अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका बागेत फिरत असताना अचानक समोर एक दिमाखदार इमारतींची रांग दृष्टीपथात आली आणि ते दृश्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. बागेतल्याच एका बाकावर बसून मी त्या इमारतीचं सौंदर्य शांतपणे न्याहाळू लागलो. बागेच्या समोरच्याच फुटपाथवर पाचसहा इमारतींचीं रांग दिसत होती. रांगेतल्या प्रत्येक इमारतीचं सौंदर्य खरोखरोच अप्रतिम होतं. युरोपियन पठडीतल्या बैठया घरांच्या शैलीतल्या त्या इमारतींमध्ये साम्य बरंच होतं आणि स्वतःचं खास वैशिष्टयही. प्रत्येक इमारत वेगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात सजली होती. एका इमारतीची रंगसंगती नजर खिळवत होती तर दुसरीचं नक्षीकाम मनाला भूरळ पाडीत होतं. नंतर एका ब्रोशरमध्ये त्या इमारतींचा फोटोही मी पाहिला व मोस्ट फोटोग्राफ्ड बिल्डिंग्ज असं त्यांचं वर्णनही मी वाचलं. माझ्या स्वतःच्या कॅमेऱ्यात मी त्या इमारतींचं सौंदर्य टीपलंच होतं. साहजिकच त्यांचं ते अचूक वर्णन मनोमन पटलं. त्या इमारतीत राहणाऱ्या भाग्यवान रहिवाशांचा मला खरोखरीच हेवा वाटला.
अमेरिका म्हणजे गगनचुंबी इमारती असं समीकरण आपल्या मनात रुजलेलं असतं. प्रत्यक्षात अमेरिकेत गगनचुंबी इमारती केवळ शहरातील एखाद्या भागातच सिमित असतात. बाकी राहत्या वस्तीतली घरं ही बैठी, जुन्या पठडीतली. सुरुवातीला हे वास्तव स्वीकारणं आपल्याला कठीण जातं मात्र बैठया टुमदार घरांचं सौंदर्य नजरेत भिनलं की गगनचुंबी इमारतींच्या बाजाराचं अप्रूप रहात नाही. एकमेकींशी स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी इमारतींची स्काय लाईन मात्र आपल्याला थक्क करुन जाते. शहराचं, देशाचं वैभव, सुबत्ता अशा स्काय लाईनमुळे अधोरेखित होते. संध्याकाळी अशा इमारती दिव्यांच्या रोषणाईने सजल्या की त्यांना कॅमेऱ्यात टिपणं अनिवार्य होऊन जातं.
इमारतींचं सौंदर्य टीपणं हा एक छंद आहे. हा छंद जडला की नजरेसमोर येणारी प्रत्येक इमारत आपण बारकाईने न्याहाळू लागतो. त्यानंतर आपल्या मनात नकळत इमारतींचं वर्गीकरण सुरु होतं. कुठली इमारत सामान्य आहे, कुठली इमारत केवळ राहण्याच्या दृष्टीने ठीक आहे आणि कुठली इमारत खरोखरच देखणी आहे अशी विभागणी करण्यात वेळ मजेत निघून जातो. देखणी इमारत समोर आली की त्या इमारतीच्या रचनाकाराविषयी मनात आदराची भावना दाटून येते. इमारत उभी करण्याचं काम उरकताना त्या रचनाकाराने कलात्मक दर्जा गाठलेला असतो. अशा इमारती मग आपल्या कायम स्मरणात राहतात. रस्त्यातून जात असताना -आता ती इमारत येईल- हे आपल्याला आधीच जाणवतं. ती विशिष्ट इमारत समोर आली की भान हरपून आपण पुन्हा त्या इमारतीचा रुबाब न्याहाळू लागतो. अमुक रस्ता म्हणजे अमुक इमारत ही खूणगाठ मनात घट्ट रुजते.
