नवीन लेखन...

हिंदू धर्मात स्नानाचे माहात्म्य

स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे.

अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.

ब्राह्ममुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6
मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8
राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10
प्रेत भुतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला कीड

ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ:
ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ती वाढते.

6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते:
ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो.

राक्षसांची अंघोळ 8 ते 10:
ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर लोभ जास्त मनुष्यात येतो. दैविक शक्ती फार कमी मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जडतात.

प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12:
ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ती ही खूप आळशी होते. तो मनुष्य इतका रागीट होतो की राग आला की त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही.

तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे. तरच त्याची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे. तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग. नाहीतर मग आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे.
स्नान कोठे करावे?

नदी आणि जलाशय यांमध्ये केलेले स्नान उत्तम, विहिरीत केलेले स्नान मध्यम आणि घरात केलेले स्नान निकृष्ट होय. याच कारणास्तव एखाद्या तीर्थस्थळी धार्मिक विधी करायला गेल्यावर पुरोहित पवित्र नदी किंवा सरोवर यांत स्नान करण्यास सांगतात.

नित्य स्नान करतांना गंगेसह पवित्र नद्यांचे स्मरण केले जाते. गंगोदकाने स्नान करणे बहुतेकांना अशक्य असल्याने महाराष्ट्रात पूर्वी तांब्यापासून किंवा पितळेपासून बनवलेल्या आणि पसरट तोंड असलेल्या ‘गंगाळ’ नावाच्या भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्याने स्नान करत.

गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु।।

“स्नान करताना वरील मंत्राचा उच्चार केल्यास तीर्थ स्नानाचे फळ मिळते. ”

आपल्या दैंनदिन जीवनात मंत्र स्नानाचे महत्व

मंत्र हे असे प्राचीन नाद आहेत जे सकारात्मक स्पंदनांनी भारलेले असतात. जेंव्हा मंत्रांचे उच्चारण केले जाते तेंव्हा नादाची अशी कंपने निर्माण होतात जी ऐकणाऱ्यास आणि वातावरणासाठी अतिशय लाभदायक ठरतात. ते याप्रमाणे :

• मंत्रोच्चारामुळे तुमच्या आत सकारात्मक ऊर्जेचा उदय होतो.
• मनाची शक्ती एकत्रित होऊन तिला बळ प्राप्त व्हायला मदत लाभते.
• मंत्रांमुळे तुमच्या शरीराभोवती कवच निर्माण होते. (म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात).
• नकारात्मक आणि हानिकारक कंपने अधिक सकारात्मक कंपनात परिवर्तित केली जातात.
• वातावरण आणि परिसरात सुसंवाद साधला जातो.

हिंदू धर्माच्या संवत्सरातील महत्वाची स्नाने :

अभ्यंगस्नान

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंगस्नान विविध प्रसंगी केले जाते.

आख्यायिका

नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.

मुहूर्त- अभ्यंगस्नान हे पौराणिक कथेशी जोडले गेलेले असल्याने त्याच्यासाठी काही विशिष्ट वेळ पाळण्याचे संकेत रूढ आहेत. याला मुहूर्त असे म्हटले जाते. या मुहूर्तावर केलेले अभ्यंगस्नान फलदायी होते अशी धारणा आहे.

हेतू आणि वैद्यकीय महत्त्व

अभ्यंगाचे फायदे –

अभ्यङमाचरेन्नित्यं स जरागमवातहा|
दृष्टिप्रसादपुष्टमायु स्वप्नसुत्वक्त्वदार्घ्यकृत् |

रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. कारण अभ्यंग वार्धक्य, क्षय व वात यांचा नाश करतो. म्हणजे शरीराची झीज कमी होते. स्निग्धपणा वाढतो. बल वाढते. वाताचे रुक्षादि गुणांचे शमन होते. त्यामुळे सहज हालचाली करणे शक्य होते.

दृष्टी प्रसादन होते. म्हणूनच पूर्वीचे लोक डोळ्यांतसुद्धा तेल घालायचे.

आता जो ‘ड्राय आइज’चा त्रास आहे तो पूर्वी कधीच होत नव्हता. कित्येक डोळ्यांच्या त्रासांमध्ये ‘त्रिफला घृताचे तर्पण सांगितलेले आहे. तेसुद्धा तूपाने डोळ्यांचे केलेले अभ्यंगच आहे.

• अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात. तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि त्याना बळकटी देण्यासाठी उपयुक्त असते. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते. अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते. यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे हळद,मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चुर्णांचे मिश्रण केलेले असते. याचे लेपन अंगाला करून स्नान केले जाते.

