अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतीय अणुभट्ट्यांपैकी बहुसंख्य अणुभट्ट्यांत इंधन म्हणून नैसर्गिक युरेनिअम वापरलं जातं. हे युरेनिअम झारखंड राज्यातल्या सिंघभूम पट्ट्यात सापडणाऱ्या खनिजांद्वारे मिळविलं जातं. जमिनीलगत तसंच जमिनीखाली खोलवर वसलेल्या या खाणींतून हे खनिज गोळा केलं जातं. झारखंडमधील जादुगोडा आणि तुरमदीह येथील प्रकल्पांत रासायनिक क्रियेद्वारे या खनिजांतील युरेनिअम वेगळं केलं जातं.
मॅग्नेशियम डाययुरेनेट या संयुगाच्या स्वरूपातल्या या युरेनिअमचं हैद्राबाद येथील कारखान्यात इंधन म्हणून वापरायला योग्य अशा युरेनिअम ऑक्साईडमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर हे इंधन झिर्कोलॉय या मिश्रधातूच्या लांब नळकांड्यात भरून अणुभट्टीत वापरलं जातं. या अणुइंधनाचा वापर तारापूर (महाराष्ट्र), रावलभाटा (राजस्थान), कल्पक्कम (तामिळनाडू), कायगा (कर्नाटक), नरोरा (उत्तर प्रदेश) आणि काकरापार (गुजरात) येथील एकूण अठरा अणुभट्ट्यांत होतो.
अणुभट्टीतील काही काळाच्या वापरानंतर या अणुइंधनाची कार्यक्षमता घटते. त्यामुळे हे इंधन यानंतर अणुभट्टीतून बाहेर काढलं जातं. या वापरलेल्या अणुइंधनावर रासायनिक प्रक्रिया करून त्यातील न वापरलेलं युरेनिअम आणि निर्माण झालेलं प्लुटोनिअम वेगळं केलं जातं.
इंधनावरची ही ‘पुनर्प्रक्रिया’ तारापूर आणि कल्पक्कम येथील प्रकल्पांत केली जाते. या प्रक्रियेत वेगळं केलं गेलेलं युरेनिअम आणि प्लुटोनिअम भारताच्या अणुकार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांत वापरलं जाईल.
आता कार्यरत असलेल्या अणुभट्ट्यांबरोबरच कुडनकुलम, रावलभाटा आणि काकरापार येथे नैसर्गिक युरेनिअमवर आधारित नव्या अणुभट्ट्यांची उभारणी केली जात आहे, तसंच हरयाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांत अशाच अणुभट्ट्या उभारल्या जाणार आहेत.
अणुऊर्जा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याला अधिक गती मिळावी यासाठी कुडनकुलम (तामिळनाडू), मिठी विर्दी (गुजरात), कोव्वाडा (आंध्र प्रदेश) आणि हरिपूर (प. बंगाल) येथे आंतरराष्ट्रीय सहकार्याने, समृद्ध युरेनिअमवर आधारित अणुभट्ट्यांच्या बांधणीची तयारी चालू आहे. याबरोबरच अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची पूर्वतयारी म्हणून कुडनकुलम येथे द्रुत प्रजनक अणुभट्टीसुद्धा बांधली जात आहे.
Leave a Reply