
रशियाने जेव्हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतरिक्षात सोडला तेव्हा त्याचे फायदे लगेच लक्षात आले होते. त्याचं महत्व अमेरिकेने देखील ओळखलं होतं आणि त्यामुळेच ह्या देशांमध्ये एक स्पर्धा सुरू झाली होती, ह्या स्पर्धेमुळे जे तंत्रज्ञान विकसित झालं आणि जी ज्ञाननिर्मिती झाली त्याची फळे आपण आज चाखतो आहोत. फक्त उपग्रह सोडून भागणार नाही हे रशियाच्या लक्षात आलं. ह्या उपग्रहांचा जास्तीत जास्त वापर करायचा तर ते दीर्घकाळ अवकाशात राहणं आवश्यक होतं. पुढील अनेक संशोधनासाठी, तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी, तसेच सूर्यमालेतील इतर अनेक घटनांचा अभ्यास करणे तसेच अनेक गोष्टींसाठी मानवाची उपस्थिती गरजेची आहे हे लक्षात आलं. पण हे तितकं सोपं नव्हतं. हे करण्यासाठी अनेक आव्हान होती कारण अजून अवकाशविषयीच्या अनेक गोष्टी अद्याप माहिती नव्हत्या. मानवी शरीराचा अभ्यास देखील पूर्ण झाला नव्हता. त्याचबरोबर मानवाला अवकाशात पाठवण्यासाठीच तंत्रज्ञान विकसित नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपग्रह अवकाशात सोडणारं तंत्रज्ञान होतं पण त्याला परत पृथ्वीवर आणणारं तंत्रज्ञान ना रशियाकडे होतं ना अमेरिकेकडे. पण रशियाने हे कल्पनातीत वेगाने करून दाखवलं. पहिला उपग्रह सोडल्यानंतर फक्त ४ वर्षातच मानवाला देखील अंतरिक्षात पाठवून रशियाने जगाला अचंबित केलं होतं.
अवकाश संशोधनाची पाळेमुळे ही दुसऱ्या महायुद्धात सापडतात. ह्या युद्धात जर्मनीने प्राथमिक अवस्थेतील क्षेपणास्त्रे वापरली होती. ह्याच महत्व रशियाने अचूक ओळखलं आणि वेगाने हालचाली करून युद्धानंतरच्या काळात अवकाश संशोधनात आघाडी घेतली. १९५७ साली स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह रशियाने अवकाशात सोडला आणि इथूनच सुरू झाली एक स्पर्धा. ह्या स्पर्धेने आजच्या आधुनिक जगाला आकार दिला आणि मनुष्याने खूप मोठी स्वप्ने नुसतीच बघितली नाहीत तर ती प्रत्यक्षात देखील आणली. अशा अनेक स्वप्नांपैकी एक म्हणजे दुसऱ्या ग्रहावर वस्ती करणे. अशाच एका स्वप्नाला गवसणी घालण्यासाठीचे पहिले पाऊल भारताने उचलले ते म्हणजे समानव उपग्रह अवकाशात पाठवणे.
अमेरिका, रशिया आणि चीनने अंतराळात युद्धाची जय्यत तयारी केल्याचे समोर येत असताना भारतानेही या आघाडीवर महत्वाचे पाउल उचलल्याचे दै.प्रत्यक्षमध्ये १२ जून रोजी वाचनात आले.
एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे.
कृत्रिम उपग्रह विक्रमी संख्येने अवकाशात पाठवून अल्पावधीतच ह्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी इस्त्रो ही जगातील एकमेव संस्था. चंद्र आणि मंगळ मोहिमा देखील इस्त्रोने यशस्वी केल्या आहेत. चांद्रयान-२ मोहिमेद्वारा लँडर, रोव्हर आणि ऑर्ब्रीटर चंद्रावर उतरवले जातील आणि चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्र प्राप्त होऊ शकतील. अंतराळ संशोधनाचं क्षितिज हे यापलीकडे जाऊन प्रचंड मोठं आहे आणि आजमितीला ह्या क्षेत्रातील मूलभूत संशोधनात इस्त्रोने अजून प्रवेश केलेला नाही.
सध्या अवकाशात एकच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कार्यरत आहे. या अंतराळ स्थानकाची उभारणी अमेरिकेची नासा, रशिया, जपान व कॅनडाच्या संयुक्त मोहिमेतून करण्यात आली आहे आणि त्यावर अब्जो डॉलर खर्चही झाला आणि दरवर्षी त्याच्या देखभालीसाठी होतो आहे.
या इथे एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते ती म्हणजे इस्त्रोच्या माजी प्रमुखांचा वरील गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन, ते म्हणतात “भारताने याकडे लक्ष देण्याची आवश्यकत नसून २० टन वजनाचे अंतराळ स्थानक ही ‘इस्त्रो’च्या आवाक्यातील गोष्ट आहे” इथेच इस्त्रोच्या प्रमुखांचा आपल्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि सहकारी शास्त्रज्ञानांवर किती विश्वास आणि खात्री आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. हा विश्वासच ‘आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञानांचा उत्साह आणि जिद्द बुलंद करणारा आहे.
या स्थानकामध्ये अंतराळवीर राहू शकतात अशी माहिती ‘इस्त्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी दिल्याचे दै. प्रत्यक्षामध्ये वाचनात आले. ‘इस्त्रो’च्या ‘अंतराळ स्थानका’मुळे भारताचे अंतराळक्षेत्रातील स्थान भक्कम होण्यास मदत मिळेल. याबाबतीत अमेरिका, रशिया आणि चीन अर्थातच आघाडीवर आहेत. पण आता भारत भविष्यात नक्कीच पुढे जाईल अशी आशा वाटू लागली आहे.
अश्याच आशयाची पण महत्वाची बातमी नुकतीच वाचनात आली ती म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकलचे (एचएसटीडीव्ही) म्हणजेच, मानवरहित स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. या यशामुळे स्क्रॅमजेट तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे.
संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) ओडिशा किनाऱ्याजवळच्या डॉ. अब्दुल कलाम बेटावरून स्क्रॅमजेटचे प्रक्षेपण केले. बेटावरील कॉम्प्लेक्स-४ या प्रक्षेपण तळावरून हे हायपरसॉनिक व्हेईकल आकाशात झेपावले. केवळ २० सेकंदांत ३२.५ किलोमीटर (२० मैल) उंची गाठण्याची क्षमता स्क्रॅमजेटमध्ये असून, ‘मॅक ६’चा वेग हे स्क्रॅमजेड गाठू शकते. विमान लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी या स्क्रॅमजेटचा वापर होणार आहे. त्याखेरीज नागरी सेवांसाठीही स्क्रॅमजेटचा उपयोग होणार असून, कमी खर्चात उपग्रह सोडण्यासाठी उपग्रहवाहक म्हणूनही ते वापरता येईल.
जगदीश पटवर्धन, कामशेत, पुणे.
Leave a Reply