नवीन लेखन...

हुक्का पार्लर

नाम्या शेट बाहेरून लॉक लावलेल्या खोलीच्या दरवाजाला असलेल्या ग्रील पलीकडे बोंबलणाऱ्या स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाकडे असहायपणे बघत होता. त्याच्याकडे बघता बघता त्याला हुंदका अनावर झाला. सायकियाट्रिस्ट कडे त्याच्या मुलाची ट्रीटमेंट चालू होती.

चार वर्षांपूर्वी नाम्या शेट ला गावात फक्त नाम्या बोलत असत. जेव्हा गावातल्या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार करताना एका मोठ्या बिल्डर कडून कमिशन च्या ऐवजी इनोव्हा गाडी मिळाली तेव्हापासून नाम्याचा नाम्या शेट झाला होता. नाम्या सुरवातीपासूनच रिक्षा चालवायचा, स्टेशन ते गाव अशी त्याची रिक्षा चालायची. रिक्षात बसणाऱ्या एका पॅसेंजरशी त्याची ओळख झाली. तो पॅसेंजर एका बिल्डरकडे वकील म्हणून काम करत होता. त्याने सहजच नाम्याला विचारले गावात कोणाची जमीन विकायची आहे का, नाम्याने सांगितले असेल कोणाची तर नक्कीच सांगेन. नाम्याच्या चुलत भावाला त्याच्या मुलाचे लग्न करायचे होते. पण चुलत्याचा मुलगा त्याच्या बापाच्या मागे लागला की पोरगी बघायला जायचं तर स्वतःच्या फोर व्हिलर मध्ये आणि लग्न पण अशा थाटात करायचे की गाववाले बोलले पाहिजेत असं लग्न कधी झाले नव्हते म्हणून. नाम्याचा चुलता चौथी पास तर त्याचा पोरगा बारावी पास. चुलत्याला वाटलं पोराची हौस आहे आणि दोन एकरातील एक एकर विकली तर काय फरक पडणार आहे, नाहीतरी त्यात काही पिकत सुद्धा नाही, आपण तरी कधी स्वतःच्या गाडीतून फिरणार. त्याने एक एकर शेती विकायला काढली. गावात त्यावेळेला एकरी वीस लाख रुपये भाव सुरु होता, रस्ता नसल्याने नाम्याच्या चुलत्याची जागा घ्यायला कोणी तयार होतं नव्हते.

रिक्षात वकील बसल्यावर नाम्याने त्याला चुलत्याच्या जमिनीबद्दल विचारले, वकिलाने त्याला जमिनीचे सातबारा घेऊन बिल्डरच्या ऑफिसला बोलावले. गावात वीस लाख भाव सुरु असताना बिल्डरने नाम्याला सांगितले की मी बावीस लाख देईन पण तुझ्या चुलत्याला एक एकर ऐवजी त्याच्याकडील सगळीच्या सगळी दोन एकर विकायला सांग. नाम्या बाहेर आल्यावर वकिलाने त्याला सांगितले की गावात वीस लाख सुरु आहे बिल्डर बावीस बोलतोय पण चुलत्याला एकवीसच सांग तुला दोन एकर मागे दोन लाख मिळतील त्याला सगळी जमीन विकण्यासाठी तयार केल्याबद्दल. बिल्डर तू सांगशील तेवढी रक्कम तुझ्या चुलत्याला देईल आणि उरलेली तुला देईल या कानाचे त्या कानाला समजणार नाही.

नाम्याला सुरवातीला हे काही पटले नाही की स्वतःच्या चुलत भावाची जमीन विकण्यासाठी कमिशन घ्यावे पण नंतर त्याने स्वतःची समजूत घातली की भाव वीस लाख सुरु आहे आणि आपल्या ओळखीने त्याला एकवीस मिळतायत, बावीस सांगून तो तर आपल्याला लाखभर रुपये देणार नाही मग आपणच परस्पर एक लाख घेतले तर काय बिघडले.

चुलत्याने सुरवातीला दोन एकर एकदम विकायला आढेवेढे घेतले पण नंतर नाम्याने त्याला सांगितले की तुला दोन एकराचे पैसे मिळतील त्यात तू एक एकर आणखीन दुसऱ्या कोणाची विकत घे. नाम्याला पहिल्याच व्यवहारात दोन लाखाचे घसघशीत कमिशन मिळाले.

