३ मे १९६५ रोजी शिवाजी मंदिराचा शुभारंभ झाला. मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या शिवाजी मंदिरची वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत शिवाजी मंदिरचा कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि शिवाजी मंदिरचे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज शिवाजी मंदिरमध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण शिवाजी मंदिरचा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते. शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिरमध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे. १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply