकायच्या झुरळाकडे बघणारी नजर माझ्याकडे लागायची. मग मी सरलाबेन लोहाणा या प्रेमळ शिक्षिकेकडून ड्राइव्हिंगचे धडे घेतले. तिने मस्त शिकवलं आणि मी मस्त शिकले. परमनंट ड्राइव्हिंग लायसन्स मिळवलं. पण हे गाडीत असले की माझ्या चुका व्हायच्या.
“कोणी मूर्खाने हिला ड्राइव्हिंग शिकायला सांगितलंय? ” असं म्हटलं की मी मनात म्हणायची ‘तुम्हीच’ !
माझे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या एका प्रकाशकांना मी नेहमी स्वहस्ते केलेले लाडू, चिवडा, भजी वगैरे देत असे. त्यातून माझे स्वयंपाकावरचे ‘स्वादिष्ट कृती’ पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या वेळी माझ्या मैत्रिणीची नुकतीच लग्न झालेली मुलगी अमेरिकेला गेली होती तिला त्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. ह्या गोष्टी १९७७/७८ सालच्या.
आजच्यासारखे त्या वेळी खाजगी जीवन सार्वत्रिक झाले नव्हते. आपल्या स्वतःबद्दल कुटुंबाबद्दल सर्व सगळ्याना कळावे इतके खाजगी आयुष्य स्वस्त झाले नव्हते. ‘फेसबुक’ चा आज इतका प्रचंड प्रसार झाला आहे की ‘फेसबुक’ म्हणजे आई, बाप, बंधू, भगिनी सगळे आप्त. जे फेसबुकवर नाहीत ते मागासलेले. इतके सगळे खूप काही, कधी महत्त्वाचे कधी निरुपयोगी कधी वायफळ काही बाही केले. वाचन, लेखन, कला, साहित्य हा एक जीवनाच्या उभारीचा स्तंभ. त्यावर आयुष्य तोलून धरले. चरित्र लेखन हा माझा पिंड असावा. “डॉ. रखमाबाई एक आर्त’ या चरित्राचा बोलबाला झाला. पारितोषिके मिळाली. ‘टीझर’ लाही पारितोषिक मिळाले.’बालगंधर्व’ या अभिजात नटसम्राटाचे चरित्र लिहिले. नाटके वाचली, पाहिली, शिकवली पण प्रत्यक्ष रंगभूमीवरचे नाटक जगून पाहायचे राहून गेले. नाटक दुरून भोगले पण नाटकात भूमिका करण्याचा योग आला नाही. कशी दिसले असते मी रंगमंचावर?
शाळेत असतानाची शाळेच्या रंगमंचावरची एकच आठवण. त्या काळात ‘टॅब्लो’ बसवत असू. मी मुमताज महाल झाले होते. आईची शॉकिंग पिंक रंगाची बहारदार चंदेरी नऊवारी साडी नेसलेली मुमताज आणि भाऊ पांढरा लेंगा झब्बा घातलेला शहाजहान. मी त्याच्या मांडीवर डोके टेकून पडले होते.
असे माझे पहिले आणि शेवटचे रंगमंचावरचे अस्तित्व. बेछूट! बहारदार ! बेदरकार !
अखेरीस नाटकात काम करण्याचे राहूनच गेले.
‘हुकली ती संधी हुकली!’
-डॉ. मोहिनी वर्दे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply