सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव लहान देश भारताकरता महत्त्वपूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे. सेशेल्स हिंद महासागरातील एक लहानसे मात्र सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे द्विप समुह आहे. येथे फ्रेंच, ब्रिटिश, भारतीय, इराणी आणि चिनी वंशाचे नागरिक राहतात. लोकसंख्येच्या १० टक्के भारतीय वंशाचे लोक आहेत.
चीनचा प्रभाव सेशेल्स मधे वाढतो आहे
येथे चीनचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. आम्ही सेशेल्सला ‘आफ्रिकेचे हॉंगकॉंग’ बनवू शकतो आणि संपूर्ण आफ्रिकन महाद्वीपात पोहोचण्याचे महाद्वारसुद्धा असे चीन म्हणत आहे. आतापर्यंत चीनचे सेशेल्समध्ये १६ मोठे सरकारी आर्थिक प्रकल्प सुरू आहेत आणि आठ कोटी अमेरिकन डॉलर्स मदत चीनने सेशेल्सला केली आहे. सेशेल्समधे सर्वाधिक १२ हजार पर्यटक चीनमधून आले. सेशेल्स येथे चीनचे संरक्षणविषयक प्रतिनिधिमंडळ सातत्याने जात असते. चीनने सेशेल्सला दोन वाय १२ हेरगिरी करणारी विमाने आणि नौदल इस्पितळही ‘भेट’ म्हणून दिले आहे.
प्रदीर्घ काळापासून चीन सेशेल्समध्ये आपला नाविक तळ उभारण्याचा प्रयत्न करीत आहे.चीन मॉरिशसजवळ दिएगोगार्सिया अमेरिकेच्या नाविक तळाजवळ आपले टेहाळणी केंद्र बनवू इच्छित आहे. संपूर्ण आफ्रिका क्षेत्रात नाविक हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सेशेल्स अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
मोदी यांची सेशेल्स भेट
यापुर्वी भारताने सेशेल्सच्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण दिले आहे, तसेच एक डोरनियर विमान आणि दोन चेतक हेलिकॉप्टर दिले आहेत. हिंदी महासागरात आपली स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात ११ मार्चला सेशेल्सशी चार करार केले. यामध्ये सेशेल्सला त्यांचे जलस्रोत निश्चित करणे, सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य मजबूत करण्यासाठी सागरी क्षेत्र निगराणी रडार प्रकल्प सामिल आहे. सेशेल्सला दुसरे ड्रोनिअर विमान देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांच्या नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल. दोन्ही देशांनी हिंदी महासागरातील व्यापक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या ३४ वर्षांत सेशेल्सला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. सेशेल्स लवकरच भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सुरक्षा सहकार्याच्या क्षेत्रातील पूर्ण भागीदार होईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. अनुदान आणि कर्जाच्या रूपात भारताद्वारे सेशल्सला ७.५० कोटी डॉलरची रक्कम दिली जाणार आहे.
मॉरिशस म्हणजेच मिनी इंडिया
मॉरिशसच्या दिएगोगार्सिया बेटावर अमेरिकेच्या हवाई दलाचा, तसेच नौदलाचा प्रचंड मोठा तळ आहे, ज्या माध्यमातून हिंद महासागराच्या सर्व क्षेत्रांवर अमेरिका आपली नजर ठेवण्याचे काम करते. फ्रान्सने द्जिबुति रियूनियन आणि अबुधाबीमध्ये आपला महत्त्वपूर्ण नाविक तळ उभारला आहे. चीनने हिंदी महासागरातील लहानसहान देशांना आपल्या कहय़ात घेण्यासाठी वेगवेगळय़ा मार्गांनी प्रयत्न चालविले आहेत. सागरी क्षेत्रही आपल्या वर्चस्वाखाली आणण्याची चीनची धडपड आहे. त्या दृष्टीने आसपासच्या देशातील अंतर्गत राजकारणावरही पकड निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. चीनला असे सर्वत्र हातपाय पसरू देणे हे त्या देशांसाठीच नव्हे तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोक्याचे ठरते.
