नवीन लेखन...

स्वातंत्र्य की परतंत्र

‘आप हिदुस्थानसे आये है क्या‘, हा काश्मीरमध्ये विचारला गेलेला कॉमन प्रश्न. ‘बनिहालच्या पलीकडून येणारे ते हिदुस्थानी‘, अशी आजही काश्मीरवासीयांची तीव्र भावना. तुम्ही (भारतीय) आणि ते (पाकिस्तानी) हा उल्लेख तर स्थानिक नेत्यांपासून तळागाळातील शेतकर्‍याच्या ओठी अगदी फिट्ट बसलेला.

युद्धाचे ढग जमा होऊ लागल्याचा पहिला साक्षात्कार साहजिकच होतो तो सीमावर्ती भागातील जम्मू-काश्मीरवासीयांना. तोफगोळ्यांचे सततचे हल्ले, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होणारी घरे – शेतीवाडी आणि सततची पळापळ यामुळे जेरीस आलेले सीमावर्ती भागातील नागरिक आज जीव मुठीत घेऊन अगतिक आणि अपमानित जिणे जगत आहेत. काश्मीर खोर्‍यात आता जी युद्धसदृश स्थिती निर्माण झाली, ती कारगिलच्या रणधुमाळीपेक्षाही अधिक चिताजनक होती. ती यासाठी की, कारगिल संघर्षाच्या वेळी शत्रूचा मारा होत होता, तो केवळ लष्करी ठाण्यांवर आणि निर्मनुष्य भूभागावर. यावेळी मात्र जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक सरहद्दीवर अतिरेक्यांच्या घुसखोरीचा डाव मांडला गेला आणि शत्रूच्या मार्‍याचा सारा रोख जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर एकवटला. त्यामुळेच सीमावर्ती भागातील हरेक गाव ओस पडलेले. अलीकडे वारंवार पडू लागलेल्या या संघर्षाच्या ठिणग्यांमुळे स्थलांतर करण्यावाचून त्यांच्यापाशी गत्यंतरच उरलेले नाही. देशाच्या फाळणीनंतरही विस्थापित होण्याच्या वेदनेपासून काश्मीरवासीय आजही मुक्त झालेले नाहीत, हेच खरे.

सीमावर्ती भागात उच्च शिक्षणविषयक सोयींचा पूर्णपणे अभाव असल्याने शेती करणे अथवा ‘आर्मी‘त भरती होणे हाच पर्याय त्यांच्यापाशी शिल्लक असतो. सीमावर्ती गावांत घरटी एकजण तरी सैन्यात भरती झालेला. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की देशाच्या सरहद्दीवर लढणार्‍या काश्मीरमधील सुपुत्राचे घर मात्र शत्रूच्या मार्‍यामुळे कुठे हलले असेल, याची सुतराम कल्पना या लढवय्यांना नसते. सारे आयुष्य स्थलांतर करण्यात गेले… आतातरी आम्हांला हक्काचं घर द्या… असे विनवणीच्या सुरात सांगणारे सुरकुतलेले चेहरे जागोजागी भेटले.

सरळ सरळ लढाई परवडली, पण दररोज मृत्यूची टांगती तलवार ठेवणारे हे अघोषित युद्ध नको.

दोन देशांच्या तंट्यात मारले जात आहेत, दोन्ही सीमेलगतचे गरीब लोक… ही सीमावर्ती भागातील लोकांची व्यथा आहे. नियंत्रण रेषेनजीकच्या उरी क्षेत्रात गरकोटा, तेलीवाडी, च्रुंदा, सिलीकोट, सोहरा या गावातील लोक मात्र तिथेच टिच्चून राहिले आहेत. याबाबत विचारले असता सिलीकोटचा रहिवासी मुश्ताक म्हणाला – ‘चिडियाँ अपने काँटेपेंही खुश रहती है, उसको महल दिया तोभी वो खुश नही रह सकती‘.

भारत – पाक सीमेलगतच्या गावात आता-आतापर्यंत रोटी-बेटी व्यवहार व्हायचा. त्यामुळे जेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होतो, तेव्हा त्यांना आपल्या जीवाची धास्ती असतेच. त्याहूनही सीमेपल्याड असलेल्या त्यांच्या नातलगांची काळजीही त्यांना पोखरत असते. फाळणीनंतर लोक दोन देशांत विभागले गेले, देशांविषयीच्या त्यांच्या निष्ठाही बदलल्या, मात्र नियंत्रण रेषेनजीकच्या सुचेतगढमधील बाबा चमद्रयाल समाधीसारखी त्यांची श्रद्धास्थाने अढळच राहिली. आजही जेव्हा दोन्ही बाजूंकडील समाधींवर एकाच दिवशी ऊरुस भरविला जातो आणि सैन्याच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंकडील भाविक दोन्ही समाधींवर समारंभपूर्वक चादर चढवितात, हे नाजूक बंध तणावाच्या क्षणीही अतूट आहेत.