• अभ्यंग स्नानासाठी उटणे आणि सुगंधी साबण

माघी स्नान :

माघ महिन्याचे नेमके महत्त्व काय? का केलं जातं गंगेत स्नान

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष स्वतःचे महत्त्व असते. काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, कालपासून माघ महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात लोक गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वार, प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळी जातात. धार्मिक दृष्टिकोनातून गंगेत स्नान करणारी व्यक्ती शरीर आणि आत्म्याने पवित्र बनते असा समज आहे.

इंद्रदेवाला गौतम ऋषींचा शाप, मुक्तीसाठी गंगेत स्नान

पौराणिक कथेनुसार, माघ महिन्यात इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता. आपली चूक लक्षात घेऊन इंद्रदेवाने गौतम ऋषींची माफी मागितली होती. तेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला माघ महिन्यात गंगेत स्नान करून चुकांचे प्रायश्चित्त करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी याच महिन्यात गंगेत स्नान केले. भगवान इंद्राला गंगेत स्नान केल्यावरच शापापासून मुक्ती मिळाली. तेव्हापासून माघ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावास्येला गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले. पुढील वर्षी माघ महिना २२/१/२३ ते २० फेब्रुवारी २३ पर्यंत आहे.

कार्तिकस्नान :

आश्विनशुद्धातल्या दशमी, एकादशी अथवा पौर्णिमा यांपैकी कोणत्या तरी एका तिथीवर आरंभ करून, दोन घटका रात्र शिल्लक राहिली असता, कोणच्या तरी तीर्थावर जाऊन, एक महिनाभर दररोज कार्तिकस्नान करावे.

‘कार्तिकेऽहं करिष्यामि प्रातःस्नानं जनार्दन ।
प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मयासह ॥
ध्यात्वाहं त्वांच देवेश जलेऽस्मिन्स्नातुमुद्यतः ।
तव प्रसादात्पापंमे दामोदर विनश्यतु ॥’

या मंत्रांनी स्नान करावे आणि

‘नित्ये नैमित्तिके कृष्ण कार्तिके पापनाशने ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥
व्रतिनः कार्तिके मासि स्नातस्य विधिवन्मम ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥’

या मंत्रांनी पुन्हा दोन वेळा अर्घ्य द्यावे.

कुरुक्षेत्र, गंगा,पुष्कर वगैरे विशेष तीर्थांच्या ठिकाणी या (स्नाना) चे विशेष फळ मिळते. ह्या कार्तिकस्नानाच्या बाबतीत आणखी जो एक विशेष आहे, तो असा जो कोणी सर्व कार्तिक महिनाभर जितेंद्रिय राहून, रोज स्नान, जप, हविष्यान्न भक्षण करून राहतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. हे कार्तिकस्नान, प्रातःस्नान व प्रातःसंध्या केल्यावर करावे, कारण ती कर्मे केल्यावाचून इतर कर्मे करण्यास अधिकार नाही. प्रातःसंध्या जरी सूर्योदयी संपवावी असे आहे तरी या संबंधाने विशेष वचन असल्याने, सूर्योदयापूर्वीच संध्या आटपून कार्तिकस्नान करावे, असे निर्णयसिंधूत सांगितले आहे. ही गोष्ट इतर ग्रंथात सांगितलेली नाही.

आवळीचे स्नानाचेही असेच माहात्म्य :

आवळीचेही जे असेच माहात्म्य आहे, ते असेः – कार्तिकात आवळीखाली निरनिराळ्या अन्नांनी हरीचा संतोष करावा, भक्तीने ब्राह्मणाला जेवू घालावे व आपण बांधवांसह भोजन करावे. आवळीच्या छायेत श्राद्ध आणि आवळीच्या पानाफलांनी हरिपूजन या गोष्टी केल्याने मोठे फळ मिळते; कारण देव, ऋषी व यज्ञांना योग्य अशी तीर्थे यांची वरती आवळीत असते, असे वचन आहे.

पवित्र नद्यातील स्नान :

गंगा नदी
गंगा नदी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र नदी समजली जाते. स्वर्गातून गंगा नदी हि श्री शंकराच्या मस्तकावर अवतीर्ण झाली अशी धारणा आहे. जन्मात एकदा तरी गंगास्नान घडावे, अशी कोट्यवधी हिंदूंची इच्छा असते. गंगेत आंघोळ केल्याने सर्व पापे दूर होतात, गंगा पृथ्वीवर अवतरली याची पुराणात आख्यायिका सर्वाना माहिती आहे.