मॉरिशस ‘लघु भारत’ (मिनी इंडिया) नावानेच ओळखला जातो. येथे १८२० पासून भारतातून मजूर येऊ लागले आणि त्यांनी रामचरित मानसच्या आधाराने आपला धर्म आणि भारताशी असलेले संबंध जिवंत ठेवले. मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस दरवर्षी १२ मार्च, म्हणजे ज्या दिवशी गांधीजींनी भारतात दांडी यात्रा सुरू केली, रोजी साजरा करण्यात येतो. भारत मॉरिशसचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहेच, शिवाय या संपूर्ण क्षेत्रात भारताचा सर्वात विश्वसनीय देशही आहे.
मोदी यांची मॉरिशस भेट
मॉरिशस या छोट्याशा देशाने हिंदी भाषेची खूप सेवा केली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मार्चला येथे काढले. भारत आणि मॉरिशस यांच्यात अनेक गोष्टींबाबत साम्य आहे. या दोन्ही देशांमध्ये होळी, दिवाळी, महाशिवरात्र अशाप्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दुहेरी करआकारणी प्रतिबंध कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे १२ मार्चला स्पष्ट करण्यात आले. मॉरिशसमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने ५० कोटी डॉलर म्हणजे अंदाजे ३२ अब्ज रुपयांचे सवलतीचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान विविध प्रकारच्या पाच करारांवर स्वाक्षरी केली. सागरी सहकार्य, शेती, सांस्कृतिक, पारंपरिक औषधी आदी विषयांशी हे पाच करार संबंधित आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस उत्सवाचे मोदी प्रमुख पाहुणे होते. त्याचप्रमाणे मोदींनी मॉरिशसच्या संसदेतही मनोगत व्यक्त केले. या वेळी मोदी म्हणाले, ‘दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दुहेरी करआकारणी प्रतिबंध कायदाचा गैरवापर रोखण्यासाठीही प्रयत्न केले जातील. काळा पैसा गुंतविण्यासाठी टॅक्स हेवन असणाऱ्या मॉरिशसचा वापर होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’
‘मॉरिशसमध्ये तातडीने इंधन साठवणूक आणि बंकरच्या सुविधा उभारण्याचा आमचा उद्देश आहे. आपले सहकार्य धोरण हे सुरक्षा सहकार्यासाठी मैलाचा दगड ठरेल; तसेच सागरी अर्थव्यवस्थेतील सहकार्यामुळे आपल्याला वैज्ञानिक आणि आर्थिक भागीदारी अधिक बळकट होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.अप्रवासी घाट येथे जाऊन दोन शतकांपूर्वी मॉरिशमध्ये भारतातून आलेल्या कामगारांच्या स्मृतिस्थळाला मोदींनी आदरांजली अर्पण केली.
हिंद महासागर भारताच्या सामरिक हितांसाठी सर्वात मोठे क्षेत्र
सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव आणि मालीसारखे देश लहान असूनही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या सागरी देशांसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हिंद महासागर भारताच्या सामरिक हितांच्या संरक्षणाचे सर्वात मोठे क्षेत्र बनले आहे. हाच विश्वातील एकमेव सर्वाधिक मोठा महासागर भारताच्या नावाने आहे .भारताची संपूर्ण व्यापार हिंद महासागरातून जातो. सुएझ कालवा, मलक्का, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीसारखे क्षेत्र भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जगातील ८० टक्क्यांहून अधिक तेलाची वाहतूक हिंद महासागर क्षेत्रातून होते.
अर्थात या तीन देशांशी स्नेहसंबंध जोडणे किंवा निर्माण करणे एवढय़ापुरताच पंतप्रधानांचा दौरा मर्यादित नव्हता. हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनने चालविलेल्या प्रयत्नाना काही प्रमाणात शह देणे हाही होता.चीनमधील स्पर्धेमुळे या संपूर्ण क्षेत्रात शांती कायम ठेवण्यासाठी आणि हिंद महासागरातील देशांवर आपली पकड व प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी भारताजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे आपल्या शेजारी देशांना चीनपासून दूर ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी भारताला पार पाडावी लागणार आहे. मोदी यांनी तीन देशांचा केलेला हा दौरा म्हणजे विश्वास निर्मितीचाच एक भाग होता. मोदी यांनी या देशांना दिलेली भेट ही आंतराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्थान मजबूत करण्यासाठीही होता.
मला खुप आवडले . I LIKE IT