आपल्याला मोबाईलवर किंवा घरच्या दूरध्वनीवरसुद्धा येणाऱ्या फोन कॉल्स पैकी बरेच फोन कॉल्स हे अनावश्यक असतात. अशा प्रकारच्या अनावश्यक कॉल्सना स्पॅम कॉल्स असे म्हणतात. या स्पॅम कॉल्सबद्दलची अतिशय महत्त्वाची आता एका अहवालाद्वारे बाहेर आली आहे.
स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी.
यासंदर्भात नुकत्याच जाहीर झालेल्या एका रिपोर्टप्रमाणे २०१८ साली स्पॅमिंग मध्ये ब्राझीलने भारताच्या पुढे जाऊन पहिला नंबर पटकावला.
भारतात होणाऱ्या एकूण फोन कॉल्सपैकी सहा टक्के कॉल्स हे स्पॅम असतात. मात्र असे असले तरी सर्वसाधारणपणे भारतात होणाऱ्या स्पॅम कॉल्सचे प्रमाण हे महिन्याला एका दूरध्वनीधारकामागे २२ एवढं कमी झालेलं आहे असं या अहवालात म्हटलंय.
सदर अहवालाप्रमाणे ब्राझीलमध्ये प्रत्येक ट्रूकॉलर युजरमागे दर महिन्याला ३७ स्पॅम कॉल झाल्याचे दिसून येते. म्हणजेच येथे स्पॅमकॉल मध्ये वर्षभरामध्ये ८१ टक्क्याची वाढ झालेली आहे.
ब्राझील आणि भारतानंतर चिली, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको या तीन देशांचे याबाबत क्रमांक लागतात.
ट्रु कॉलरच्या या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे भारतात असे स्पॅम करणाऱ्यांमध्ये सर्वात मोठे प्रमाण हे टेलिकॉम् ऑपरेटर्स आणि टेलिकॉम् सर्विस प्रोव्हायडर्सचे आहे. त्यांनी तब्बल ९१ टक्के कॉल्स हे त्यांच्या विविध प्रकारच्या ऑफर्स देण्यासाठी आणि बॅलन्सच्या रिमाईंडर्ससाठी केलेले दिसतात.
त्यानंतर नंबर लागतो तो स्कॅम कॉलर्स आणि टेलीमार्केटर्स यांचा. त्यांनी अनुक्रमे सात टक्के आणि दोन टक्के स्पॅम कॉल्स केलेले दिसतात.
ट्रूकॉलर च्या म्हणण्याप्रमाणे २०१८ मध्ये त्यांनी जगभरातून 17.7 बिलियन कॉल ब्लॉक केले. म्हणजेच, केला जाणारा प्रत्येक चौथा कॉल हा स्पॅम कॉल होता असे त्यांचे म्हणणे आहे.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply