सगळ्याच “अ ” आणि “अ +” कलावंतांना सदैव त्यांच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार मिळतंच असं नाही. बरेचदा एका चौकटीत आपण त्यांना बसविलं किंवा शिक्के मारले की ते ” पापी पेटके लिए ” क आणि ड दर्जाचे काहीतरी करत असतात आणि गुजारा करीत असतात. त्यांच्या “आतली ” गुदमर पाहायची असेल तर काही अलौकीक क्षण पांढऱ्या पडद्यावर/रंगभूमीवर यावे लागतात.
शन्ना आणि वपु यांच्या कथांमधील दमदार बीजांना आमच्या चित्रसृष्टीने कधीच न्याय दिला नाही. शन्नांच्या प्रसन्न आणि ताज्या लेखणीने दिलेले दोन चित्रपट मला दिसले- ” आनंदाचं झाड आणि एक उनाड दिवस ! ” ( वपुंचा एकच – ” मुंबईचा जावई “)
“उनाड ” मध्ये आम्ही वाया घालविलेला ” अशोक सराफ ” , क्षमतेपेक्षा गुंजभरापेक्षा बरंच कमी मिळालेल्या फैयाझ समोर बसतो- शुभा जोशींच्या स्वरातले गाणे चेहेऱ्यावर जिवंत करीत –
” हूर हूर असते तीच उरी,
दिवस बरा की रात्र बरी ! ”
सौमित्रच्या शब्दांना सलील कुलकर्णीने अधिक न्याय दिलाय, की शुभा जोशींनी, की फैयाझ ने की अशोकने, माझा आजवर फैसला होत नाहीए.
” उनाड” मध्ये विस्मृतीच्या गर्तेत गेलेली ( तशी प्रत्यक्षातही) चंद्रिका ( फैयाझ ) तिचंच एक गाजलेलं गाणं अनपेक्षित उनाडपणे दिवस घालविणाऱ्या अशोक समोर आत्मीयतेने सादर करते. सगळ्या चित्रपटाचा पोत बदलतो- नवनवे अर्थ सांगत ! भारावलेला अशोक तिला बिदागी विचारतो -एकट्यासमोर सादर केलेल्या मैफिलीची ! डोळ्यांत पाणी आणून ती एवढंच म्हणते- ” अधून-मधून ऐकायला येत जा.”
सगळ्याच अस्ताला जाणाऱ्या कलावंतांचं हेच मागणं असत- ” दुआँमें याद रखना “!
अशोक सराफ ही चीज जाणवली फक्त – चौकट राजा / वज़ीर /आत्मविश्वास /हमीदाबाईची कोठी सारख्या नेमक्या ठिकाणी अन्यथा विनोदवीराचा शिक्का जिंदाबाद !
फैयाझ पहिल्यांदा भावली “कट्यार ” मधील झरीना म्हणून- खां साहेबांची सुरेल कन्या या भूमिकेत, आणि दुसऱ्यांदा भिडून गेली कुसुमाग्रजांच्या ” वीज म्हणाली धरतीला ” मधील जुलेखा म्हणून ! दोन्ही गायिकेच्या भूमिका, त्यामुळे अभिनेत्री की शास्त्रीय गायिका यात कायम गल्लत होत गेली माझी !
पण ” हूरहूर ” मध्ये दोघेही एकाच सामर्थ्याने समोरासमोर आले आणि क्षण चिरंजीव करून गेले.
सतत नजरेसमोर राहावे म्हणून ते काय वाटेल ते ” फ” दर्जाचे काम स्वीकारत असतात. ही धडपड कधी कधी केविलवाणी वाटते तर कधी अपरिहार्य वाटते.
” नूतन ” ला मावळतीच्या रंगांमध्ये (“मेरी जंग “, ” मैं तुलसी — “, ” कर्मा “) बघणं असंच दुःखद होतं. नसीर /परेश/ओम पुरी/ अमिताभ/अनुपम यांनाही आपण अगणितवेळा वाया घालवलं आहे. मराठीत विक्रम/लागू सारेच या वाटेवरचे ! त्यांनी कितीही प्राण फुंकले तरी त्या भूमिका जिवंत होत नसत.
” विक्रम ” ला बघायचे तर त्याची निजखूण बनलेल्या “बॅरिस्टर ” मध्ये, मानसी मागीकरांना ” गोट्या किंवा पुढचं पाऊल ” मध्ये आणि दिलीप कुमारला ” मशाल ” मधल्या एका प्रसंगामध्ये ! ही यादी कितीही लांबविता येईल.
मैफिलीचा हा किनारा
दो घडीचा वायदा !
कारवा दारात आला
अलविदा हो अलविदा !!
कधीकाळी ऐकलेली ही आर्त गज़ल जात्या वर्षाला अलविदा करण्यापूर्वी, अशा अस्तंगत कलावंतांना – त्यांना आपण अजून विसरलेलो नाहीए याची ” बिदागी ” म्हणून देऊ या.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
aapale lekh khupach chhan asatat dhanyawad
Dhanyavad!
Please Mobile NO
9850826990