काश्मीरचा भूप्रदेश, तेथील साधनसंपत्ती यातून काश्मीरचे वेगळेपण उठून दिसते. मात्र त्याबरोबरच स्थानिक जनतेने आणि विशेषतः राजकीय नेत्यांनी ही खास काश्मीरीयत जपली आहे. काश्मीरला ‘सदर – ए – रियासत‘ म्हणण्यातूनच हे वेगळेपण स्पष्ट होते. जम्मू, काश्मीर आणि लडाख हे राज्याचे तीन भाग. भौगोलिक रचना, भाषा, धर्म, राजकारण यांबाबत परस्परांहून भिन्न. मात्र सरकार आणि कायदा मात्र एकच. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निसर्गसौंदर्याबाबत संपन्न असलेल्या काश्मीरमध्ये बोटावर मोजण्याइतपतच अमीर आहेत, बाकी सबंध खोर्‍यात दारिद्र्यच नांदत आहे. सीमावर्ती भागातील ठिकठिकाणची जनता तर राज्य प्रशासनावर कमालीची नाराज आहे. घर नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत, पूल नाही, शाळा नाही, दवाखाने नाहीत. इथले बजेट केवळ कागदावर उमटते आणि कागदावर संपते, ही सर्वसामान्यांची तक्रार. नेते म्हणविणारे केवळ आपले खिसे भरण्यात मश्गुल आहेत. आम्हांला मात्र कुणीही वाली नाही, ही त्यांची खंत आजही कायम आहे.

जम्मू – काश्मीरमध्ये फिरताना अस्मितेचे नवे नमुने पाहायला मिळतात. हिदू पंडित, पंजाबी, डोग्रा आणि काश्मिरी मुस्लिम यापैकी प्रत्येकामध्येच अस्मितेची खुमखुमी उफाळून वर येत होती. गुज्जर या मेंढपाळ, गुराखी अशा भटक्या जमातीकडे मात्र बाकीचे सारेजण संशयाचे बोट दाखवितात. बर्फ वितळते तेव्हा गावातील गुरे-ढोरे, मेंढ्या घेऊन हे गुज्जर पीरपंजाल पर्वतराजी गाठतात आणि थंडीचा कडाका वाढला की ते परततात. जंगलात लपून राहिलेल्या अतिरेक्यांना हे गुज्जर माहिती आणि शिधा पुरवितात, ही स्थानिक लोकांची ठाम समजूत आहे. लष्कराचे अधिकारीही याला पुष्टी देतात.

भारतीय लष्कराबाबत सर्वसामान्य काश्मिरी सावध प्रतिक्रिया व्यक्त करतो. संपूर्ण लष्कराबाबत भाष्य करण्यापेक्षा स्थानिक विभागीय लष्करी अधिकारी चांगला की वाईट, यावरून सैन्यदलाविषयी जनतेचे मत बनलेले आढळते. सीमेकडील दुर्गम खेड्यांमध्ये जिथे एखादादेखील सरकारी अधिकारी अथवा मंत्री पोहोचलेला नाही, अशा ठिकाणी लष्करच गावकर्‍यांना रोजगार मिळवून देत आहे, ही एक बाजू, तर दुसरीकडे लष्कर रस्ते बनविण्याच्या कामात अथवा भूसुरुंग हुडकण्याच्या कामात स्थानिक जनतेला वेठीला धरते, असा आरोपही काही गावांत होताना दिसतो. लष्कराच्या गाड्या जाताना दिसल्या, की गावा-गावांतील रस्त्यावरची जनता तिथल्या तिथे स्तब्ध उभी राहते. शाळकरी मुले, तरुण लष्कराच्या गाड्यांना सॅल्यूट ठोकून ‘जयहिंद साब‘ म्हणतात. पण ही लोकांच्या मनातील आदब की खौंफ, ते पुरते स्पष्ट होत नाही.

स्थानिक दहशतवाद उखडून टाकण्यासाठी गावागावांत लपलेल्या दहशतवाद्यांचा लष्करातर्फे कसून शोध घेतला जातो. खबर मिळताच क्षणी संपूर्ण गावाला लष्कराचा वेढा पडतो. प्रत्येक घराची कसून तपासणी केली जाते. आज काश्मिरी जनता तीन गोष्टींनी हादरते – गरिबी, दहशतवाद्यांची जुलूम-जबरदस्ती आणि लष्कराची शोधमोहीम. ‘प्रत्येक वेळेस एखाद्या लपलेल्या दहशतवाद्याची माहिती गावातील सामान्य जनतेला असतेच, असे नाही. पण लष्कर मात्र गावकर्‍यांना वेठीस धरते. लष्कराच्या विरुद्ध काही बोलले गेले की ते राष्ट्रीय सुरक्षेच्याच विरुद्ध आहे, असे मानले जाते. हे योग्य नाही…‘ एक स्थानिक पत्रकार म्हणाला.