या दिवसाला गंगा दसरा म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी गंगेत अंघोळ करण्याचे वेगळे महत्व आहे. या दिवशी गंगेत आंघोळ केल्याने सर्व पापे दूर होतात असे सांगितले जाते. या सोबतच पूजा आणी दान केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात अशी धारणा आहे. राज्याभिषेक करताना गंगाजलाने स्नान राज्याभिषेक करताना गंगाजलाने स्नान घालतात. म्हणूनच असेही म्हटले जाते की, भागीरथीत साठ हजार वर्षे स्नान करून जेवढे पुण्य मिळत नाही, तेवढे पुण्य सिंहस्थात गंगास्नानाने मिळते. शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी हा गंगास्नानाचा खरा उद्देश असला तरी गंगाजलाचे महत्व हे हिंदू धर्मातील मानवाच्या जीवनात जन्मापासून मृत्यू पर्यंत आहे. मृत्यूनंतरही सद्गती मिळावी, यासाठी मृत्यूप्रसंगी व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात आणि मृत्यूप्रसंगी तसे शक्य न झाल्यास मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालतात; म्हणून घरोघरी गंगाजल ठेवलेले असते.
(ते नसल्यास तुळस घातलेले पाणी वापरतात.) गंगेत अस्थींचे विसर्जन करणे, हा एक महत्त्वाचा अंत्यविधी आहे. ‘गंगेत विसर्जित केलेल्या अस्थी जितकी वर्षे गंगेत रहातात, तितकी वर्षे त्या मृतात्म्याला स्वर्गात निवास करता येतो’, असे पद्मपुराण, नारदीय पुराण, स्कंदपुराण आणि अग्निपुराण, तसेच महाभारत यांमध्ये सांगितले आहे.

गोदावरी स्नान :

गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून, तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले. सिंहस्थ पर्वणीत स्नान हे विशेष पुण्यदायक असल्याचे ब्रह्मांड पुराणात म्हटले आहे. सिंहस्थ काळात साधू महंत गोदावरीत स्नान करीत असल्याने त्यांनी वर्षोंवर्ष केलेल्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते अन् म्हणूनच याकाळात गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक व आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळते, असे म्हटले जाते. गोदेचा जन्म आणि सिंहस्थाचे अजोड नाते असल्यानेही गोदावरी माहात्म्य अन् साधू ही संकल्पनेचा मिलाफ झाला आहे.

`गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी’ म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी गोदावरी मोक्षाचं सुलभ साधन मानलं गेलं आहे. पापसागरात डुंबलेल्यांचा उद्धार करण्यासाठीच भाविक, साधू लाखोंच्या संख्येने उद्धारासाठी सिंहस्थ पर्वणीकाळात गोदातिरावर येतात.. यामुळे ती ऊर्जा मानसिक स्वरूपात यंदा मिळणार असली तरी तिचे शाश्वत स्वरूप काय असेल याबाबत चिंता वाटते. गोदावरीचे माहात्म्य लक्षात घेऊन तरी गोदास्वच्छतेसाठी आपण प्रत्येकाने आपापल्यापरिने झटले पाहिजे.

स्नानाची शास्त्रीय पद्धत :

या धकाधकीच्या कलियुगात वरील सर्व नियम पाळून सर्वांना स्नान करणे शक्य होतेच असे नाही. बहुतेक सर्व स्नाने घरीच होतात. त्या वेळेस बहुतेक गार किंवा गरम पाणी वापरले जाते. घरी स्नान करतांना कांही पथ्ये पाळावी. शक्यतो पाणी फार गार अथवा गरम असू नये. स्नानाची सुरवात प्रथम पायाकडून करावी. नंतर आपली छाती व शेवटी डोक्यावरून पाणी घ्यावे. त्यामुळे आपला मेंदू हळू हळू वाढणाऱ्या आणी कमी होणाऱ्या तापमानास अनुकूल होतो. यामुळे मेंदूला अचानक कमी किंवा जास्त तापमानाचा धक्का बसून त्यास इजा होत नाही. वयस्कर व्यक्तींनी अशी काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

|| इति स्नानाचे माहात्म्य ||

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ :
मराठी विकिपीडिया
श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७,
श्री निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७,
श्री गणपति (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५,
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७,
सनातन संस्था, वेगवेगळे लेख
खासरे, ऑगस्ट, २१,२०१९
नवप्रभा , ऑक्टोबर २९, २०१९
श्री विनोद पंचभाई, जानेवारी, २०२१
सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मात स्नानाचे माहात्म्य

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..