अभिजात मराठीच्या चिंध्या उडवाल किती ठिकाणी ? ! नेत्यांपेक्षा आता वाहिन्यांच्या पत्रकारांचे मराठी सुद्धा घसरगुंडीला लागले !
ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय?
जाहीर सभेमध्ये किंवा मुलाखत देतानाही प्रत्येक वाक्यामध्ये “ह्या ठिकाणी” आणि “त्या ठिकाणी” असे खडे नेतेमंडळी खाऊ लागली आहेत. त्यामुळे निश्चितच मायमराठीच्या शिरावरील मुकुट घरंगळू लागला आहे. इथवर गोष्टी ठीक होत्या. परंतु आता प्रसारमाध्यमातील पत्रकारही, पूर्वी मोटारीची क्लचप्लेट निकामी होऊ लागल्यावर मोटार जशी मागेपुढे धक्के खात असे, तसे पत्रकारही “या ठिकाणी” आणि “त्या ठिकाणी” असे घाणेरडे पालुपद उच्चारल्याशिवाय वार्तांकन करेनासे झाले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातून आमचे पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हा त्यांनी आपल्या अतिशय सुंदर आणि ढंगदार मराठीचा परिचय लोकसभेला करून दिला होता. ज्ञानोबा तुकोबाच्या मराठीचा यमुनाकाठावर जयजयकार केला होता. तेव्हा लोकसभेचे सभापती अय्यंगार होते.
त्याआधी संसदेमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये कोणी बोलत नसे. परंतु नाना पाटलांनी पंडित नेहरूंच्या साक्षीने लोकसभेला ठणकावून सांगितले होते की, चार-पाच कोटी लोकांची मराठी भाषा तुम्हाला समजत नसेल तर त्यात माझा दोष काय? प्रादेशिक भाषा समजून घेण्याची व्यवस्था करा. आपल्या क्रांतीसिंहांच्यामुळे पुढे संसदेत ती व्यवस्था झालीही.
आता जर कोणी #मराठी खासदार लोकसभेत बोलायला उभे राहिले तर “ह्या ठिकाणी” आणि “त्या ठिकाणी” असे घाणेरडे मराठी बोलू लागले, तर दिल्लीकरांनी काय समजायचे? ह्या ठिकाणी म्हणजे कॅनॉटप्लेसमध्ये समजायचे की त्या ठिकाणी म्हणजे जमनापार पटपर्गंज समजायचे? काय समजायचे? ज्यांचे ग्रंथांशी काही देणे घेणे नाही. गरीब ग्रंथालीयन कर्मचाऱ्यांचे तटपुंजे अनुदान पास करावयाच्या फायली टेबलावर आल्यावर, जे नग समोरच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. त्यांच्या जिभेवर स्वच्छ, सुंदर, मधुर, चित्रमय मराठी भाषा येणार तरी कशी?
आजकाल तर विविध वाहिन्यांवर न्यूज रिपोर्टिंग करताना संबंधित पत्रकार एका मिनिटांमध्ये दहा दहा ते पंधरा पंधरा वेळा “या ठिकाणी” आणि “त्या ठिकाणी” अशी घाणेरडी मराठी भाषा बोलू लागले आहेत. या आधी अशी किळसवाणी कळा मायमराठीला स्वातंत्र्यानंतर कधीही आली नव्हती. आज प्रबोधनकार ठाकरे, गोविंद तळवळकर, माधव गडकरी, अगर आमचे मुणगेकरसर असते तर अशी ओंगळवाणी मराठी त्यांनी प्रसारमाध्यमात सहन केली असती का हो ? नेत्यांबद्दल आम्ही काय बोलावे? आधुनिक कवीकुलगुरू आमचे बा. सी. मर्ढेकर यांनी 70 वर्षामागे लिहून ठेवले आहे,
“नाही आसू नाही माया
त्यासी नेता निवडावे
आम्हा मेंढरासी ठावे !”
शिवाय रिपोर्टिंग करताना “हे जे आहे”, “जो उमेदवार जो आहे,”(जो जोचा पाळणा काय गाता राव? पूर्ण वाक्य बोला ना.) “पंतप्रधानांचे जे भाषण जे झाले” (एकदाच भाषण झाले ना, मग ते पुन्हा जे जे काय म्हणायचे?) वारी पंढरपूरची असो किंवा प्रवास लोकसभेचा. मन, दिल आणि दिमाख स्वच्छ असेल तर चांगल्या गोष्टी आपोआप घडतात. सहज जुळतात आणि समजतातही..
आमच्या संत तुकोबांनी पंढरीच्या वारीस जाणाऱ्या गावातील एका चवचाल म्हणजेच नखरेल आणि नटखट नारी बद्दल एक अभंग लिहिला होता,
“ आवा जाते पंढरपुरा
वेशीपासून परते माघारा
तुम्ही खावा ताकपाणी
जतन करा माझे लोणी.”
हीच गोष्ट आधुनिक काळाच्या संदर्भात सांगायची झाली, तर कशी सांगता येईल ?
“ आवा पार्लमेंटात चालली
गिरकी मारत एअरपोर्टवर थांबली
“ह्या ठिकाणी”- “त्या ठिकाणी
बोलेन मी मराठी जोरदार
जीवापाड जपा ग सयानो
माझा फंडाची कामे
जुळवणारा कंत्राटदार !
सातजन्मीचा जोडीदार !!
– विश्वास पाटील
Leave a Reply