नवीन लेखन...

मानसिक तणावाचे दुष्परिणाम

निरोगी आयुष्यासाठी शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्यालाही महत्त्व आहे. वाढलेले मानसिक ताणतणाव अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकतात. वाढलेल्या मानसिक ताणतणावातून कोणते त्रास होऊ शकतात. मानसिक तणाव, चिंता या मानवी आयुष्याच्याच भाग आहेत, परंतु त्यांचा अतिरेक मानवी आरोग्यास बाधक आहे. अधिक चिंता व तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला पुढे मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या व्यक्तीला पुढे अनेक मानसिक विकार जडतात आणि त्यातून बाहेर येण्यासाठी खूपच वेळ लागतो.

सुदृढ आणि व्याधीमुक्त शरीर आणि मन हे खऱ्या अर्थाने आरोग्याचे लक्षण म्हणता येईल. आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच आपले मानसिक आरोग्य देखील महत्वपूर्ण असते. कारण जर मन अस्वस्थ असेल, तर याचे परिणाम शरीरामध्ये कोणत्या न कोणत्या व्याधीच्या रूपाने दिसून येत असतात. मानवी मेंदू दीर्घकाळ तणाव सहन करू शकत नाही. निसर्गाने त्याची रचनाच तशी केलेली आहे. त्याउलट तसे झाले तर मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. तणावामुळे माणसावर भावनिक, शारीरिक, मानसिक व व्यावहारिक पातळीवर प्रतिकूल परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील अनियमितता, वेळेचा अभाव, नातेसंबंधांतील चढ-उतार आणि जास्त काम यामुळे प्रत्येक व्यक्ती तणावाला बळी पडत आहे.

तणावाची लक्षणे – दात विचकणे, बोलताना अडखळणे, नव्या गोष्टी शिकताना सतत अडथळे येणे, ओठ थरथर कापणे, हातांना घाम येणे, विसरभोळेपणा, कामाचे अव्यवस्थापन, निर्णय घेण्यास अक्षमता, मनात नेहमी आत्महत्या करण्याचा विचार येणे, अधिक घाम येणे, एकटे असल्याची भावना, हातपाय थंड पडणे, तोंड सुकणे, वारंवार पाय हलवणे, जास्त थंडी वाजणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, छोट्या छोट्या गोष्टींवर कडवट प्रतिक्रिया देणे, कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास स्पष्टीकरण देणे/खोटे बोलणे, घाईघाईने बोलणे, अनिद्रा, वाईट स्वप्न पाहणे, धूम्रपान वा अल्कोहोलचे सेवन करणे अशा व्यसनांच्या नादी लागणे आणि गरज नसताना खरेदी करणे.

मानसिक तणावामुळे वजन वाढणे, चरबी वाढणे, जडत्व, दम लागणे, सर्वांगावर सूज येणे, तर काही जणांत रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो. सांधे दुखणे, सांधे सुजणे, मान दुखणे, डोके दुखणे, मळमळ, उलटी होते. मानसिक तणावातून निर्माण होणार्‍या अथवा वाढणार्‍या रुग्णांमध्ये उपचार करताना मूळ विकाराच्या उपचाराच्या जोडीलाच मानसिक तणाव दूर करण्यासाठी मनाची सहनशक्‍ती अथवा मनाचे बल वाढविणे गरजेचे असते. यावर काही जण टेन्शन कमी करणार्‍या रासायनिक गोळ्या घेत असतात. यातून तात्पुरता आराम मिळत असला तरी काही जणांत या औषधांचे दुष्परिणाम जाणवत असतात. यामुळे अशा रासायनिक औषधापेक्षा मनाचा सत्त्वगुण वाढविणारी मनःशक्‍ती वाढविणारे आयुर्वेदिक उपचार घेणे उपयोगी आणि सुरक्षित आढळून येत आहेत.

आयुष्यातील अनिश्चितता, आर्थिक अडचणी, कामाचे वाढलेले तास, नातेसंबंधातील दुरावा, इतरांशी तुलना करणे, अवास्तव अपेक्षा करणे, नकारात्मक विचार या सर्व कारणांमुळे मानसिक तणावाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. अभ्यासाचा ताण, तीव्र झालेली स्पर्धा, आईवडिलांच्या अपेक्षा, मैदानी खेळांचा अभाव या सर्व कारणांमुळे विद्यार्थी वर्गसुद्धा तणावाखाली वावरताना दिसतो. त्याचप्रमाणे विविध आजार, आर्थिक अडचणी, दुरावलेली नाती या कारणांमुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा मानसिक तणावाचे शिकार होतात.

तणावावर असे ठेवा नियंत्रण

सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रत्येक कामाचे नियोजन एक दिवस आधीच करा. कोणते काम आधी करावे, कधी सुरू व कधी संपवायचे, हे निश्चित करा.

१> रिलॅक्स होण्यासाठी स्ट्रेचिंग करा वा कोमट पाण्याने अंघोळ करा. कारण तणावात स्नायू आकसू लागतात.

२> तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहा. त्यामुळे स्नायू मोकळे होतील व मन:स्थिती चांगली राहील.

३> भरपूर फळे व पालेभाज्या खा.

४> तणाव आल्यास जवळच्या व जुन्या मित्रांशी व कुटुंबीयांशी चर्चा करा.

५> ध्यानधारणा, योगासने व श्वासोच्छ्वासाचा सराव मन व मेंदूतील विकार दूर करण्यासाठी फायदेशीर असतो.

६> गरज भासल्यास डॉक्टर वा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

७> ओंकाराचा जप : विशिष्ट लयीत ओंकाराचा जप केल्यास मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतात. योगमुद्रा, शवासन, समकायासन, भुजंगासन, धनुरासन या प्रकारच्या आसनांमुळे मेंदूला रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे मेंदूची क्षमता वाढून तणाव कमी करण्यास मदत होते.

— संकेत रमेश प्रसादे 

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..