आजच्या घडीला स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण इनमिन पाच ते दहा टक्क्यांवर आले आहे. मोठ्या प्रमाणावर आहेत ते केवळ परकीय दहशतवादी – पाकिस्तानी, अफगाणी, सुदानी आणि इराणी. स्थानिक गरीब आणि अशिक्षित युवकांच्या हातात नोकरी अथवा रोजगार नसतोच. अशा वेळेस अतिरेक्यांचे हस्तक त्यांना गाठतात. त्यांच्या हातावर हवा तेवढा पैसा टेकवून एक ते दोन वर्षांच्या करारावर त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जातात, ही गोष्ट गावागावांतील कच्च्याबच्च्यांनाही ठाऊक आहे. स्थानिक तरुणांकडे मुख्यतः परदेशी दहशतवाद्यांना जंगलातून वाट दाखविण्याचे काम सोपविलेले असते.

लष्कराच्या गोळीबारात एखादा अतिरेकी ठार झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरते आणि सारा गाव मृताला बघण्यासाठी गोळा होतो. मृत व्यक्ती ही पाकव्याप्त काश्मीरमधील आपली एखादी नातलग नाही ना, ही शंका त्यांना सतत पोखरत असते. कुपवाडा हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालील जिल्हा. लष्कराच्या प्रकल्पात काम करणारी गावे अतिरेक्यांच्या डोळ्यांत कायम सलत असतात. म्हणूनच की काय, अशा गावांना आगी लागणे, हत्यासत्रे घडणे हा निव्वळ योगायोग मानता येत नाही.

पर्यटन हा काश्मीरच्या अर्थकारणाचा एकमेव आधारस्तंभ. आजमितीस मात्र पर्यटन व्यवसाय अवघ्या दहा टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्या अनुषंगाने काश्मिरमधील पारंपरिक व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले आहेत. सीमावर्ती गावांचा तर शेती हा एकमेव पोटापाण्याचा व्यवसाय मात्र, घुसखोरांच्या भीतीने शेतांमध्ये भूसुरुंग पेरल्याने तेथील जनतेला रोजी-रोटीपासून वंचित राहावे लागत आहे. सीमेलगत असलेल्या उरी सेक्टरमधील उतरणीच्या भागात तर १९६५च्या युद्धात पेरलेले भूसुरुंग पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन वाहत आल्याने आजही अपघात घडतात. बारामुल्ला – उरी येथे परदेशी कंपन्यांच्या मदतीने दोन मोठे जलविद्युत प्रकल्प सुरू झाले आहेत. दिल्ली, पंजाबला या प्रकल्पांद्वारे वीज पुरविली जाते, मात्र जम्मू-काश्मीरची स्थिती म्हणजे ‘दिव्याखाली अंधार‘ असल्यागत आहे. इथे दिवसाकाठी सात-आठ वेळा वीज जाणे ही नित्याची बाब. सुरक्षेच्या दृष्टीने वीज जाणं, हे कृष्णकृत्य करणार्‍यांच्या पथ्यावर पडतं. काश्मीरमध्ये विजेचे बिल भरण्याची प्रथा नाही आणि व्यवस्थाही नाही. त्यामुळे मिळते ती फुकटच या विचारामुळे वीज गेल्याचे फारसे दुःखही जनतेला होत नाही. केंद्र सरकारकडून काश्मीरला प्रचंड आर्थिक मदत होत असली, तरी ती सर्वसामान्य काश्मीरवासीयांपर्यंत पोहोचत नाही, याचे प्रत्यंतर जागोजागी येते. म्हणूनच की काय, ठिकठिकाणच्या जनतेच्या मनात स्थानिक नेते आणि राज्य सरकार यांच्याबद्दल नाराजी धुमसत आहे.

काश्मीरवासीयांची मानसिकता अत्यंत अस्थिर. बारामुल्ला परिसरातील एका स्थानिक कार्यकर्त्याला पाकिस्तानचा हस्तक म्हणून अटक झाली, तेव्हा तेथील रहिवाशांनी पोलीस स्थानकासमोर भारतविरोधी घोषणा देत आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद‘चा नारा देत उग्र निदर्शने केली. आठवडाभरानंतर झालेल्या निवडणुकीत याच लोकांनी भारतसमर्थक उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी केले. बारामुल्लातील एका दुकानदाराने नेमक्या भाषेत लोकांची मानसिकता स्पष्ट केली – ‘यहाँ के लोग जिसकी सरकार है, उनके साथ है‘

निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्रयाचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. जो कुणी त्यांना यापासून भोगमुक्ती देईल, त्यालाच काश्मिरी जनता त्राता मानेल. मग तो भारत असो वा पाकिस्तान. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे.

— भालचंद हादगे उर्फ भाली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..