एक महापंडित होते. सर्व शास्त्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या होत्या. मात्र महापंडित असूनही राजा आपल्याला ‘राजगुरु’ करीत नाही, ही त्याची खंत होती.
एकदा ते राजाकडे गेले व आपणास “राजगुरू” करावे म्हणून साकडे घातले. राजा म्हणाला. माझ्या तीन प्रश्रांची उत्तरे दिलीत तर मी तुम्हाला राजगुरू करीन. उत्तरे पटली नाहीत तर मात्र मृत्युदंडाची शिक्षा देईन.
परमेश्वर कोठे असतो? तो कोणत्या दिशेकडे पाहतो आणि तो नेमके काय काम करतो? हे राजाचे तीन प्रश्र होते.
खरे तर या प्रश्रांची उत्तरे पंडिताला माहीत होती. मात्र, जर राजाला ती पटली नाहीत तर आपला बळी जाईल या कल्पनेनेच ते धास्तावले. त्यांनी उत्तरासाठी तीन दिवसाची मुदत मागितली. महापंडित घरी आले
त्यांचा नोकर खूपच हुशार होता. दरबारातली घटना कळली तेव्हा तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. तीन दिवसांनंतर मीच राजाकडे जाईन व बळी गेला तर माझाच जाईल. तीन दिवसांनंतर तो नोकर राजाकडे गेला व त्याने महापंडितांऐवजी मीच तुमच्या प्रश्रांची उत्तरे देईन व ती पटली नाहीत तर मृत्युदंडही स्वीकारीन, असे म्हणाला.
“परमेश्वर कोठे राहतो?” या पहिल्या प्रश्नासाठी, त्याने पेलाभर दुध मागविले. मग म्हणाला “हे दूध आहे मात्र त्याच्या कणाकणात असलेले लोणी दिसत नाही. तसेंच प्रत्येक अणू-रेणूत परमेश्वर असूनही तो दिसत नाही.”
“परमेश्वर कोणत्या दिशेला पाहतो?” या उत्तरासाठी त्याने एक पेटलेली मेणबत्ती मागवली. ती दाखवत तो म्हणाला, “ही मेणबत्ती कोणत्याही विशिष्ट दिशेकडे पाहात नाही. तिचा प्रकाश मात्र चारही दिशांना पसरला आहे. परमेश्वरही चारही दिशांना सदैव पाहतो त्यामुळे तो सगळीकडे आहे.”
आता तिसरा प्रश्र. “परमेश्वर काय करतो?” तर राजा म्हणून तुम्ही जे करता तेच! म्हणजे एखाद्याला वर चढविणे, खाली ढकलणे, कोणाला जीवनदान तर कोणाला मृत्युदंड देणे. ही जशी कामे तुम्ही करता तसेच परमेश्वरही अशी कामे करतो. म्हणजे, तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो.
राजाला ही तिन्ही उत्तरे लगेच पटली व त्यालाच त्याने राजगुरू होण्याची विनंती केली. मात्र नोकर म्हणाला, त्या जागेसाठी माझे मालकच योग्य आहेत. राजानेही विचार केला की, नोकरच एवढा हुशार तर महापंडित खरेच ज्ञानी असावेत. त्यामुळे त्यांना बोलावून त्वांनी त्यांची राजगुरू पदावर नियुक्ती केली..
Leave a Reply