नाम्याच्या चुलत्याने दोन एकराचे बेचाळीस लाख मिळाल्यावर दहा लाखाची फोर व्हिलर घेतली, दहा लाखात पोराचे धुमधडाक्यात लग्न लावले. उरलेल्या पैशात दुसरी जागा घेतली. गावात जमीन विकून फोर व्हिलर आणि धुमधडाक्यात लागलेले लग्न बघून इतर लोकांना पण जमिनी विकण्याचा आणि त्यातून मौज मजा करायचा मोह झाला, नाम्याने गावातल्या चालू भावापेक्षा जास्त रेट मिळवून दिला म्हणून लोकं स्वतःच त्याच्याकडे जमिनींचे सातबारे घेऊन जाऊ लागले. हळू हळू करता करता नाम्याने जवळपास दहा एकर जमिनींचे व्यवहार करून दिले. गावातली लोकं पण लग्न, फोर व्हिलर आणि बंगला बांधण्याच्या चढाओढीत नाम्याकडे जाऊ लागली. नाम्याला बिल्डर ने पुढल्या जमिनीच्या कमिशन बदल्यात इनोव्हा घेऊन दिली, नाम्याने फक्त गावातील जमिनींचे सातबारे क्लियर करून बिल्डर कडे नेऊन त्यांचा व्यवहार करायचा बस.

नाम्याचा आता नाम्या शेट झाला होता, एकदा बिल्डर नाम्याला घेऊन डान्स बार मध्ये गेला, नाम्याने तिथले वातावरण बघितलं आणि दुसऱ्याच दिवशी गावातल्या मित्रांना घेऊन नोटांचे बंडल बार बालांवर उधळून आला. बियर पिणारा नाम्या आता इंग्लिश व्हिस्की आणि रम शिवाय दुसरं काही पीत नव्हता. घरात त्याच्या बायकोला फारशी किंमत नसल्याने ती नशिबाला दोष देत घरातली काम निमूटपणे करायची. नाम्याचा पोरगा अठरा वर्षांचा झाला होता, बापाचे किस्से त्याच्या कानावर येत असत. नाम्याने त्याला इनोव्हा घेऊन फिरायला पाठवत असे, तो मागेल तेवढे पैसे देत असे. मित्रांना अभिमानाने सांगत असे मी याच्या एवढा असताना रिक्षा चालवून धंदा करून पोट भरायला लागलो. आता यांचे दिवस आलेत करू दे मजा. नाम्याच्या पोराचे नाव बंटी. बंटी निघाला की इनोव्हा मध्ये फिरणारी चार उनाड पोरं सोबतच असायची. आज या ढाब्यावर तर उद्या त्या ढाब्यावर.

एका ढाब्यावर बंटीला हुक्का ओढणारे पोरं पोरी दिसल्या. बंटी आणि त्यांच्या मित्रांनी पण हुक्का मागवला, पहिलीच वेळ आणि इनोव्हा घेऊन आलेले गिऱ्हाईक बघून ढाबेवाल्याने त्याचा डाव साधला. बंटीला आणि मित्रांना त्याने पहिली वेळ म्हणून कॉम्प्लिमेंटरी फ्लेवर दिले. त्याच्याने असं झाले की पुढल्या वेळी दुसऱ्या ढाब्याऐवजी बंटी पुन्हा त्याच ढाब्यावर गेला. हळू हळू बंटीला हुक्क्यच्या फ्लेवर मधून ड्रग्स द्यायला सुरवात झाली. बंटीने नंतर इतर ठिकाणी हुक्का ट्राय केला पण ढाब्यासारखी मजा कुठेच येत नव्हती. हळू हळू बंटीचे येणे जाणे वाढायला लागल्यावर ढाबे वाल्याने बंटीला काही फ्लेवर्स अव्हेलेबल नाहीत किंवा भाव वाढलाय सांगून पैसे उकळायला सुरुवात केली.

