एक होता कावळा. कोळसा जसा काळा काळा,
नजर त्याची चोहींकडे, मान करी इकडे तिकडे.
चातुर्यकथा एकदा काय झाले, त्याला लागली खूप भूक. त्याने खाल्लेही खूप खूप. पण पाणी नव्हते प्यायला. शोधून शोधून दमला. इतक्यांत त्याला दिसली घागर. गेला तिकडे भरभर. उडून बसला घागरीवर. पाणी होते तळाशी. त्याची चोच पोचावी कशी? पाणी चोचीत येईना, काय करावे कळेना.
कावळा विचार करत राहिला. पाणी तर प्यायला हवे. मग उपाय शोधायलाच हवा. तो उपाय शोधू लागला. उपाय काही सुचला नाही; पण तो निराश झाला नाही. कावळा उपाय शोधीत राहिला. विचार करत बसून राहिला. एकच प्रश्न त्याला पडला काय करावे बरे आता? बघू लागला इकडे तिकडे. त्याला दिसले काही खडे. मग एक उपाय सुचला. पंख पसरून उडाला. त्याने एक खडा आणला, पट्कन तो घागरीत टाकला; डुबकन वाजले.
काय गंमत! पाणी वर उडाले. मग – खड्यांमागून खडे आणले. भराभर घागरीत टाकले. पाणी वर चढत गेले. चोचीपर्यंत पाणी आले. त्याला खूप खूप आनंद झाला. तो पोटभर पाणी प्याला. हुशारीचा लाभ झाला.
[कथन: नारायण सुर्वे, बालभारती, पु. २ रे, १९७९, महाराष्ट्र, पृ. ६-७]
Leave a Reply