नवीन लेखन...

इमाम आणि देवदूत

(इराणची लोककथा)

शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत. त्याचप्रमाणे त्यांचा हा मुलगा इमाम सकाळी उजाडल्याबरोबर आपल्या शेळ्यांना जवळच्या माळरानावर चरावयास नेई व संध्याकाळी दिवस मावळण्याच्या सुमारास परत येई.

एक दिवस नेहमीप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी इमाम शेळ्या वळवीत आपल्या झोपडीकडे आला. आईने वाढून ठेवलेली भाकर त्याने खाल्ली व मग झोपडीच्या दाराशी येऊन त्याने बाहेर नजर फेकली. रात्र झाली होती.

आकाशात पौर्णिमेचा चंद्र प्रकाशत होता. त्याचे स्वच्छ पिठासारखे चांदणे सभोवती सगळीकडे पसरले होते. ते पाहून इमामचा चेहरा प्रफुल्लीत झाला.

त्याने झोपडीतले एक पुस्तक उचलले व आनंदाने बाहेर तलावाच्या काठी धाव घेतली.

थोड्याच वेळात त्या चांदण्याच्या प्रकाशात ते पुस्तक वाचण्यात तो अगदी गढून गेला. तासामागून तास जाऊ लागले. चंद्र हळू हळू मावळतीला वळू लागला. रात्र संपत आली. पण इमामला किती वेळ झाला याचे भानही नव्हते, इतके त्याचे मन पुस्तक वाचण्यात रमून गेले होते.

इतक्यात आकाशात संचार करणाऱ्या एका देवदूताची दृष्टी त्या मुलाकडे गेली. देवदूत आकाशातून खाली उतरला व इमामच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. आपल्यासमोर देवदूत उभा आहे, असे पाहताच इमाम आश्चर्यचकित झाला. उठून त्याने देवदूताला भक्तिभावाने वंदन केले.

“बाळ, तू कोण आहेस? मध्यरात्र उलटून गेली. तो पहा चंद्र पहाडाखाली उतरू लागला. आता थोड्या वेळाने सूर्योदय होईल; तरी तू अजून इथे वाचीत बसला आहेस हे कसे?” देवदूताने कनवाळू स्वरात विचारले.

“फरिश्ता, माझे नाव इमाम. माझे आईबाप व मी त्या जवळच्या झोपडीत राहतो. माझा सबंध दिवस शेळ्या वळविण्यात जातो. रात्रीच तेवढी पुस्तके वाचायला मला फुरसत मिळते. आम्ही फार गरीब आहोत. दिव्यात घालयला तेल नाही. त्यामुळे ज्या दिवशी असे शुभ्र चांदणे पडले असेल, त्या दिवशी मी चांदण्यात येऊन पुस्तक वाचीत असतो.” – इमामने उत्तर दिले.

त्याची ही ज्ञानार्जनाची लालसा पाहून देवदूताला त्याचे फार कौतुक वाटले.

त्याचप्रमाणे त्याच्या गरिबीबद्दल त्याला दयाही आली. नंतर थोडा वेळ विचार करून देवदूत इमामला म्हणाला, “बेटा, विद्येबद्दल तुला वाटत असलेली एवढी गोडी पाहून मला फार संतोष वाटला. मी देवदूत आहे. मला कोणताही चमत्कार घडवून आणता येतो, हे तुला माहीतच आहे. चल, तर जवळ ये, तुझ्या मस्तकावर मी माझा एक जादूचा श्वास सोडतो. त्या श्वासासरशी आत्ताच्या आता एका क्षणात जगातील सर्व ज्ञानभांडाराचा तुला लाभ होईल; आणि मग तुझी गरिबी, पोटाकरिता सबंध दिवसभर तुला करावे लागणारे हे कष्ट, रात्रभर जागून थोडं थोडं ज्ञान मिळविण्याकरता तुला करावी लागणारी ही मेहनत, या सगळ्या गोष्टी टळतील.” यावर त्या लहान मुलाने काय उत्तर दिले असेल बरे?

कृतज्ञतेच्या स्वरात इमाम देवदूताला म्हणाला, “मेहरबान! आपल्या कृपाळूपणाबद्दल मी फार आभारी आहे. पण मला क्षमा करा. आपण देऊ केलेली ही देणगी मला स्वीकारता येत नाही. आपण केलेल्या चमत्कारामुळे जगातले सगळे ज्ञानभांडार जरी मला प्राप्त झाले, तरी त्याची मला खरी गोडी वाटणार नाही. माझ्या मनाला त्यामुळे खरे सुख लाभणार नाही. पण त्या ज्ञानभांडारातला थोडासा अंश जरी मी स्वप्रयत्नाने प्राप्त करून घेतला, तरी तेवढ्याने माझ्या हृदयाला कायमचा आनंद लाभेल. माझ्या सबंध आयुष्यभर टिकणारा एक सुखाचा ठेवाच मला मिळाल्यासारखा होईल.”

त्या एवढ्याशा मुलाचा विचारीपणा व स्वाभिमान पाहून देवदूताला त्याचे अधिकच कौतुक वाटले. त्याने प्रेमाने इमामला जवळ घेतले, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरविला व पुन्हा विचारले, “बाळ, ज्ञानसंपादनाबद्दलची तुझी ही उच्च भावना पाहून मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. मी केलेल्या चमत्काराने तुला ज्ञानप्राप्ती करून घ्यायची नसेल, तर त्याबद्दल माझा आग्रह नाही. पण तुला कोणती तरी देणगी दिल्यावाचून माझे समाधान होणार नाही. तरी तुला हवी असलेली कोणतीही एखादी वस्तू माग पाहू.”

देवदूताच्या ह्या शब्दांना इमामने उत्तर दिले, “ परवरदिगार, आपला कृपाप्रसाद म्हणून एखादी वस्तू मला आपल्याला द्यावयाची असेल, तर एका गोष्टीची मला फार जरूर आहे, तेवढी द्या. काळोख्या रात्री चांदण्यांचा प्रकाश नसल्याने मला पुस्तक वाचणे शक्य होत नाही. तरी अशा दिवशी दिव्यात घालायला मला थोडे तेल मिळेल असे करा. म्हणजे दिव्याच्या प्रकाशात मला वाचता येईल.” देवदूताने त्याची ही छोटीशी मागणी मोठ्या संतोषाने मान्य केली, हे सांगावयास नको.

देवदूताच्या दैवी सामर्थ्याने आपोआप प्राप्त होणारे जगातले सर्व ज्ञानभांडार स्वीकारण्याचे त्याने नाकारले. दिव्याच्या प्रकाशात वाचायला मिळावे म्हणून त्याजकडे तेल मागितले. असा हा एका गरीब धनगराचा मुलगा इमाम, पुढे मोठेपणी “इमाम घिझाली’ या नावाने प्रसिद्धीला आला. इराण देशातच नव्हे तर साऱ्या जगभर एक ज्ञानी संत म्हणून त्याची ख्याती पसरली.

[“बालसुधा’, पुस्तक ५ वे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ३-६]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..