बंटी हुक्का फ्लेवर मध्ये मिक्स केलेल्या ड्रग्स च्या एवढा आहारी जाऊ लागला की त्याला नशेशिवाय एक दिवस सुद्धा चैन पडणे मुश्किल होऊ लागले. ड्रग्सच्या नशेत गाडी चालवत असताना एका पोलीस गाडीला टक्कर देता देता बंटी वाचला पण पोलिसांनी गाडी साईडला घेऊन तो नशेत आहे समजल्यावर नाम्याला पोलीस स्टेशन ला बोलावून घेतले. पोलिसांनी बंटीला दोन लगावताच त्याने सगळं सांगितलं, पोलिसांनी ढाब्यावर रेड टाकली. इकडे नाम्याने बंटीला बडव बडव बडवला. कधीही न बोलणारी नाम्याची बायको मध्ये पडली आणि बोलली पोराला मारायच्या पहिले आरशा समोर जाऊन स्वतःला विचारा चूक कोणाची आहे मग स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्याल.

बंटीने दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पासून घरात गोंधळ घालायला सुरुवात केली कारण त्याला नशा करायला जाणे जमणार नव्हते. नाम्याचे लक्ष नाही बघून त्याने घराबाहेर पळायचा प्रयत्न केला पण नाम्याच्या चुलत्याने त्याला पकडून आणले. नाम्याला तर जेवण सुद्धा जात नव्हते. नाम्याने डान्स बार आणि पोराने ड्रग्स मध्ये जमतील तसे पैसे उडवले होते. नाम्या नुसता नावाला नाम्या शेट राहिला होता. बंटी ड्रग्स ऍडिक्ट आहे समजल्यावर गावातल्या पोरांना त्यांच्या आईबापाने बंटी जवळ जाऊ नये म्हणून दम दिला. नशा नाही, मित्र नाहीत म्हणून बंटी अजून वेडापिसा झाला. सुरवातीला त्याचा हेवा करणारे आता दलाल म्हणून दूषणं देऊ लागले होते. बाप शेर तर पोरगा सव्वा शेर निघाला म्हणून गावात खिल्ली उडवली जाऊ लागली.

ड्रग्स मिळतं नसल्याने नशेअभावी बंटी व्हायलंट होऊ लागला, नाम्याला आणि त्याच्या आईला पण मारझोड करू लागला. नाम्याला कोणीतरी सांगितले की बंटीला सायकियाट्रिस्ट कडे दाखव तिथे त्याच्यावर उपचार होतील.

त्याप्रमाणे नाम्या त्याला सायकियाट्रिस्टकडे घेऊन गेला. तिथल्या हॉस्पिटल मध्ये असलेल्या खोल्यात कोंडलेले मनोरुग्ण बघून नाम्याचे मन हेलावलं. हॉस्पिटल मध्ये जीवाची घालमेल झालेले आणि चेहऱ्यावरची रया गेलेले पेशंट चे आईबाप किंवा बायका मुलं बघून नाम्या हादरला.

चार दिवसानी जेव्हा त्याचा पोरगा सुद्धा बंद दरवाजा आडून, मला इथून बाहेर काढा, नाहीतर कोणाला सोडणार नाही. ज्याने मला कोंडून ठेवलाय त्याचा खून करीन असं ओरडत होता तेव्हा नाम्याला हुंदका अनावर झाला.

नेमके पाठीमागून डॉक्टर आले आणि त्यांनी नाम्याच्या पाठीवर थोपटून सांगितले, काळजी करू नका काही महिन्यात सर्व काही ठीक होईल. गोळ्या औषधांच्या प्रभावामुळे तुमचा मुलगा असा बोलतोय हळूहळू तो पूर्ववत होईल.नाम्याच्या मनात एकच भिती होती की पूर्ववत झाला तरी तो पुन्हा ड्रग्स कशावरून घेणार नाही.

गावातील बरेच लोकं नाम्याला शिव्या द्यायला लागले होते त्याचा तिरस्कार करत होते. चार वर्षांपूर्वी वीस लाख आणि वाढत वाढत जाऊन दोन वर्षांपूर्वी नाम्याने ज्या बिल्डर ला तीस लाख एकरी प्रमाणे एकूण पन्नास एकर जमिनी मिळवून दिल्या होत्या. त्याच बिल्डरने सगळी पन्नास एकर जमीन एका मोठ्या कंपनीला दोन वर्षात पन्नास लाख प्रति एकरने विकली कारण त्या जमिनीच्या बाजूने चार पदरी रस्त्याचे काम सुरु झाले होते.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..