आज १५ ऑगस्ट २०२०.
भारताला स्वातंत्र्य मिळून आज बरोबर ७३ वर्ष पूर्ण झाली.
याच शुभ दिवसाचे औचित्य साधून आज एक लेख लिहावासा वाटला. बऱ्याच वर्षांनी मला शाळेत परिपाठाच्या तासाच्यावेळी घेतल्या जाण्याऱ्या
भारतभूचे सैनिक आम्ही
भीती न मरणाची, आम्हाला कदर न प्राणाची
या गाण्याची आठवण झाली. तसेच त्याच तासाला प्रतिज्ञा देखील होत असे. ” भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत “…………….
वर्षा मागून वर्षे सरत गेली शाळेत होणारी ती प्रतिज्ञा आयुष्यभर लक्षात राहील. आज मला कळत आहे की त्या प्रतिज्ञेत “माझा” हा शब्द का वापरला असावा! मी या देशाचा, माझ्या भारताचा खूप मोठ देणे लागतो. याच देशाने मला ‘ मी भारतीय आहे ‘ अशी ओळख मिळवून दिली.याच देशात पिकणाऱ्या अन्नावर मी जगत आलो आहे. या देशातील समृध्दतेने आणि विविधतेने नटलेल्या परंपरा पाहत आलो. या देशानेच नम्रपणा कसा असावा, मोठ्यांचा आदर कसा राखावा, सगळ्या धर्म आणि संस्कृतीचा आदर कसा राखावा हे देखील शिकवले.
कधी कधी असे वाटते कि सीमेवर लढणारे जवान आणि आपले स्वतःचे कुटुंब सोडून दुसर्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणारे पोलीस खाते ह्यांनी कधी धर्मवाद, जातिवाद केला तर काय होईल? याची नुसती कल्पनाच करणे इष्ट ठरेल. आपण कधी परदेशात गेलो तर आपली जात आणि धर्म न सांगता आपण भारतीय आहोत हेच सांगतो आणि भारतात त्याच्या विरुध्द वागतो. जात, धर्म या गोष्टींमध्ये अडकून राहतो.या गोष्टी जेव्हा बंद होतील तेव्हाच सर्व धर्माच्या क्रांतीकारकांना एक मोठी आणि कायमस्वरूपी श्रद्धांजली वाहिली असे म्हणता येईल. नाहीतर त्यांची आहुती व्यर्थच गेली असं म्हणावं लागेल.
म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा “ हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.
वंदे मातरम् !
– आदित्य दि. संभूस
#स्वातंत्र्य दिन #१५ ऑगस्ट
#Independence Day
## 15 August
Leave a Reply