इमारतींचं सौंदर्य प्रथम मनात भरलं ते गोव्यामध्ये. गोव्यातील मंगेशी, शांतादुर्गा, अशा देवळांच्या परिसरात पाऊल ठेवलं की मन प्रसन्न होऊन जातं. देवळाची मुख्य इमारत, समोरील दीपमाळ, सभोवतालची धर्मशाळेची वास्तू, पायथ्याशी असलेलं छोटंसं तळ या सर्वच गोष्टी मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करुन जातात आणि आपण सहजरित्या नतमस्तक होऊन जातो देवळाच्या परिसरांप्रमाणेच गोव्यातील चर्चेसही हृदयात ठसतात. ओल्ड गोवा परिसरातील चर्चेस पाहताना धर्मभेद विसरुन आपण लीन होऊन जातो. गोव्यात सर्वच रस्त्यांतून डोकावणारी छोटी छोटी घरं पहात रहावी अशीच असतात. अनेक जुन्या घरांच्या समोरच्या ओसरीवर ‘बल्काव’ ही आढळतात. बल्काव म्हणजे बसण्यासाठी बांधलेला छोटासा ओटा. या बल्कावांवर बसलं की समोरच्या रस्त्यात काय चाललंय याची खबर लागते. बल्कावावर बसून रस्त्यातून येणाऱ्याजणाऱ्यांशी गप्पा मारणं हा सुशेगत गोवेकरांचा आवडीचा छंद.
पूर्वी पुण्यात औंध परिसरात छोटे बंगले दिसत. टूमदार बंगला आणि सभोवताली पसरलेली बाग हे औंध परिसराचं वैशिष्टय गणलं जात असे. आता या बंगल्याच्या जागी बहुमजली इमारती उठत आहेत. बंगल्यांची संस्कृती मागे पडून आता इमारतींचं विश्व आकार घेत आहे. अशा इमारतींमध्ये फ्लॅटस आलीशान असतात. इथे अद्ययावत सुखसोयी दिमतीला हजर असतात. मात्र या इमारती पाहात असताना परिचितांच्या मनात जुने बंगलेच समोर येतात. इमारतींचं सौंदर्य एकदा मनावर ठसलं की ते कधीच पुसलं जात नाही हे अगदी खरं.
मुंबईत व्ही.टी. फोर्टमधील जुन्या इमारतींचं सौंदर्य अद्यापही अबाधित राहिलं आहे. आता अशा इमारतींची गणना हेरिटेज मध्ये होत असल्याने पुढेही या इमारतींना धोका उरलेला नाही. एकेकाळी २६ जानेवारीच्या निमित्ताने या इमारतींवर रोषणाई केली जात असे. ही रोषणाई पाहण्यासाठी सलग तीन दिवस जनसागर लोटत असे. ट्रकमध्ये बसून दक्षिण मुंबईचा फेरफटका मारणं आणि गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल परिसराला अभिवादन करुन पहाटे घरी परतणं हा शिरस्ताच बनून गेला होता. पुढे वीजेच्या टंचाईमुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या सोहळ्याला पूर्णविराम द्यावा लागला. मात्र त्यावेळचा मुंबईकरांचा उत्साह आजही अनेकांच्या स्मरणात असेल. इमारतींचं सौंदर्य उपभोगण्याची ही प्रथा मागे पडली याचं खरोखरच दुःख होतं. आज या भागातून फिरणारा सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेतच हिंडताना आढळतो आणि आलीशान गाडीतून जाणारा धनिक सभोवातलचं सोंदर्य टिपण्यऐवजी लॅपटॉपवरील कामकाज उरकण्यात गर्क असतो. एकेकाळी आमचं सौंदर्य अनुभवायला अख्खी मुंबापुरी लोटत असे असं या मंडळींना सांगण्याचा मोह या इमारतींनाही होत असेल, कुणी सांगावं? नाही म्हणायला या इमारतींचं सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यात काही परदेशी मंडळी गर्क असल्याचं आजही पाहवयाला मिळतं. या मंडळींच्या कॅमेऱ्यासमोर ताठ मानेने उभं राहताना या इमारतींनाही आनंद होत असावा.
इमारत आणि सभोवतालचा परिसर यांचं सौंदर्य खुलविण्यासाठी वास्तूरचनाशास्त्रात आता लॅन्डस्केप डिझाईनिंग ची शाखा उदयाला आली आहे. बांधकामाचे अनेक नवे प्रकल्प राबविण्याआधी या मंडळींचा सल्ला घेतला जातो. इमारतीच्या सभोवताली बाग कुठे असावी, या बागेत कुठली झाडं लावावीत, कुठल्या फुलांची रोपं लावावीत, पायाखालच्या वाटेचं · डिझाईन कसं असावं असा सारा तपशील ही मंडळी पुरवतात आणि त्या बरहुकूम मग कॉम्प्लेक्स आकार घेतो. इमारतींचं सौंदर्य खुलविण्याच्या कलेला प्रशिक्षणाची जोड लाभते आहे. नवी पिढी खरोखरच भाग्यवान म्हणायला हवी.
– सुनील रेगे
Leave a Reply